सार्वजनिक ठिकाणी फोन चार्ज करताय? थांबा, नाहीतर तुम्हीही व्हाल Juice Jacking चे शिकार, अशा प्रकारे घ्या काळजी
आपल्यासाठी आपला स्मार्टफोन जीव की प्राण आहे. आपण आपल्या स्मार्टफोनशिवाय एक दिवस देखील राहू शकत नाही. सध्याच्या काळात स्मार्टफोन आपली गरज बनली आहे. स्मार्टफोनच्या मदतीने आपण केवळ एका क्लिकवर आपली अनेक कामं करू शकतो. आपल्या स्मार्टफोनमध्ये आपली वैयक्तिक माहिती, फोटो आणि इतर अनेक महत्त्वाचे डॉक्युमेंट सेव्ह केले असतात. आपण स्मार्टफोनच्या मदतीने वैयक्तिक आणि व्यावसायिक कामे देखील करू शकतो.
लाँच झाली अनोखी पॉवर बँक, फक्त फोनच नाही तर लॅपटॉपही करणार चार्ज; किंमत केवळ इतकी
एकूणच काय तर आपल्याला दिवसभर आपला स्मार्टफोन वापरावा लागतो. अशा परिस्थितीत फोनची बॅटरी लवकर संपते. आपण घरी किंवा ऑफीसमध्ये असल्यास तात्काळ आपला फोन चार्ज करू शकतो. पण आपण जेव्हा प्रवासात असतो तेव्हा आपला फोन चार्जिंगचं आपल्याला मोठं टेंशन असतं. अशावेळी आपण आपला फोन चार्ज करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या चार्जिंग पॉईंटचा वापर करतो. आपल्या फोनची चार्जिंग संपत असेल आणि आपल्याला एखादा चार्जिंग पॉईंट दिसला तर आपला आनंद गगनात मावेनासा होतो. (फोटो सौजन्य – pinterest)
पण आपला हाच आनंद आपल्या नुकसानीचे कारण ठरू शकतो. सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या चार्जिंग पॉईंटचा वापर आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतो. स्मार्टफोन चार्जिंगला लावल्यानंतर अगदी काही क्षणातच आपलं बँक अकाऊंट हॅक होऊ शकतं. होय, हे खरं आहे. सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या चार्जिंग पॉईंटमध्ये स्मार्टफोन चार्ज केल्यास आपलं मोठं नुकसान होऊ शकतं. याला Juice Jacking असं म्हणतात. स्कॅमर फोन चार्जरवरूनही तुमची माहिती मिळवू शकतात, आणि तुमच्याकडून पैसे उकळू शकतात.
स्कॅमरसाठी फोन चार्जरमधूनही डेटा चोरणे सोपे आहे. वास्तविक, ज्यूस जॅकिंगच्या मदतीने, घोटाळेबाजांना तुमची आणि तुमच्या बँकेची माहिती मिळते, ज्यामुळे बँक खाते देखील रिकामे केले जाऊ शकते. यामुळे, फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने सार्वजनिक ठिकाणी फोन चार्जर वापरू नये अशी माहिती दिली आहे.
रेल्वे स्थानके, बस स्टँड, विमानतळ, बाजारपेठ किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग पॉइंट उपलब्ध आहेत. असे काही पॉइंट आहेत जेथे चार्जर देखील अटॅच केले जातात, परंतु हे लोकांना मदत करण्यासाठी नसून त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी असू शकते. यूएसबीच्या मदतीने हॅकर्स फोन हॅक करतात. या हॅकिंगला ज्यूस जॅकिंग म्हणतात. ज्यूस जॅकिंग हे सायबर गुन्हे करण्यासाठी सोपे माध्यम बनले आहे.






