फोटो सौजन्य: सोशल मीडिया
ओडिशा हे भारतातील अत्यंत सुंदर राज्य आहे. ओडिशा त्याच्या ऐतिहासिक मंंदिरांमुळे आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे पर्यटकांना आकर्षित करते. क्षेत्रफळाच्या दृष्टीने हे भारतामधील दहावे मोठे राज्य आहे. ओडिशा राज्यातील जगन्नाथ मंदिर मंदिर आणि कोणार्क मंदिर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. दरवर्षी लाखो पर्यटक या मंदिरांना भेट देण्यासाठी येतात. बंगालच्या उपसागराजवळ असलेले हे राज्य लाखो लोकांना आकर्षित करते. याच राज्याच्या जवळ घाटगाव येथे एक लपलेला खजिना आहे. भुवनेश्वरपासून सुमारे 165 किमी अंतरावर असलेले घाटगाव एक निसर्गरम्य ठिकाण आहे. या परिसरात काही अप्रतिम पर्यटन स्थळे आहेत. ही पर्यटन स्थळे निसर्गप्रेमी आणि साहसप्रेमी पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरली आहेत.
चला तर मग जाणून घेऊयात घाटगांव परिसरातील काही अप्रतिम ठिकाणांबद्दल
माता तारिणी मंदिर
घाटगावच्या यात्रेत सर्वात आधी भेट दिली जाते ते माता तारिणी मंदिराला. ओडिशा राज्यातील प्रमुख शक्तीपीठांपैकी एक असलेले हे मंदिर तारा आणि तारिणी या जुळ्या देवींना समर्पित आहे. मंदिराचे पवित्र वातावरण, श्रद्धेने वाहिलेली नारळांची माळ, आणि भक्तांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. या मंदिराच्या अनुषंगाने दरवर्षी लाखो पर्यटक घाटगावची वाट धरतात.
घाटगाव वन परिक्षेत्र: निसर्गाचा खजिना
घाटगाव वन परिक्षेत्र हे घनदाट जंगल, तलाव आणि धबधब्यांसाठी ओळखले जाते. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात घाटगावचे निसर्गाचे सौंदर्य अगदी शिखरावर असते. हायकिंग, ट्रेकिंग आणि कॅम्पिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी निसर्गाच्या कुशीत रमण्याची संधी मिळते. तुम्ही जर साहस प्रेमी असाल तर या ठिकाणाला नक्की भेट द्या.
सनाघागरा धबधबा
घाटगावपासून काही अंतरावर असलेला सनाघागरा धबधबा इको टुरिस्ट स्पॉट म्हणून प्रसिद्ध आहे. 50 फूट उंचावरून पडणारे पाणी, आजूबाजूची हिरवळ, आणि निसर्गाच्या सान्निध्यात शांतता अनुभवायची असेल तर हा धबधबा एक आदर्श ठिकाण आहे. येथील सौंदर्याने ओडिशा, झारखंड, छत्तीसगड या भागातील लोक वीकेंडला येथे भेट देतात.
सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान
घाटगावच्या जवळ असलेले सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान हत्ती अभयारण्य म्हणून ओळखले जाते. येथे हत्ती, बिबट्या, भुंकणारे हरीण, सांबर, आणि चार शिंगे असलेले हरणे पाहायला मिळतात. जंगल सफारीसाठी लोकप्रिय असलेल्या या ठिकाणी निसर्गाच्या विविधतेचा अनुभव घेता येतो.
घाटगावला कसे पोहोचाल?
भुवनेश्वर आणि कटकपासून घाटगाव सहजगत्या पोहोचण्याजोगे आहे. ओडिशातील कोणत्याही शहरातून येथे जाण्यासाठी अनेक सुविधा उपलब्ध आहेत.
हे देखील वाचा- जोडप्यांसाठी खास IRCTC टूर पॅकेज; हनिमूनसाठी परफेक्ट डेस्टिनेशन, लगेच तिकीट बुक करा