सॅटेलाइट इंटरनेट vs ब्रॉडबँड नेटवर्क: Elon Musk की भारतातील टेलिकॉम कंपन्या, कोण देणार उत्तम सर्विस? दोन्ही नेटवर्कमध्ये फरक काय?
भारतात 2025 च्या अखेरपर्यंत एलन मस्कची सॅटेलाईट इंटरनेट सेवा स्टारलिंक सुरु केली जाणार आहे. दूरसंचार मंत्रालयाने स्टारलिंकच्या भारतातील एंट्रीला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे आता लवकरच सर्व भारतीयांना स्टारलिंकची सेवा वापरता येणार आहे. आता डोंगराळ भागातील लोकांना देखील नेटवर्क कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. ज्या ठिकाणी अद्याप ब्रॉडबँड किंवा 5G नेटवर्क उपलब्ध नाही, अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांसाठी सॅटेलाईट इंटरनेट सेवा स्टारलिंक अत्यंत फायद्याची ठरणार आहे.
सॅटेलाईट इंटरनेट सेवा स्टारलिंकला भारतात मान्यता मिळाली असली तरी देखील ही सेवा देशातील कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी काही कालावधी लागू शकतो. कारण स्टारलिंकसाठी अद्याप स्पेक्ट्रमची निवड करण्यात आली नाही. भारतात केवळ स्टारलिंकलाच नाही तर रिलायन्स जिओ आणि एअरटेल-समर्थित वनवेबला सॅटेलाइट इंटरनेट लाँच करण्यासाठी आवश्यक परवाना मिळाला आहे. त्यामुळे आता सॅटेलाईट इंटरनेट सर्विसच्या या शर्यतीत कोण आघाडीवर असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
भारतात एअरटेल, जिओ, बीएसएनएल, व्हिआय या टेलिकॉम कंपन्यांचे करोडो युजर्स आहेत. या टेलिकॉम कंपन्या त्यांच्या युजर्सना 5G नेटवर्क कनेक्टिव्हिटी मिळावी, यासाठी सतत प्रयत्न करत असतात. शिवाय या टेलिकॉम कंपन्या त्यांच्या युजर्सना चांगल्या ऑफर्स देखील देतात. तसेच भारतात ब्रॉडबँड सर्विस देखील सुरु आहे. आता लवकरच सॅटेलाईट सर्विस देखील सुरु होणार आहे. त्यामुळे भारतातील मोबाईल युजर्सना आता सॅटेलाइट इंटरनेट, 5G आणि ब्रॉडबँड अशा तीन नेटवर्क कनेक्टिव्हिटीचा वापर करण्याची संधी मिळणार आहे. मात्र या तिन्ही नेटवर्क कनेक्टिव्हिटीमध्ये नेमका काय फरक आहे आणि कोणतं नेटवर्क तुमच्यासाठी फायद्याचं ठरणार, याबाबत आता जाणून घेऊया.
सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर, सॅटेलाइट इंटरनेटद्वारे युजर्सना अवकाशातून इंटरनेट कनेक्टिविटी मिळणार आहे. या इंटरनेट कनेक्टिविटीचा वापर करण्यासाठी युजर्सना कोणत्याही वायर किंंवा केबलची गरज नाही. सॅटेलाइट इंटरनेटच्या मदतीने डोंगराळ भागांत आणि खेडेगावांमध्ये देखील नेटवर्क पोहोचू शकतं. यासाठी कोणत्याही टॉवरची गरज नाही. या सर्विसमध्ये युजर्सना इंटरनेट सिग्नल मिळावा यासाठी उपग्रहांचा वापर केला जातो. यासाठी स्टारलिंकने अवकाशात 3 हजार सॅटेलाईट टर्मिनल पाठवले आहेत. पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करताना हे टर्मिनल यूजर्सना वायरलेस कनेक्टिविटी ऑफर करणार आहेत.
5G मोबाईल नेटवर्क हे मोबाईल टॉवर्समधून येणारे सुपरफास्ट इंटरनेट आहे. 5G टॉवर्समधून आपल्या स्मार्टफोनमध्ये इंटरनेट येतं. एअरटेल, जिओ, व्हिआय या टेलिकॉम कंपन्या भारतात 5G मोबाईल नेटवर्क ऑफर करतात.
घरात किंवा ऑफीसमध्ये ब्रॉडबँड इंटरनेटचा वापर केला जातो. फाइबर केबलद्वारे युजर्सना इंटरनेट कनेक्टिविटी मिळते.
लवकरच भारतात सुरु होणारं सॅटेलाइट इंटरनेट हे 5जी इंटरनेट आणि ब्रॉडबँड इंटरनेटच्या तुलनेत अधिक चांगली सेवा देऊ शकते. वादळ, वारा, किंवा पाऊस आल्यास 5जी इंटरनेट आणि ब्रॉडबँड इंटरनेटमध्ये अनेक समस्या निर्माण होतात. परंतु अवकाशातून रेडिओ सिग्नल प्राप्त करणाऱ्या सॅटेलाइट इंटरनेट कनेक्टिव्हिटीमध्ये समस्या येण्याची शक्यता कमी असते.