डोनाल्ड ट्रम्प राजीनामा देणार? आज रात्री होणार मोठी घोषणा, चर्चांना उधाण (फोटो सौजन्य-X)
Donald Trump Announcement: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीबाबत अनेक अफवा पसरल्या आहेत. याचदरम्यान व्हाईट हाऊसने जाहीर केले की ट्रम्प आज रात्री एक मोठे विधान करतील. सोशल मीडियावर राजीनामा आणि टॅरिफच्या चर्चांना उधाण आले आहे.
गेल्या आठवडाभरापासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सार्वजनिक कार्यक्रमांना अनुपस्थित होते. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबद्दल विविध अटकळ बांधली जात होती. याचदरम्यान आता व्हाईट हाऊसने माहिती दिली आहे की, ट्रम्प आज रात्री ११:३० वाजता एक मोठी घोषणा करणार आहेत. या घोषणेनंतर सोशल मीडियावर विविध प्रकारचे तर्क-वितर्क लावले जात आहे. जसे की, ट्रम्प राजीनामा देणार आहेत. काही जण म्हणत आहेत की एक मोठी घोषणा केली जाणार आहे, जी अमेरिकेच्या इतिहासात आजपर्यंत घडलेली नाही.
यावेळी, व्हाईट हाऊसने पत्रकारांना सांगितले की राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मंगळवार, २ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता (अमेरिकेच्या वेळेनुसार) म्हणजेच रात्री ११:३० वाजता (भारतीय वेळेनुसार) मोठी घोषणा करतील. यानंतर, नवीन सिद्धांत समोर येत आहेत. ट्रम्प गेल्या आठवड्यापासून सार्वजनिक ठिकाणी दिसले नाहीत. यामुळे त्यांच्या प्रकृतीबद्दल विविध अफवा पसरत आहेत.
इंटरनेटवर ज्या सिद्धांताची सर्वाधिक चर्चा होत आहे ते म्हणजे, ट्रम्प अध्यक्षपदाचा राजीनामा देतील का? जरी हा सिद्धांत विचित्र वाटत असला तरी, ट्रम्प यांच्या प्रकृतीबद्दल उपस्थित होत असलेल्या प्रश्नांमुळे चर्चांना उधाण आले आहे. गेल्या शुक्रवारी, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ट्रम्प इज डेड आणि व्हेअर इज ट्रम्प? असे हॅशटॅग ट्रेंड करू लागले. २७ ऑगस्ट रोजी व्हाईट हाऊसच्या कॅबिनेट बैठकीपासून ट्रम्प सार्वजनिक ठिकाणी दिसले नाहीत. त्याच बैठकीतील त्यांचा एक फोटो व्हायरल झाला, ज्यामध्ये त्यांच्या हातावर दुखापतीचे चिन्ह दिसत होते. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी स्पष्ट केले की ट्रम्प यांच्या हातावर हे चिन्ह सतत हस्तांदोलनामुळे आले होते, परंतु अफवा थांबल्या नाहीत. ३० ऑगस्ट रोजी ट्रम्प यांना व्हर्जिनियातील त्यांच्या गोल्फ क्लबमध्ये दिसले. पण तरीही ही सिद्धांत इंटरनेटवर पसरला की तिथे दिसणारी व्यक्ती खरी ट्रम्प नव्हते. दरम्यान, ट्रम्प त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर सतत सक्रिय राहिले. काही लोकांनी विनोदाने लिहिले की कदाचित आज नवीन अध्यक्ष घोषित होणार आहे. त्याच वेळी, कोणीतरी म्हटले की, कदाचित ट्रम्प आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा देतील आणि लगेचच नवीन उपाध्यक्ष निवडले जातील.
🚨 BREAKING: President Trump will be making an “announcement” from the Oval Office Tuesday at 2pm ET
Get ready 😏
What’s it going to be this time?! pic.twitter.com/ZUBY8a5VLF
— Nick Sortor (@nicksortor) September 2, 2025
काही तज्ञांचे मत आहे की, ट्रम्प यांची घोषणा व्यापार आणि टॅरिफ धोरणाशी संबंधित असू शकते. खरं तर, अलीकडेच ट्रम्प प्रशासनाने भारतावर ५०% टॅरिफ लादला. यातील २५% टॅरिफ म्हणजे रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल शिक्षा असल्याचे म्हटले जात होते. भारताने या दबावापुढे झुकण्यास नकार दिला. सोमवारी, चीनमध्ये झालेल्या एससीओ शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट झाली. तिन्ही नेत्यांच्या मैत्रीपूर्ण छायाचित्रांमुळे वॉशिंग्टनमध्ये खळबळ उडाली. त्यानंतर काही तासांनी ट्रम्पने सोशल मीडियावर लिहिले की भारत-अमेरिका व्यापार पूर्णपणे एकतर्फी आहे आणि आता खूप उशीर झाला आहे. अमेरिकन मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे की ट्रम्प आता भारतातून येणाऱ्या औषधांवर देखील टॅरिफ लादण्याचा विचार करत आहेत. जर असे झाले तर भारतीय औषध उद्योगाला मोठा फटका बसेल, कारण त्यांच्या सुमारे ४०% औषधांची अमेरिकेत निर्यात केली जाते.