'या' शहरात सुरु झाली Vi ची 5G सर्विस, 299 रुपयांपासून सुरु होणाऱ्या प्लॅन्सवर मिळणार अनलिमिटेड डेटाची सुविधा!
भारतातील टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आयडिया (Vi) ने मंगळवारी भारतात त्यांची 5G सेवा सुरू केली आहे. त्यामुळे आता इतर टेलिकॉम कंपन्यांच्या युजर्सप्रमाणेच व्होडाफोन आयडियाचे युजर्स देखील 5G सेवा वापरण्यास सक्षम असणार आहेत. कंपनीने हे 5G नेटवर्क मुंबईत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. इतर शहरांचा विचार केला तर लवकरच बिहार, दिल्ली, कर्नाटक आणि पंजाबमध्ये देखील व्होडाफोन आयडिया 5G सेवा सुरु केली जाणार आहे.
कंपनीने एक मायक्रोसाइट देखील जोडली आहे, जी 5G कनेक्टिव्हिटीची तपशीलवार माहिती देते आणि युजर्स 5G सेवेचा वापर करण्यासाठी कोणते प्लॅन्स खरेदी करू शकतात, याबाबत देखील इथे माहिती देण्यात आली आहे. खास गोष्ट म्हणजे Vi त्यांच्या सर्व 5G प्लॅनसह अमर्यादित 5G डेटा देत आहे. पण यासाठी फक्त तुमच्या स्मार्टफोनमध्ये 5G सपोर्ट असणं आवश्यक आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Vi च्या वेबसाइटवरील नवीन 5G मायक्रोसाइटवर ‘Vi 5G सोबत लाइटनिंग-फास्ट कनेक्टिव्हिटी’ आणि ‘कम्युनिकेशनच्या पुढील युगात आपले स्वागत आहे’ असे संदेश आहेत. या पेजवर एक मार्केटिंग कॅरोसेल देखील आहे, जे 5G कनेक्टिव्हिटीचे फायदे अधोरेखित करते. वेबसाईटवर खाली यूजर्स त्यांचे वर्तुळ निवडून कव्हरेज तपासू शकतात. सध्या फक्त मुंबई वर्तुळात 5G कनेक्टिव्हिटीसाठी सक्रिय कव्हरेज आहे. उर्वरित बिहार, दिल्ली, कर्नाटक आणि पंजाब या शहरांमध्ये, ही सेवा एप्रिलमध्ये सुरू होईल अशी माहिती वेबसाईटवर देण्यात आली आहे.
प्रीपेड प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर, Vi चे 5G प्लॅन 299 रुपयांपासून सुरू होतात, ज्यामध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह दररोज 1GB डेटा युजर्सना ऑफर केला जातो. कंपनीने 349 रुपये आणि 365 रुपयांचे प्लॅन देखील सादर केले आहेत, जे समान वैधतेसह अनुक्रमे 1.5GB आणि 2GB डेटा दररोज देतात. सर्वात महागडा प्रीपेड प्लॅन 3,599 रुपयांचा आहे, ज्यामध्ये ग्राहकांना 365 दिवसांच्या वैधतेसह दररोज 2GB डेटा मिळेल. या सर्व प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटाचा समावेश आहे.
Vi ने पोस्टपेड युजर्ससाठी चार प्लॅन सादर केले आहेत. Vi Max 451 आणि Vi Max 551 ची मासिक किंमत अनुक्रमे 451 रुपये आणि 551 रुपये आहे. पहिल्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 50GB डेटा मिळेल आणि दुसऱ्यामध्ये 90GB डेटा मिळेल. Vi Max 751 ची किंमत 751 रुपये आहे आणि त्यात 150GB डेटा मिळतो. त्याच वेळी, REDX 1201 ची किंमत 1,201 रुपये आहे आणि ती अमर्यादित डेटा प्रदान करेल. या सर्व योजनांमध्ये कव्हरेज उपलब्ध असलेल्या ठिकाणी अमर्यादित 5G डेटा मिळेल.
विशेष म्हणजे अमर्यादित 5G डेटा ही Vi ची सुरुवातीची ऑफर आहे आणि ती तात्पुरती असण्याची अपेक्षा आहे. सध्या, ही भारतातील एकमेव टेलिकॉम ऑपरेटर आहे जी दररोज 2GB पेक्षा कमी डेटा असलेल्या प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटा देत आहे. भारती एअरटेल आणि जिओ दोघेही दररोज किमान 2GB डेटापासून सुरू होणाऱ्या प्लॅनसह अमर्यादित 5G डेटा देतात.