अमृत उद्यान हे दिल्लीतील राष्ट्रपती परीसरात वसलेले एक सुंदर उद्यान आहे. याचे साैंदर्य अनेक पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असते. अमृत उद्यान पूर्वी मुघल उद्यान म्हणून ओळखले जात होते. अमृत उद्यान वर्षभरातून दोनदा उघडले जाते. अशा परीस्थीतीत आता पावसाळ्यात हे खुले झाले आहे. राष्ट्रपती भवनानुसार अमृत उद्यान 16 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधीत सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत खुले राहणार आहे. तुम्हीही या ठिकाणाला भेट देण्याचा विचार करत असाल तर या ठिकाणाशी संबंधित तपशील जाणून घ्या.
अमृत उद्यानाला भेट देण्यासाठी तुम्हाला आधी या जागेचे तिकीट बुक करावे लागेल. सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत 6 तासांच्या स्लॉटमध्ये तिकीटांचे वाटप केले जाते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, तिकीट कुठुन बुक करावे? तर आम्ही तुम्हाला सांगतो की, तिकीट बुक करण्यासाठी तुम्हाला राष्ट्रपती भवनाच्या वेबसाइटला भेट द्यावे लागेल. या वेबसाइटवरून तुम्ही तुमचे तिकीट बुक करू शकता. मुख्य म्हणजे, इथे तुम्हाला तिकीटासाठी कोणतेही पैसे देण्याची गरज नाही. म्हणजेच इथे तुम्ही विनामुल्य उद्यानाचे तिकीट खरेदी करू शकता.
जर तुम्हाला ऑनलाइन तिकीट बुक करायचे नसेल तर तुम्ही राष्ट्रपती भवनाच्या गेट क्रमांक 35 बाहेर वाॅक-इन पर्यटकांसाठी ठेवण्यात आलेल्या सेल्फ-सर्व्हिस किओस्कद्वारे तुमचे तिकीट बुक करू शकता.
हेदेखील वाचा – जन्माष्टमीच्या दिवशी, भारतातील ‘या’ 5 सुप्रसिद्ध कृष्ण मंदिरांना नक्की भेट द्या
राष्ट्रपती भवन परीसरात असलेल्या अमृत उद्यानातील स्टोन अबॅकस, साउंड पाईप आणि म्युझिक वॉल ही मुख्य आकर्षणे आहेत, ज्याचा तुम्ही मुक्त आनंद घेऊ शकता. येथे येणाऱ्या लोकांना तुळशीच्या बियापासून बनवलेली ‘बियांची पाने’ देखील दिली जाणार आहेत, जी एक अनोखी आणि पर्यावरणपुर्वक स्मृतीचिन्ह आहेत.
अमृत उद्यान सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत खुले राहील. जाण्यासाठी प्रवेश संध्याकाळी 5.15 वाजता बंद होतो. याशिवाय सोमवारी हे उद्यान बंद असते. सर्वात जवळचे मेट्रो स्टेशन केंद्रीय सचिवालय आहे, जे पिवळ्या आणि जांभळ्या रेषेने जोडलेले आहे. मेट्रो स्थानकातून शटल बस सेवा उपलब्ध होणार असून, ही मोफत शटल बस सेवा आहे.