AI Robots (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
तंत्रज्ञानाच्या जगात रोज काहीतरी नवीन घडत असते. मोबाईल, स्मार्ट टिव्ही, स्मार्टवॉच आणि इलेक्ट्रिकआ कारनंतर आता चीनची प्रसिद्ध कंपनी शाओमी आणखी एका मोठ्या क्षेत्रात पाऊल टाकण्याच्या तयारीत आहे. कंपनी आता कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरणारे मानवासारखेर दिसणारे रोबोट विकसित करत आहे. हे रोबोट केवळ दाखवण्यासाठी नसून प्रत्यक्ष कारखान्यात काम करताना दिसत आहेत. त्यामुळे भविष्यात उत्पादन क्षेत्रात मोठे बदल पाहायला मिळू शकतात.
शाओमीच्या प्रमुखांकडून व्हिडिओ शेअर..
काही दिवसांपूर्वी शाओमीची प्रमुख लेई जून यांनी सोशलमीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये कंपनीचे रोबोट कोणत्याही व्यक्तीच्या मदतीशिवाय कारखान्यातील ठराविक काम करताना दिसतात. हे रोबोट उत्पादन लाइनवरील भाग उचलणे त्यांची योग्य ठिकाणी मांडणी करणे आणि सतत एकाच गतीने काम पूर्ण करणे अशी जबाबदारी सहज पार पाडताना दिसतात.
कारखान्यात अनेकवेळा अशी कामे असतात जी वारंवार करावी लागतात. अशा कामांमध्ये माणसाचा वेळ आणि मेहनत दोन्ही जास्त खर्च होतात. शाओमीने तयार केलेले हे रोबोट अशाच प्रकारच्या कामांसाठी विकसित केले जात आहेत. त्यांची हालचाल स्थिर असून ते कोणतीही चूक न करता सलग काम करण्यास सक्षम असल्याचे व्हिडिओमधून स्पष्ट होते.
चाकांवर चालणारे दुसरे रोबोट
विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये फक्त मानवाकृती रोबोटच नाही, तर चाकांवर चालणारे दुसरे रोबोटही दिसतात. यावरून शाओमी एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकारच्या रोबोटिक तंत्रज्ञानावर काम करत असल्याचे संकेत मिळतात. भविष्यात प्रत्येक कामासाठी वेगवेगळ्या प्रकारचे स्मार्ट रोबोट वापरण्याची कंपनीची तयारी सुरू असल्याचे बोलले जात आहे.
शाओमीने या नव्या रोबोटबाबत अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही. मात्र कारखान्यात प्रत्यक्ष चाचण्या सुरू झाल्याने हा प्रकल्प अंतिम टप्प्यात असल्याची चर्चा तंत्रज्ञान क्षेत्रात सुरू आहे. अशा चाचण्या यशस्वी ठरल्यास लवकरच हे रोबोट मोठ्या प्रमाणात वापरले जाऊ शकतात.
One of the toughest challenges for robots in factories is handling large, irregular, flexible parts reliably over long periods.
Here is an uncut video of Xiaomi’s humanoid robot continuously sorting center console side covers on the production line. pic.twitter.com/Uv10XZ5uUF — Lei Jun (@leijun) July 15, 2026
सायबरवन नावाचा मानवाकृती रोबोट
खरं तर शाओमीचा रोबोटिक्समधील प्रवास आजचा नाही. काही वर्षांपूर्वी कंपनीने सायबरवन नावाचा मानवाकृती रोबोट सादर केला होता. त्या वेळी हा रोबोट लोकांना ओळखणे, साधा संवाद साधणे आणि काही मूलभूत हालचाली करणे अशा क्षमतांमुळे चर्चेत आला होता. मात्र तो संशोधनासाठी तयार करण्यात आला असल्याचे कंपनीने स्पष्ट केले होते.
त्यानंतर शाओमीने आपले लक्ष उद्योग क्षेत्राकडे वळवले. आता कंपनीचे उद्दिष्ट केवळ लोकांशी बोलणारे रोबोट तयार करणे नाही, तर प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेत मदत करणारी यंत्रणा उभी करणे आहे. अलीकडेच कंपनीने सांगितले होते की, त्यांच्या एका रोबोटने इलेक्ट्रिक वाहनांच्या कारखान्यात सलग काही तास कोणत्याही अडथळ्याशिवाय काम केले. हा अनुभव कंपनीसाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
रोबोटचा वापर भविष्यात अधिक वाढण्याची शक्यता
जगभरात एआय आणि रोबोटिक्समध्ये वेगाने स्पर्धा वाढत आहे. अमेरिकेतील अनेक कंपन्यांप्रमाणेच चीनमधील उद्योगही या क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत आहेत. उत्पादनाचा वेग वाढवणे, खर्च कमी करणे आणि अचूकता सुधारणे यासाठी स्मार्ट रोबोटचा वापर भविष्यात अधिक वाढण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञांच्या मते, अशा रोबोटमुळे कारखान्यांमधील धोकादायक किंवा सतत एकसारखी कामे अधिक सुरक्षित आणि वेगवान होतील. अर्थात, यासोबत रोजगार, कौशल्य आणि तांत्रिक प्रशिक्षण यासारख्या मुद्द्यांवरही चर्चा होणे गरजेचे आहे. कारण नवीन तंत्रज्ञान जितक्या वेगाने पुढे जाते, तितक्याच वेगाने काम करण्याच्या पद्धतीही बदलतात.
शाओमीने पुढील काही वर्षांत आपल्या उत्पादन केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्मार्ट रोबोट वापरण्याचे संकेत दिले आहेत. जर ही योजना यशस्वी झाली, तर कंपनीच्या कारखान्यांमध्ये अनेक कामे स्वयंचलित पद्धतीने पार पडतील. त्यामुळे उत्पादन क्षेत्रात एआयवर आधारित रोबोटचा वापर आणखी वाढेल आणि उद्योगविश्व एका नव्या युगात प्रवेश करेल.






