पॅलेस्टाईनला समर्थन देणं पडलं माहागात; ॲमेझॉनने कर्मचाऱ्याला दाखवला बाहेरचा रस्ता
ॲमेझॉन ही जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी आहे. या कंपनीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कंपनीतून एका पॅलेस्टिनी समर्थकाला बाहेर काढण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंजिनियर अहमद शाहरुर यांला कामावरुन काढून टाकण्यात आले आहे. हा निर्णय त्याच्या राजकीय भूमिकेमुळे आणि पॅलेस्टिनींना समर्थनामुळे घेण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे.
सध्या जगभरात इस्रायल आणि पॅलेस्टिनी संघर्षाची चर्चा सुरु आहे. गेल्या दोन वर्षापासून सुरु असलेल्या इस्रायल आणि हमास युद्धामुळे अनेक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे पॅलेस्टिनींनी इस्रायलला विरोध केला असून स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली आहे. सध्या यावर आंतरराष्ट्रीय स्तरवार चर्चा सुरु आहे. याच वेळी ॲमेझॉनच्या या निर्णयामुळे पॅलेस्टिनी समर्थकांमध्ये तीव्र आक्रोश निर्माण झाला आहे.
या कारणामुळे अहमदला केले निलंबित
अहमद शाहरुर गेल्या तीन वर्षांपासून ॲमेझॉनमध्ये Whole Foods विभागामध्ये सिएटल कार्यलयात काम करत होता. त्याने कंपनीच्या प्रोजेक्ट निम्बस या कराराला विरोध केला होता. यामुळे त्याला काढून टाकण्यात आले असल्याचे त्याने म्हटले आहे.
काय आहे प्रोजेक्ट निम्बस?
‘प्रोजेक्ट निम्बस’ हा २०११ मध्ये गुगल आणि ॲमेझॉनच्या सहकार्याने सुरु झालेला प्रकल्प आहे. या प्रकल्पाअंतर्गत इस्रायल सरकारला कृत्रिम बुद्धिमता (AI) डेटा सेंटर, तसेच संगणकीय डेटाची माहिती उपलब्ध करुन दिली जात होती. यामुळे शाहरुरने ॲमेझॉनच्या या प्रकल्पाला विरोध केला होता. त्याने म्हटले होते की, इस्रायल या तंत्रज्ञानाचा वापर पॅलेस्टिनींवर दडपशाही करण्यासाठी करत असल्याचे त्याने म्हटले. याबाबत त्याने Slack नावाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली होती.
ॲमेझॉनने दिली प्रतिक्रिया
याच वेळी ॲमेझॉनने अहमद शाहरुरला कामावरुन काढून टाकण्यामागचे कारण, त्याने कंपनीच्या धोरणांचे उल्लंघन केले असल्याचे म्हटले आहे. अहमद शाहरुरने कंपनीच्या इंटनरल पॉलिसींचे उल्लंघन केले आहे. यामुळे अधिकृत निवेदन जारी करत कंपनीने स्पष्ट केले आहे की, अहमदने अंतर्गत माहिती सोशल मीडियावर टाकली असून हे कंपनीच्या धोरणंविरोधात आहे. यामुळे त्याला तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. मात्र शाहरुर याने दावा केला आहे की, त्याने केवळ त्याचे मत मांडले होते आणि हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे.
ॲमेझॉनवर टीका
सध्या ॲमेझॉनच्या या निर्णयावर तीव्र टीका केली जात आहे. शहरुर याने आरोप केला आहे की, कंपनी पॅलेस्टिनी लोकांची भूमिका दाबण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी फ्रान्समध्ये देखील एका कर्मचाऱ्याला इस्रायलविरोधी पोस्टमुळे नोकरी गमवावी लागली होती. परंतु कंपनीच्या मते, ॲमेझॉन कोणताही प्रकारचा भेदभाव करत नाही, धमकी देत नाही, आणि कर्मचाऱ्यांना असुरक्षित वाटेल अशी कृतीही सहन करत नाही.
यापूर्वी मायक्रोसॉफ्टने देखील असेच एका कर्मचाऱ्याला कंपनीतून काढून टाकले होते. या घटनांमुळे मोठ्या कंपन्यांवर आंतरराष्ट्रीय कामगार संघटनांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणामुळे एकीकडे कॉर्पोरेट कंपन्यांच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.