(फोटो सौजन्य: X)
जंगलातील जीवन हे नेहमीच रहस्यमय आणि रोमहर्षक असतं. इथे प्रत्येक क्षण हा संघर्षाचाच असतो, जीवन आणि मृत्यू यांच्यातली लढाई. अनेकदा आपण पाहतो की एखादा शिकारी आपल्या शिकारामागे धावत असतो, तर कधी कधी शिकारच शिकार्यावर भारी पडतो. पण सध्या सोशल मीडियावर एक असं थरारक दृश्य व्हायरल होत आहे, जे पाहून नेटकऱ्यांचे डोळे विस्फारले आहेत. चला व्हिडिओत काय घडून आलं ते सविस्तर जाणून घेऊया.
या व्हिडिओत एक अतिशय दुर्मिळ आणि आश्चर्यकारक क्षण कैद झाला आहे, जिथे जंगलाची राणी समजली जाणारी सिंहीण आणि पाण्यातील भीतीदायक राक्षस, मगर एकत्र येऊन झेब्राची शिकार करताना दिसले. असं दुर्मीळ दृश्य फारच क्वचित दिसतं, जिथे दोन वेगळ्या अधिवासांतील शिकारी प्राणी एका शिकारीमागे लागलेले असतात. व्हिडिओत दिसतं की झेब्रा जमिनीवर कोसळलेला आहे. त्याच्या मानेला सिंहिणीने पकडलंय, तर त्याच्या पोटाला मगरीने आपल्या तीव्र जबड्यांत पकडलं आहे. एकाच वेळी दोन घातक प्राण्यांच्या हल्ल्यात झेब्राचा निभाव लागणं अशक्यच होतं. तो ना पाण्यात जाऊ शकतो, ना जमिनीवरून पळू शकतो. त्याचं आयुष्य अक्षरशः धोक्यात आलं आहे.
pic.twitter.com/aARUmJo4RD — PREDATOR VIDS (@Predatorvids) October 19, 2025
हे दृश्य पाहून अनेकांना असं वाटलं की जणू सिंहीण आणि मगरमच्छानं एकत्र योजना आखून ही शिकार केली आहे. खरंतर असं दुर्मीळ आणि समन्वय साधलेलं शिकारी दृश्य क्वचितच पाहायला मिळतं. त्यामुळेच, जंगलातलं हे दृश्य बघून एकच गोष्ट आठवते “जंगलाचा एकच नियम – ज्याची ताकद, त्याची जिंक.” हा केवळ 12 सेकंदांचा व्हिडिओ असून तो @Predatorvids या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 75 हजारांहून अधिक वेळा पाहिलं गेलं असून, शेकडो लोकांनी त्याला लाईक आणि कमेंट्स केल्या आहेत. काहींनी प्रतिक्रिया देताना लिहिलंय, “पहिल्यांदाच पाहिलं की दोन वेगळे शिकारी कोणताही संघर्ष न करता एकत्र शिकार करत आहेत.” तर काहींनी म्हटलंय की, “हीच तर निसर्गाची समतोल रचना आहे एखाद्याचा मृत्यू म्हणजे दुसऱ्याचं जीवन.”
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.