नवी दिल्ली : आपल्या भारतात अनेक ठिकाणी अजून 5 दिवसांचा आठवडा (5 Days Week) हेही सगळ्यांना लागू नसताना, जग यात आणखी पुढं जाताना दिसतं आहे. 4 दिवस काम आणि 3 दिवस सुट्टी हा ट्रेंड आता जगभरात सेट होतो चालल्याचं दिसतं आहे. इंग्लंडमधील अनेक कंपन्यांत सध्या आठवड्यातून 4 दिवस काम (4 Days Week) आणि 3 दिवस सुट्टी (3 Days Off) याची ट्रायल सुरु करण्यात आली आहे. जगातील हा सर्वात मोठा प्रयोग मानण्यात येतोय. गेल्या मंगळवारी अशा पद्धतीने सुरु असलेल्या कार्यालयांच्या कामांवर किती परिणाम होतोय, हे जाहीर करण्यात आलं. त्यात ही योजना 4 दिवसांच्या ऑफिसची योजना यशस्वी ठरल्याचं मानण्यात येतंय. ज्या कंपन्यांनी ही योजना सुरु केली आहे, त्या कंपन्यांची प्रगती होत असल्याचं समोर आलं आहे.
गेल्या वर्षभरात जून ते डिसेंबर या महिन्यांत वेगवेगळ्या क्षेत्रातील एकूण 61 कंपन्यांत हा प्रयोग करण्यात आला. हा प्रयोग सगळ्याच कंपन्यांत कमी-अधिक प्रमाणात यशस्वी झाल्याचं सांगण्यात येतंय. इंग्लंडमधील कर्मचाऱ्यांनाही ही योजना चांगलीच आवडलेली आहे. 61 कंपन्यांतील कर्मचाऱ्यांनी आपला सरासरी पगार मिळवण्यासाठी आठवडाभरात या 4 दिवसांत 34 तास काम केलं. या 61 पैकी 56 कंपन्यांनी म्हणजेच सुमारे 92 टक्के कंपन्यांनी हाच पॅटर्न आता लागू करण्याचा निर्णय घेतलाय. यातल्या 18 कंपन्यांनी हा निर्णय कायमस्वरुपी करण्याचा निर्णय घेतला आहे.
इंग्लंडमधील फोड डे वीक ग्लोबल या स्वयंसेवी संस्थेनं ही पथदर्शी योजना राबवली होती. त्यात इंग्लंडमधील 3 हजार कर्मचाऱ्यांना पाच दिवसांच्या पगारात चार दिवस काम करण्यास सांगण्यात आलं होतं.
नोकरीबाबात कर्मचारी खूश
या 62 कंपन्यांनी जाहीर केलेल्या त्यांच्या अहवालात, अनेक कंपन्यांना होणारा नफा हा तितकाच राहिला आहे. उलट काही कंपन्यांना गेल्या 6 महिन्यांत अधिक नफा मिळाल्याचं सांगण्यात आलंय. अनेकांचं स्वप्न असलेला 4 डे वीक आता प्रत्यक्षात उतरेल अशी आशा आता व्यक्त करण्यात येतेय. या प्रयोगात सहभागी झालेल्या 71 टक्के कर्मचाऱ्यांनी आता कमी थकायला होत असल्याचं सांगितलंय. तर 39 टक्के कर्मचाऱ्यांनी तणाव कमी झाल्याचं सांगितलंय. तर 48 टक्के कर्मचाऱ्यांनी आधीच्या तुलनेत आता नोकरीबाबत अधिक संतुष्ट असल्याचं म्हटलंय.