Samsung च्या 12000 स्मार्टफोन्सनी भरलेल्या ट्रकवर चोरांची नजर, संधी मिळताच केलं असं... क्षणातच लुटले 91 करोड रुपयांचे डिव्हाईस
स्टेशनवर किंवा एखाद्या रस्त्यावर स्मार्टफोन चोरी होण्याच्या घटना सर्रास घडत असतात. चोरं एखाद्या माणसाच्या नकळत त्याच्या खिशातून स्मार्टफोन चोरी करतात आणि नंतर तो स्मार्टफोन चोर बाजारात किंवा एखाद्या दुकानदाराला विकतात. एक किंवा दोन स्मार्टफोन चोरी होण्याच्या घटना अत्यंत सामान्य आहेत. पण जर स्मार्टफोन्सनी भरलेला ट्रकच चोरी झाला तर… वाचून धक्का बसला ना! आता अशीच एक घटना लंडनमध्ये घडली आहे.
लंडनमध्ये चक्क सॅमसंगच्या स्मार्टफोन्सनी भरलेला ट्रक चोरी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लंडनमधील Heathrow Airport जवळ सॅमसंगच्या लेटेस्ट फोल्ड स्मार्टफोन्सनी भरलेला ट्रक चोरी झाला आहे. या ट्रकमध्ये Samsung Galaxy Z Flip 7 आणि Galaxy Z Fold 7 सह अनेक लेटेस्ट स्मार्टफोन्स आणि अन्य डिव्हाईस होते. या ट्रकमध्ये एकूण 12 हजार स्मार्टफोन्स असल्याचं सांगितलं जात आहे. असं सांगितलं जात आहे की, या सर्व डिव्हाईसची किंमत तब्बल 91 करोड रुपये आहे. या चोरीमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. 12 हजार स्मार्टफोन्सच्या चोरीच्या घटनेने सर्वच कंपन्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. (फोटो सौजन्य – istockphoto)
मीडिया रिपोर्टनुसार, सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला एक ट्रक विमानतळावरून गोदामात जात असताना ही चोरी झाली. या ट्रकमध्ये Galaxy Z Fold 7 चे 5,000 युनिट्स, Galaxy Z Fold 7 चे 5,000 युनिट्स आणि Galaxy Watch 8 चे 5,000 युनिट्स होते. या घटनेमुळे कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही चोरी कशी झाली, पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे का, एकूण किती रुपयांचं नुकसान झालं आहे, याबाबत अद्याप कंपनीने कोणतीही माहिती दिली नाही.
एका अहवालात असं सांगण्यात आलं आहे की, ट्रकमध्ये सॅमसंगच्या Galaxy S25 सीरीज आणि Samsung Galaxy A16 स्मार्टफोनचा देखील समावेश होता. या फिल्मी स्टाईल चोरीमध्ये 91 कोटी रुपयांचे सॅमसंग डिव्हाइस चोरीला गेल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. एवढी मोठी चोरी होण्याची ही पहिलीच घटना नसली तरी देखील या चोरीबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
एवढ्या मोठ्या संख्येने मोबाईल चोरी होण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी देखील अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यामध्ये हजारो स्मार्टफोन्स आणि त्यांच्या पार्ट्सची चोरी झाली आहे. 2020 च्या सुरुवातीला भारतात सॅमसंग गॅलेक्सी स्मार्टफोनचे काही पार्ट्स चोरीला गेले होते. त्यानंतर नोएडा येथील एका कारखान्यातून सुमारे 3.30 लाख डॉलर्स किमतीचे काही पार्ट्स चोरीला गेले होते. या प्रकरणात नोएडा पोलिसांनी सहा जणांना अटक केली होती.
2023 मध्ये अमेरिकेतील Apple स्टोअरमधून फिल्मी स्टाईल चोरी झाली होती. चोरांनी Apple स्टोअरमध्ये एक बोगदा खोदला. यामध्ये चोरांनी 436 आयफोन चोरले, ज्यांची किंमत सुमारे 4 कोटी रुपये होती. वृत्तानुसार, चोरांनी जवळच्या कॉफी शॉपच्या बाथरूममधून Apple स्टोअरमध्ये एक बोगदा बनवला होता. या सर्व घटनानंतर आता पुन्हा एकदा स्मार्टफोन चोरीची एक मोठी घटना घडली आहे.
चोरी झालेल्या ट्रकमध्ये कोणते डिव्हाईस होते?
Samsung Galaxy Z Flip 7, Galaxy Z Fold 7, Galaxy Watch 8
कोणत्या देशात घडली अजब घटना?
लंडन