'TikTok भारतात परत येणार का? (Photo Credit- X)
TikTok Ban in India: काही दिवसांपूर्वी, भारतात TikTok ची वेबसाइट अचानक सुरू झाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. जरी सर्व वापरकर्ते ती ॲक्सेस करू शकले नसले तरी, काही वापरकर्त्यांसाठी ती सुरू झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौऱ्याच्या काही दिवस आधीच ही गोष्ट घडल्यामुळे, भारतात TikTok परत येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. पण, आता केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान (IT) मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.
एका मुलाखतीत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, TikTok वरून बंदी हटवण्याबद्दल कोणताही प्रस्ताव आलेला नाही. त्यांच्या या थेट वक्तव्यानंतर हे स्पष्ट झाले आहे की, सध्या तरी भारत सरकार TikTok वरील बंदी उठवण्याचा कोणताही विचार करत नाही.
🚨 No proposal to lift TikTok ban in India – Minister Ashwini Vaishnaw. pic.twitter.com/jZtmT67FtN
— Indian Tech & Infra (@IndianTechGuide) September 8, 2025
चीनी गुंतवणूकदार पुन्हा भारताच्या टेक क्षेत्रात परत येणार का, असा प्रश्नही अश्विनी वैष्णव यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी “आपण पाहूया काय होते ते,” असे उत्तर दिले. तसेच, “भारत एक पारदर्शी देश आहे आणि सर्व धोरणे सर्वांसोबत स्पष्टपणे शेअर केली जातील,” असेही ते म्हणाले. 2020 पर्यंत Tencent, Alibaba आणि Shunwei Capital सारख्या चीनी कंपन्यांनी भारतीय स्टार्टअप्समध्ये अब्जावधी रुपयांची गुंतवणूक केली होती.
हे देखील वाचा: Nepal Social Media Apps Ban: नेपाळमधील निदर्शनांमागे सोशल मीडियाची किती ताकद? आकडेवारी पाहून तुम्ही व्हाल थक्क!
जून 2020 मध्ये, राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे कारण देत सरकारने TikTok सह 59 चीनी ॲप्सवर बंदी घातली होती. त्यानंतर जानेवारी 2021 मध्ये ही बंदी कायम करण्यात आली. या बंदीनंतर, Apple आणि Google ने त्यांच्या ॲप स्टोअरमधून TikTok ॲप काढून टाकले होते. त्यावेळी, 20 कोटींहून अधिक वापरकर्त्यांसह भारत TikTok साठी सर्वात मोठी बाजारपेठ होती. सरकारने TikTok च्या मूळ कंपनी ByteDance च्या Hello आणि CapCut सारख्या इतर ॲप्सवरही बंदी घातली होती.
TikTok चे पुनरागमन होणार नसले, तरी भारत आणि चीनमध्ये सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंगवर चर्चा सुरू आहे. याबद्दल बोलताना, आयटी मंत्री म्हणाले की, या उद्योगात जागतिक पुरवठा साखळीचे महत्त्व दुर्लक्षित करता येणार नाही. रिपोर्टनुसार, इलेक्ट्रॉनिक घटकांच्या क्षेत्रात दोन्ही देशांमधील कंपन्या संयुक्त तंत्रज्ञान शेअर करण्याचे मार्ग शोधत आहेत.