जगातील पहिला Agentic AI स्मार्टफोन लाँच! फ्लाईटपासून हॉटेल बुकींगपर्यंत स्वत: करणार सर्व कामं
अलीकडेच अशी चर्चा सुरु झाली होती की, ओपनएआय एका स्मार्टफोनवर काम करत आहे आणि कंपनी लवकरच या स्मार्टफोनची अधिकृतपणे घोषणा करू शकते. यादरम्यान स्टेपफनने पहिला AI एजेंटिक फोन बनवण्याचा दावा केला आहे. रिपोर्ट्सनुसार, मायक्रोसॉफ्टच्या माजी अधिकाऱ्यांनी 2003 मध्ये ही कंपनी लाँच केली होती. (फोटो सौजन्य: X)
रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर अशी माहिती मिळत आहे की, स्टेपफन कंपनी बऱ्याच काळापासून ओप्पो आणि Geely सारख्या मोठ्या कंपन्यांना एआय सर्विस ऑफर करत आहे. मात्र या स्मार्टफोनच्या नावाबाबत थोडा गोंधळ निर्माण झाला आहे. कारण बाजारात StepX नावाचे प्लॅटफॉर्म आधीपासूनच उपलब्ध आहे. याशिवाय एलन मस्कची कंपनी SpaceX चे नाव देखील या स्मार्टफोनच्या नावाशी मिळते-जुळते आहे.
कंपनीने लाँच केलेला हा फोन नवीन स्टेप एओएसवर चालतो. या फोनमध्ये स्टेप अमू नावाचे एक पर्सनल इंटेलिजेंट एआय एजेंट दिले आहे. या एआयच्या मदतीने सामान्य भाषेत संभाषण केले जाऊ शकते. या कंपनीने असा दावा केला आहे की, त्यांच्या फोनची ऑपरेटिंग सिस्टीम (OS) एआय एजंटसाठी एक अद्वितीय वातावरण तयार करते, ज्यामुळे मेमोरी, निर्णय घेण्याची क्षमता आणि कार्यप्रदर्शनातील समस्यांचे निराकरण होते. रिपोर्ट्सनुसार, याची मेमोरी रिकॉल स्पीड केवळ 15 मिलीसेकंद आहे. तसेच हे डिव्हाईस इंटरनेटशिवाय देखील काम करण्यासाठी सक्षम असल्याचे सांगितलं जात आहे.
या फोनमध्ये एआय केवळ ऑन डिव्हाईसच काम करत नाही तर कठिण कामांसाठी इंटरनेटची मदत देखील घेऊ शकते. विशेष म्हणजे यासाठी यूजरचा पर्सनल डेटा फोनच्या बाहेर पाठवला जात नाही. तथापि, कंपनी या बेंचमार्कची किंवा प्रतिस्पर्धी मॉडेल्सची नावे उघड करत नाही. कंपनीने हे डिव्हाईस अँड्रॉईड, लिनक्स आणि आरटीओएसचे मिश्रण असल्याचे सांगितलं आहे. आतापर्यंत समोर आलेल्या व्हिडीओवरून समजते की, या डिव्हाईसमध्ये देखील नथिंग फोनप्रमाणे एक डॉट मॅट्रिक्स एलईडी डिस्प्ले आहे. या फोनचे इतर स्पेसिफिकेशन्स अद्याप जाहिर करण्यात आले नाहीत. मात्र कंपनीने Alipay, Baidu आणि Didi सारख्या चीनी ॲप्ससोबत भागीदारीची घोषणा निश्चितपणे केली आहे.






