फोटो सौजन्य - Social Media
सॅमसंग इंडिया आणि भारत सरकारचा स्टार्टअप इंडिया उपक्रम यांनी एकमेकांशी सामंजस्य करार (MoU) करून भारतातील नवउद्योजकांच्या पुढील पिढीला सक्षम करण्यासाठी महत्त्वाची भागीदारी केली आहे. या सार्वजनिक-खाजगी सहयोगाचा उद्देश देशातील दुर्गम भागांतील तरुण नवप्रवर्तकांना संधी उपलब्ध करून देणे आणि नाविन्यपूर्ण विचारांना आकार देणे आहे.
या करारांतर्गत सॅमसंगची प्रमुख नाविन्य स्पर्धा ‘Solve for Tomorrow’ आणि स्टार्टअप इंडियाचे राष्ट्रीय नेटवर्क एकत्र आले असून, हे संयुक्त उपक्रम तळागाळातील प्रतिभांना मार्गदर्शन, निधी, प्रोटोटाइप विकासासाठी मदत व बाजार संपर्क यांसारखी सर्वसमावेशक मदत पुरवतील. बिहारमधील समस्तीपूर, आंध्रप्रदेशातील गुंटूर, जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला आणि आसाममधील काचरसारख्या जिल्ह्यांतील तरुणांची निवड टॉप १०० शॉर्टलिस्टमध्ये झाल्यामुळे स्थानिक प्रतिभेला राष्ट्रीय व्यासपीठ मिळाले आहे.
सॅमसंग साउथवेस्ट एशियाचे कॉर्पोरेट उपाध्यक्ष एस. पी. चुन म्हणाले, “Solve for Tomorrow उपक्रम आणि स्टार्टअप इंडियाचे नेटवर्क एकत्र येऊन देशातील नवोन्मेषशक्तीला खऱ्या अर्थाने चालना देणार आहेत. हा उपक्रम स्किल इंडिया आणि डिजिटल इंडिया यांच्याशी संलग्न असून, ग्रामीण भारतातील चेंजमेकर्सना सक्षम करणे हाच आमचा उद्देश आहे.”
डीपीआयआयटीचे सहसचिव संजीव यांनी सांगितले, “दुर्गम भागांतील नवोन्मेषी तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही भागीदारी महत्त्वाची आहे. स्टार्टअप इंडिया आणि सॅमसंगच्या माध्यमातून नाविन्यतेवर केंद्रित परिसंस्था उभी राहील आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होईल.”
Solve for Tomorrow उपक्रम विद्यार्थ्यांना त्यांच्या आजूबाजूच्या समस्यांवर विचार करून समाधान शोधण्यास प्रवृत्त करतो. २०२५ एडिशनमध्ये टॉप ४ टीम्सना १ कोटींचे अनुदान, टॉप २० टीम्सना २० लाख आणि टॉप ४० टीम्सना ८ लाख रुपयांचे पुरस्कार मिळतील. या वर्षी सहभागी विद्यार्थ्यांना चार थीम्सवर नवकल्पना मांडण्याचे आवाहन करण्यात आले. एआयद्वारे सुरक्षित भारत, आरोग्य व स्वच्छता, क्रीडा व शिक्षणातील सामाजिक बदल आणि पर्यावरणीय स्थिरता. हा उपक्रम आज ६८ देशांमध्ये चालवला जात असून ३ दशलक्षहून अधिक तरुणांनी यात सहभाग घेतला आहे. सॅमसंग व स्टार्टअप इंडियाच्या या सहयोगातून भारतातील नवप्रवर्तनाच्या क्षितिजांना व्यापक दिशा मिळणार आहे.