Apple ने अचानक का बंद केले लेदर iPhone Cases? काय आहे कारण? वाचून तुम्हीही व्हाल हैराण
बाजारात आयफोनसाठी विविध प्रकारचे केस उपलब्ध असतात. पण तुम्हाला माहिती आहे की, टेक कंपनी यापूर्वी त्यांच्या डिव्हाईससाठी लेदर केस देखील ऑफर करत होती. मात्र कंपनीने अचानक आयफोनच्या लेदर केसची विक्री थांबवली. पण कंपनीने हा निर्णय का घेतला? याचे कारण तुम्हाला माहिती आहे का? आयफोनच्या लेदर केसची सुरुवात कधी झाली आणि कंपनीने हे लेदर केस अचानक बंद करण्याचा निर्णय का घेतला, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य: Pinterest)
मिळालेल्या माहितीनुसार, टेक कंपनीने 2013 मध्ये iPhone 5S लाँच केला होता. या आयफोन मॉडेलसोबत अधिकृतपणे लेदर आयफोन केसेस देखील लाँच करण्यात आले होते. कंपनी प्रिमियम ॲक्सेसरीज म्हणून या केसेसची विक्री करत होती. या केसचे उत्तम फिनिश, चांगली ग्रिप आणि लग्जरी लुक सर्वांनाच आकर्षित करत होते. लेदर केस अत्यंत कमी काळातच लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले. त्यामुळे कंपनीने बराच काळ लेदर केसची विक्री सुरु ठेवली होती.
काळानुसार, जगभरात पर्यावरण संरक्षणाबाबत जागरुकता मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे आता लोकं असे प्रोडक्ट्स खरेदी करण्याला प्राधान्य देऊ लागले, ज्यामुळे पर्यावरणावर कोणताही चुकीचा परिणाम होऊ नये. हीच सर्व परिस्थिती पाहून टेक जायंट कंपनीने त्यांचे लेदर केस बंद करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय, कंपनीने 2030 पर्यंत कॉर्बन न्यूट्रल कंपनी बनण्याचा देखील निर्णय घेतला. लेदर केस तयार करताना मोठ्या प्रमाणात कॉर्बन उत्सर्जित होतो, ज्यामुळे पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचू शकतं. पर्यावरणाच्या सुरक्षेला प्राधान्य देत कंपनीने आयफोनचे लेदर केस बनवणं पूर्णपणे बंद केलं.
लेदर केस बंद केल्यानंतर कंपनी कोणते नवीन मटेरियल वापरून आयफोनचे केस तयार करणार, असा प्रश्न सर्वत्र होता. यानंतर कंपनीने ‘फाइनवोव्हन’ नावाचे एक नवीन मटेरियल सादर केले. हे माइक्रोट्विल फॅब्रिकपासून तयार केले जात होते आणि कंपनीने दावा केला होता की, याचे कार्बन फुटप्रिंट लेदरच्या तुलनेत फार कमी आहेत. याशिवाय, यामध्ये प्रीमियम फील आणि सॉफ्ट टेक्सचर देखील पाहायला मिळते. मात्र कालांतराने, फाइनवोव्हन केसच्या क्वालिटीबाबत यूजर्सच्या तक्रारी सुरु झाल्या. काही यूजर्सनी म्हटलं की, फाइनवोव्हन केसवर कमी काळातच स्क्रॅच पडतात आणि निशाण दिसू लागतात. तसेच यामध्ये दिर्घकाळापर्यंत नव्या सारखी चमक दिसत नाही.
यूजर्सच्या वाढत्या तक्रारींमुळे कंपनीने फाइनवोव्हन केस तयार करणं देखील बंद केलं. यानंतर 2025 मध्ये टेकवोव्हन मटेरिअल सादर करण्यात आले. हे पूर्णपणे रिसाइकिल्ड पॉलिएस्टरपासून तयार करण्यात आले होते. प्राथमिक अहवालानुसार, ते पूर्वीच्या फाइनवोव्हनपेक्षा अधिक मजबूत, अधिक टिकाऊ आहे आणि डागांपासून अधिक चांगले संरक्षण देते.






