Meta Waterwarth Project: भारताचं डिजिटल इंफ्रास्ट्रक्चर होणार अधिक मजबूत, मेटा समुद्राखाली टाकणार जगातील सर्वात लांब केबल
फेसबुकची आणि इंस्टाग्रामची मूळ कंपनी असलेल्या मेटाने आता एका नवीन प्रोजेक्टची घोषणा केली आहे. मेटाने ‘प्रोजेक्ट वॉटरवर्थ’ या प्रकल्पाला सुरुवात केली आहे. या प्रोजेक्टचा भारताला सर्वाधिक फायदा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मेटाने भारताला त्यांच्या एका प्रमुख सागरी प्रकल्पात समाविष्ट करण्याची घोषणा केली आहे.
या प्रकल्पाअंतर्गत जगातील पाच खंडांना मरीन इंटरनेट केबलद्वारे जोडण्याची योजना आहे. यासाठी, मेटा या पाच खंडांमध्ये 50,000 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीची अंडरसी केबल टाकणार आहे. हा एक अब्जावधी डॉलर्सचा प्रकल्प आहे, ज्यामध्ये अनेक वर्षे गुंतवणूक केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिका भेटीदरम्यान मेटाने या महत्त्वाच्या कराराची घोषणा केली होती. (फोटो सौजन्य – Pinterest)
आता लवकरच या प्रकल्पाला सुरुवात होणार आहे. ‘प्रोजेक्ट वॉटरवर्थ’ हा भारत, अमेरिका आणि इतर देशांना जोडेल. यामुळे भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांना गती मिळेल आणि देशाच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असे मेटाचे म्हणणे आहे. अहवालानुसार, हे नेटवर्क अमेरिका, ब्राझील, भारत, दक्षिण आफ्रिका आणि इतर प्रमुख प्रदेशांसह 5 खंडांना जोडेल. हे नेटवर्क भारतात आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) सेवा सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल .
फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप सारखी अॅप्स मेटाच्या मालकिचे आहेत. भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. अशा परिस्थितीत, भारत ही मेटासाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. येथे मेटाच्या या अॅप्सचे मंथली यूजर्स एक अब्जाहून अधिक आहेत. हा प्रकल्प खूप मोठा आहे आणि तो बांधण्यासाठी अनेक वर्षे लागतील. या केबलमुळे जगभरात डिजिटल कम्यूनिकेशन खूप जलद होईल, असा दावा कंपनीने केला आहे.
14 फेब्रुवारी रोजी, मेटाने प्रोजेक्ट वॉटरवर्थची घोषणा केली. या प्रकल्पात अनेक अब्ज रुपये गुंतवले जातील. हा प्रकल्प या वर्षी सुरू होईल. हे पाच खंडांना जोडेल, ज्यामुळे हा जगातील सर्वात लांब अंडरसी केबल प्रकल्प बनेल. हा एक खूप मोठा प्रकल्प आहे, ज्यामध्ये समुद्राच्या आत एक खूप लांब केबल टाकली जाईल. या केबलमुळे भारत जगातील अनेक देशांशी जोडला जाईल. यामुळे भारतातील इंटरनेटचा वेग वाढेल आणि भारत डिजिटल देश बनण्याच्या दिशेने वाटचाल करेल.
मेटाचा अंडरवॉटर केबल प्रकल्प हा भारताच्या केंद्रस्थानी असलेला 18 वा प्रकल्प असेल. इंटरनेट चालविण्यासाठी अंडरसी केबल्स अत्यंत महत्त्वाचे आहेत. या केबल्स देशांना एकमेकांशी जोडतात. स्थानिक टेलिकॉम ऑपरेटर त्यांच्या ग्राहकांना इंटरनेट सुविधा देण्यासाठी पाण्याखालील केबल्सशी जोडतात.
मेटाच्या प्रवक्त्याने सांगितले की, मेटा भारतात गुंतवणूक करत आहे. कंपनी भारत, अमेरिका आणि इतर ठिकाणांना जोडण्यासाठी जगातील सर्वात लांब, हाय कॅपेसिटी असलेली आणि एडवांस्ड अंडरसी केबल प्रकल्प आणत आहे. डिजिटल सेवांच्या वाढत्या मागणीमुळे प्रेरित होऊन हा प्रोजेक्ट सुरु करण्यात आला आहे.