फोटो सौजन्य: iStock
भारतामध्ये सायबर गुन्ह्यांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने, WHT NOW या डिजिटल सेफ्टी मोहिमेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यांनी देशभरातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांसोबत भागीदारी करत नॅशनल यूथ ॲम्बेसडर प्रोग्राम सुरू केला आहे. या उपक्रमाचा उद्देश 2025 च्या अखेरपर्यंत 5000 हून अधिक विद्यार्थ्यांना “डिजिटल फर्स्ट रिस्पॉन्डर्स” म्हणून प्रशिक्षण देण्याचा आहे. हा कार्यक्रम अत्यावश्यक ठरत आहे, कारण सेक्सटॉर्शन, सायबर बुलिंग आणि ऑनलाइन शोषणासारख्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या (NCRB) 2025 च्या आकडेवारीनुसार, देशात सायबर गुन्ह्यांमध्ये तब्बल 24.4% वाढ झाली असून 65000 पेक्षा जास्त एफआयआर दाखल झाल्या आहेत. तज्ञांच्या मते, हे आकडे खरे चित्र दर्शवत नाहीत, कारण बऱ्याच पीडित व्यक्ती, विशेषतः महिला आणि अल्पवयीन मुलं भीती, समाजातील कलंक आणि माहितीच्या अभावामुळे तक्रार करत नाहीत.
WHT NOW च्या संस्थापक नीती गोयल म्हणतात, “ही एक चळवळ आहे, उपक्रम नव्हे. आपण सध्या ऑनलाइन अत्याचारांविरोधात गप्प बसण्याचा एक धोकादायक ट्रेंड पाहत आहोत. आमचे उद्दिष्ट आहे तरुणांना माहिती, आत्मविश्वास आणि एकजुटीच्या बळावर सक्षम करणे, जेणेकरून ते सकारात्मक डिजिटल परिवर्तन घडवू शकतील.”
या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या यूथ ॲम्बेसडर्सना सायबर कायदे, रिपोर्टिंग प्रक्रिया, मानसिक प्राथमिक उपचार आणि डिजिटल नैतिकतेसंदर्भात सखोल प्रशिक्षण दिले जाईल. कार्यक्रमामध्ये हँड्स-ऑन वर्कशॉप्स, सायबर सिक्युरिटी व कायदेशीर तज्ञांचे मेंटरशिप सत्र, तसेच कॉलेज कॅम्पसवर डिजिटल सेफ्टी सेल्सची स्थापना यांचा समावेश असेल.
संस्थेचे सह-संस्थापक व कायदेशीर सल्लागार अक्षत खेतान सांगतात, “आमच्या अनुभवातून दिसते की अनेक पीडित काय करावे हे न समजून घाबरतात. प्रशिक्षित ॲम्बेसडर्स त्यांना त्वरित मदत आणि मार्गदर्शन देतील.”
ग्राहकांनो थोडंतरी ‘या’ कारकडे पाहा ! मागील 12 महिन्यात फक्त 9 खरेदीदार, विक्री 84 टक्क्यांनी घटली
या चळवळीला अधिक व्यापक रूप देण्यासाठी आनेका गोयल यांची ग्लोबल यूथ ॲम्बेसडर म्हणून निवड करण्यात आली आहे. “मी इतरांसाठी नव्हे, तर त्यांच्या सोबत बोलण्यासाठी येथे आहे,” असे त्या यावेळी म्हणाल्या. “डिजिटल जग संधींनी भरलेले असले तरी त्यात धोकेही आहेत. सहवेदना, एकजूट आणि ज्ञानाच्या आधारेच आपण हे संकट ओलांडू शकतो.”
आजवर 40 हून अधिक शैक्षणिक संस्थांनी या मोहिमेत रस दाखवला आहे. WHT NOW चा दीर्घकालीन उद्देश आहे की प्रशिक्षित ॲम्बेसडर्सद्वारे संपूर्ण भारतभर एक प्रभावी डिजिटल सेफ्टी नेटवर्क तयार करणे. हेल्पलाइनसाठी +91-9019115115 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. मे 2025 पासून हा उपक्रम टप्प्याटप्प्याने राबवला जाईल.