फोटो सौजन्य - Social Media
कॅनडातील अनिवासी भारतीय (एनआरआय) भारतात पैसे पाठवण्यासाठी आता युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस (युपीआय) अधिकाधिक वापरत आहेत, हे बीकन या फिनटेक प्लॅटफॉर्मच्या अलीकडील निरीक्षणातून स्पष्ट झाले आहे. कॅनडामधील भारतीयांना सेवा पुरवणाऱ्या बीकनने युपीआय वापराबाबत काही महत्त्वाचे ट्रेंड प्रकाशित केले आहेत, जे दर्शवतात की एनआरआय भारताशी संबंधित आर्थिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी अधिक सुलभ, गतीशील आणि पारदर्शक डिजिटल माध्यम निवडत आहेत.
बीकनच्या निरीक्षणानुसार, विशेषतः अलीकडे स्थलांतरित झालेल्या तरुण एनआरआय युपीआयचा वापर अधिक करत आहेत. ते भारतातील कुटुंबीय, घरमालक, सेवा पुरवठादार यांच्याशी व्यवहार करताना पारंपरिक बँक खात्यांऐवजी युपीआय आयडी मागतात. त्यामुळे एकदाच मोठी रक्कम पाठवण्याऐवजी, वारंवार आणि आवश्यकतेनुसार रक्कम पाठवली जाते. यामुळे कॅश फ्लोचे चांगले नियोजन करता येते आणि भारताशी आर्थिक संबंध अधिक सक्रिय राहतात.
बीकनचे सह-संस्थापक आदित्य म्हात्रे यांनी नमूद केले की, “नवीन पिढी आर्थिक स्वायत्ततेकडे आणि डिजिटल-फर्स्ट सोल्यूशन्सकडे झुकत आहे. आमचा प्लॅटफॉर्म कॅनेडियन डॉलर ते भारतीय रुपये (CAD to INR) व्यवहारात सुलभता आणतो. पारंपरिक बँकिंग पद्धतीत येणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी युपीआय हा प्रभावी पर्याय ठरतो.”
बीकनच्या अहवालानुसार, कॅनडातील ७०% भारतीय विद्यार्थी भारतातील व्यवहारांसाठी मोबाइल-फर्स्ट फिनटेक प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत. ही नोंद घेतल्यास, कॅनडातील १.८५ दशलक्ष भारतीय समुदाय अधिकाधिक डिजिटल आर्थिक व्यवहारात सहभागी होत असल्याचे दिसते. २०१३ ते २०२३ या काळात भारतातून स्थलांतर करणाऱ्यांची संख्या ३३००० वरून १४०००० वर गेली असून, ही वाढ ३२६% आहे.
एनआरआय युपीआयचा वापर मुख्यतः घरभाडे, विद्याशुल्क, वैद्यकीय खर्च, कुटुंबाला आर्थिक सहाय्य, सेवा पुरवठादारांचे पेमेंट इत्यादींसाठी करत आहेत. बीकन प्लॅटफॉर्मवरून २१,००० हून अधिक प्रकारच्या भारतीय बिलांचे थेट कॅनेडियन डॉलरमध्ये पेमेंट करता येते. यासाठी बीकनने यस बँक आणि भारत बिलपे यांच्याशी भागीदारी केली आहे. दस्तावेजीकरण, किमान शिल्लक आणि करसंबंधी अडचणी टाळण्यासाठी एनआरआय आता युपीआयसारख्या आधुनिक पर्यायांकडे वळत आहेत.