Microsoft आणि Apple ला टाकलं मागे! Nvidia ने बनवला नवा रेकॉर्ड, इतिहास बदलणार का?
जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि व्हॅल्यूबल कंपनी अशी माइक्रोसॉफ्ट आणि अॅपलची ओळख आहे. जगात क्वचितच असा एखादा व्यक्ती पाहायला मिळेल, ज्याला या कंपन्यांबाबत माहिती नाही. मात्र आता या प्रतिष्ठित आणि व्हॅल्यूबल कंपन्यांना Nvidia ने मागे टाकलं आहे. Nvidia चे मार्केट व्हॅल्यू 3.92 ट्रिलियन डॉलर्स झाले आहे. Nvidia ने माइक्रोसॉफ्टच्या 3.7 ट्रिलियन डॉलर आणि अॅपलच्या 3.19 ट्रिलियन डॉलर या आकड्यांना आता मागे टाकलं आहे. त्यामुळे आात लवकरच इतिहास बदलणार का आणि Nvidia जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि व्हॅल्यूबल कंपनी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गुरुवारी (3 जुलै) Nvidia ने 3.92 ट्रिलियन डॉलर्सचे आश्चर्यकारक बाजारमूल्य गाठले आहे आणि इतिहासातील सर्वात मौल्यवान कंपनी बनण्याच्या मार्गावर आहे. हा बदल आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) मुळे झाल्याचं सांगितलं जात आहे. खरं तर या बदलामागील खरं कारण म्हणजे AI ची जबरदस्त डिमांड. ज्यामध्ये Nvidia ने तांत्रिक प्रभुत्व मिळवले आणि आपली पकड निर्माण केली. (फोटो सौजन्य – Pinterest)
Nvidia ची ग्राफिक्स प्रोसेसिंग यूनिट्स (GPUs) हीच ती खास चिप्स आहे, जी AI टूल्स, जसे की, ChatGPT ला ट्रेन करण्यासाठी आणि चालवण्यासाठी वापरली जाते. जसं जसं जगात आर्टिफिशियल इंटेलिजेंसची मागणी वाढत आहे, त्याच पद्धतीने Nvidia त्याच्या यशाच्या दिशेने एक एक पाऊल पुढे जात आहे. या वर्षी Nvidia चे शेअर्स 170% पेक्षा जास्त वाढले आहेत आणि गेल्या 12 महिन्यांत त्यांचे मूल्य तिप्पट झाले आहे.
Nvidia च्या अलीकडील निकालांदरम्यान, सीईओ जेन्सेन हुआंग म्हणाले, “एक नवीन औद्योगिक क्रांती सुरू झाली आहे. Nvidia आता पारंपारिक डेटा सेंटर्सना एआय कारखान्यांमध्ये रूपांतरित करण्यास मदत करत आहे, जिथे आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीने नवीन उत्पादने उदयास येतील.” वृत्तसंस्था रॉयटर्सच्या मते, कंपनीच्या नवीनतम चिप्सने सर्वात मोठ्या एआय मॉडेल्सना प्रशिक्षण देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, ज्यामुळे त्यांच्या उत्पादनांची अतृप्त मागणी वाढली आहे.
मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन, मेटा प्लॅटफॉर्म्स, अल्फाबेट (गुगल) आणि टेस्ला सारख्या टेक दिग्गजांमध्ये प्रगत एआय डेटा सेंटर्स बांधण्यासाठी आणि उदयोन्मुख एआय तंत्रज्ञानात आघाडी घेण्यासाठी सुरू असलेल्या स्पर्धेमुळे Nvidia च्या विशेष चिप्सची मागणी थेट वाढली आहे.Nvidia, ज्यांनी त्यांचे मुख्य तंत्रज्ञान सुरुवातीला व्हिडिओ गेमसाठी विकसित केले होते, गेल्या चार वर्षांत त्याचे शेअर बाजार मूल्य जवळजवळ आठ पटीने वाढले आहे, जे 2021 मध्ये 500 अब्ज डॉलर्सवरून जवळजवळ 4 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढले आहे.