16 वर्षांखालील मुलांसाठी Meta चा नवा नियम, या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असणार पालकांचा कंट्रोल! कंपनीने आणलं नवं फीचर
मेटाने त्यांच्या काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी एक नवीन फीचर जारी केलं आहे. या फीचरद्वारे आता 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पालकांचा कंट्रोल असणार आहे. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये इंस्टाग्राम, फेसबूक आणि मॅसेंजरचा समावेश असणार आहे. कंपनीने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टीन अकाउंट्स फीचर आणलं आहे. यामुळे आता 16 वर्षांखालील मुलांच्या अकाऊंटवर काही निर्बंध घालण्यात आले आहेत.
तरूणांना ऑनलाइन धोक्यांपासून वाचवण्यासाठी मेटाने आता हे पाऊल उचललं आहे. हे फीचर प्रथम इंस्टाग्रामसाठी रिलीज करण्यात आलं होतं. मात्र आता कंपनीने त्यांच्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी देखील हे फीचर रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन फीचरमध्ये सुधारित गोपनीयता सेटिंग्ज आणि पालक नियंत्रणे समाविष्ट आहेत. यामुळे आता पालक मुलांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लक्ष ठेऊ शकणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
अलीकडे अमेरिकेत किड्स ऑनलाइन सेफ्टी अॅक्ट (KOSA) सारखे कायदे लागू करण्याची तयारी केली जात आहे. अशातच आता मेटाने हे नवीन फीचर आणलं आहे. या फीचरमुळे मुलांचे ऑनलाईन धोक्यांपासून संरक्षण व्हावं असा कंपनीचा उद्देश आहे. मेटाने म्हटले आहे की आता 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या युजर्सना लाईव्ह जाण्यासाठी पालकांची परवानगी घ्यावी लागेल. याशिवाय, जर डायरेक्ट मेसेजमध्ये कोणतेही नग्न चित्र आढळले तर कंपनी ते आपोआप अस्पष्ट करेल.
नवीन फीचर अंतर्गत, 16 वर्षांखालील सोशल मीडिया युजर्सना त्यांच्या पालकांच्या परवानगीशिवाय लाईव्ह जाऊ शकणार नाहीत. याशिवाय, हे युजर्स त्यांच्या पालकांच्या परवानगीशिवाय डायरेक्ट मेसेजेस (DM) मधील अनुचित फोटो आणि कंटेंट ब्लॉक करणारे फिल्टर देखील डिसेबल करू शकणार नाहीत. हे नवीन फीचर मेटाच्या टीन सेफ्टी फोरम दरम्यान सादर करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला इंस्टाग्रामच्या ग्लोबल पब्लिक पॉलिसी डायरेक्टर तारा हॉपकिन्स आणि लेखिका आणि स्तंभलेखिका ट्विंकल खन्ना उपस्थित होत्या. तारा हॉपकिन्स म्हणाल्या, “जगात सर्वात जास्त तरुण लोकसंख्या भारतात आहे. जगभरातील 13 ते 15 वर्षे वयोगटातील 97% किशोरवयीन मुले या संरक्षणात्मक वातावरणात राहतात हे पाहून आम्हाला आनंद होत आहे.” ट्विंकल खन्ना म्हणाली, “इंस्टाग्राम टीन अकाउंट्स फीचरमुळे किशोरवयीन मुलांना त्यांचा स्वतःचा डिजिटल प्रवास आराखडा करता येईल आणि पालक खात्री करू शकतील की मुले कोणत्याही धमक्या किंवा स्पॅमला बळी पडणार नाहीत.”
टीन अकाउंट्स हे मेटाच्या प्लॅटफॉर्मवर (इंस्टाग्राम, फेसबुक, मेसेंजर) एक खास वैशिष्ट्य आहे जे किशोरवयीन युजर्सना अधिक सुरक्षित अनुभव देते आणि पालकांना त्यांच्या अकाऊंटचे निरीक्षण करण्याचे पर्याय देते. मेटाच्या मते, सप्टेंबर 2024 मध्ये सुरू झालेले हे फीचर आतापर्यंत इंस्टाग्रामवर 54 दशलक्षाहून अधिक किशोरवयीन मुले वापरत आहेत.