भारताच्या '7 सिस्टर्स' बनतील आशियाच्या प्रगतीचा मार्ग, BIMSTEC मध्ये मोठी योजना ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
बँकॉक : भारताच्या ईशान्येकडील राज्ये, ज्यांना ‘सात सिस्टर्स’ म्हणून ओळखले जाते, त्या आता आशियाच्या प्रगतीचा मुख्य मार्ग बनणार आहेत. BIMSTEC (बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी-सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक को-ऑपरेशन) शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी एक महत्त्वाकांक्षी योजना सादर करणार आहेत. ही योजना भारताच्या ईशान्य भागातील कनेक्टिव्हिटी सुधारण्याबरोबरच दक्षिण आणि आग्नेय आशियातील व्यापार आणि सहकार्य वाढविण्यास मदत करणार आहे.
भारताच्या ईशान्येकडील प्रदेशातील इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गेल्या काही वर्षांत मोठी सुधारणा झाली आहे. रस्ते, पूल आणि रेल्वे मार्गांची मोठ्या प्रमाणावर उभारणी करण्यात आली आहे. यामुळे केवळ भारताचा अंतर्गत विकास होणार नाही, तर हा भाग दक्षिण आणि आग्नेय आशियातील देशांसाठी व्यापाराच्या नव्या संधी निर्माण करणारा प्रवेशद्वार ठरेल.
BIMSTEC च्या अजेंड्यावर असलेल्या सागरी वाहतूक करारामुळे भारत आणि दक्षिण-पूर्व आशियातील देशांमधील व्यापाराला चालना मिळेल. हा करार केवळ व्यापार वाढविण्यासाठी नाही, तर भारताचा पॅसिफिक महासागरातील प्रभाव वाढवण्यासाठीही महत्त्वाचा आहे. त्यामुळे भारताला चीनच्या वाढत्या प्रभावाला टक्कर देता येईल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 4.5 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीचा पृष्ठभाग कसा होता? थरथरणाऱ्या पृथ्वीने उघड केली गूढ रहस्ये
BIMSTEC मंत्रीस्तरीय बैठकीत भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले की भारत बंगालच्या उपसागरात सर्वात मोठा समुद्रकिनारा असलेल्या देशांपैकी एक आहे. तसेच, भारताने BIMSTEC च्या पाच देशांशी थेट सीमा सामायिक केल्या आहेत आणि या देशांना जोडण्याची क्षमता भारताकडे आहे. BIMSTEC देशांची एकत्रित लोकसंख्या 1.73 अब्ज आहे आणि यांची अर्थव्यवस्था 5.2 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत आहे. त्यामुळे या देशांमध्ये मजबूत कनेक्टिव्हिटी झाल्यास आशियातील व्यापाराचा संपूर्ण नकाशा बदलू शकतो.
गेल्या काही वर्षांतील जागतिक परिस्थिती पाहता, भारताने प्रथम थायलंडला ईशान्य भारताशी जोडण्याची योजना आखली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास, भारत व्हिएतनाम, कंबोडिया, इंडोनेशिया आणि फिलिपाइन्सपर्यंत पोहोचू शकतो. या देशांचा चीनशी दक्षिण चीन समुद्रावर तणाव आहे. त्यामुळे भारताने या देशांना जोडणारा कॉरिडॉर उभारल्यास त्याला मोठा भूराजकीय फायदा मिळू शकतो.
BIMSTEC अंतर्गत सागरी वाहतूक करारामुळे या देशांमधील बंदर शुल्क कमी होणार आहे. तृतीय देशांच्या बंदरांमधून ट्रान्सशिपमेंटला परवानगी मिळणार असून प्रादेशिक व्यापार वाढणार आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरातील व्यापारसंबंध मजबूत होतील.
भारताचा 41,000 कोटी रुपयांचा ‘ग्रेट निकोबार बेट प्रकल्प’ आंतरराष्ट्रीय ट्रान्सशिपमेंट बंदर म्हणून विकसित केला जात आहे. या बंदरात दरवर्षी 16 दशलक्ष कंटेनर हाताळण्याची क्षमता असेल. त्यामुळे भारत जागतिक पुरवठा साखळीत महत्त्वाचा खेळाडू बनेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारतीयांना का आवडते थायलंड? धक्कादायक सर्वेक्षणात नवीनच माहिती आली समोर
भारत BIMSTEC अंतर्गत मजबूत कनेक्टिव्हिटी विकसित करून संपूर्ण आशियाच्या व्यापार नकाशावर आपली छाप सोडण्याच्या तयारीत आहे. बांगलादेश आणि चीनच्या हालचालींना प्रत्युत्तर देत, भारताने आपली रणनीती अधिक आक्रमक बनवली आहे. ईशान्य भारताच्या विकासासोबतच तो संपूर्ण आशियाच्या आर्थिक वाढीचा केंद्रबिंदू बनेल, हे निश्चित आहे.