ट्रम्पच्या धोरणांनी अमेरिकी जनताही त्रस्त; डोनाल्डसाहेब मात्र टॅरिफ लावण्यात व्यस्त ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
वॉशिंग्टन डीसी : अखंड विश्वात अमेरिका हा कमालीचा चंगळवादी देश म्हणून ओळखला जातो. या देशातील लोक नेहमीच गरजेपेक्षा जास्त वस्तूंची खरेदी करतात. त्यांना इम्पलसिव्ह बायर किवा शौकिन खरेदीदार म्हटले जाऊ शकते. एखाद्या वस्तू, पदार्थाची एक्सपायरी डेट जवळ आली असल्यास ते फेकूनही दिले जाते. नाताळ किवा इतर उत्सवी काळात घरातील जुन्या वस्तूंच्या जागी नव्या वस्तू येतात. फ्रीज, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स, मॅट्रेसेस सगळे काही बदलून टाकले जाते. जुन्या वस्तू विकत नाहीत, तर धर्मार्थ दान करून टाकल्या जातात किंवा रस्त्याच्या कडेला ठेवून दिल्या जातात. कोणी गरजू त्या वस्तू घेऊन जातो. मुलांची खेळणी, डॉल हाऊस, दोन-चार वेळा वापरलेले कपडे वगैरे बाहेर काढले जाते. कुठे कुठे तर जुन्या अलिशान कारचे कब्रस्तानही आढळून येईल. नवी गाडी घेतली की चालू स्थितीत असलेली जुनी गाडी सोडून दिली जाते.
चर्चमधील चॅरिटी बॉक्समध्ये नवेकोरे सूट दिसून येतात. क्वचित एखाद्यावेळी घातले असतील आणि रंग किंवा शिवणकाम आवडले नसेल म्हणून हे हे महागडे सूट असे अमेरिकी जनतेच्या खर्चिक राहणीमानाची ही एक बाजू आहे. तर दुसरीकडे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे या देशातील ज्येष्ठ नागरिक मात्र त्रस्त दिसून येत आहेत. मुलेबाळे सोडून गेली आहेत. आता आधार सामाजिक सुरक्षा निधीतून मिळणाऱ्या पैशाचाच आहे. त्यासाठी आपल्या निवृत्तीच्या ४०-५० वर्षे आधीपासून हे लोक अंशदान देत आले आहेत. परंतु आता मात्र ते साशंक आहेत. थोडे थोडे करून आपणच बचत केलेले हे पैसे आपल्याला मिळतील की नाही ही धास्ती या मंडळींना सतावते आहे. ओबामा केअरचे लाभार्थी असलेल्या लोकांना योजना बंद होण्याचा धोका दिसत आहे. सरकारी मदतीविना अमेरिकेत उपचार, शस्त्रक्रिया कमालीच्या महागड्या आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pakistan Ram Mandir: पाकिस्तानात बांधले जात आहे भव्य राम मंदिर! भारतातून आणली जाणार ‘ही’ खास वस्तू
शेतकरीही वैतागले
शेती व्यवसाय सोडून गावातील लोक शहरात राहायला येऊ नयेत म्हणून अमेरिकेत शेतकऱ्यांना भरघोस सबसिडी दिली जाते. सरकारी खर्चात कपातीच्या योजनेने शेतकऱ्यांना आर्थिक आधारही हिरावला गेला आहे. दूध, चीज, अंडी व भाज्या उत्पादक लहान शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी गतवर्षी मदत जाहीर करण्यात आली होती. यावेळीही सरकारी मदत मिळण्याच्या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी कर्जे काढली आहेत. परंतु ऐनवेळी सरकारी मदत बंद करण्यात आल्याने या वर्गाला धक्काच बसला आहे. वारंवार कोसळणारा शेअर बाजार आणि बिघडलेली आर्थिक समीकरणे पाहून ट्रम्पसमर्थक धनाढ्य वर्गदेखील अस्वस्थ आहे. पाठिराख्यांना अजूनही भरवसा ट्रम्प यांच्या पाठिराख्यांना मात्र अजूनही त्यांच्यावर भरवसा आहे. ते जे काही पावले उचलत आहेत ती अमेरिकेच्या हिताचीच आहेत आणि त्याचे दूरगामी परिणाम चांगलेच असतील, असे या लोकांना वाटते. सध्या येणाऱ्या अडचणी या तात्पुरत्या असून, ट्रम्प यांच्या धोरणांमुळे अमेरिका आणखी भक्कम व महान ठरेल, असा विश्वास या लोकांना वाटतो. अमेरिकेत आयटीसह इतर क्षेत्रांत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या भारतीयांना मात्र पुढचा काळ आणि आपले भविष्य अधांतरी असल्याचे दिसून येत आहे. शुल्कयुद्धामुळे परकीय राष्ट्रच नव्हे, तर अमेरिकी नागरिकदेखील धास्तावले आहेत. आजवर चालत आलेली घडी विस्कटून टाकत मोठा भूकंप आल्याची भावना त्यांच्यात बळावत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : चीनने बांधला जगातील सर्वात उंच पूल; स्वतःचाच विक्रम मोडण्यास सज्ज, पाहा VIDEO
बुद्धिजीवी वर्गालाही तडाखा
खर्चाला कात्री लावण्याच्या नावाखाली विद्यापीठांच्या अनुदानात कपात किंवा ते बंदच करण्यामुळे शास्त्रज्ञ, प्रोफेसर, संशोधक हतबुद्ध झाले आहेत. निधीच नसेल तर विज्ञान-तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, औषधनिर्माण व जैवतंत्रज्ञानासारख्या प्रांतात संशोधन होणार तरी कसे? परदेशातील विद्यार्थ्यांच्याम माध्यमातून गलेलठ्ठ रक्कम येत होती, परंतु व्हिसा निर्बंध लावण्यात आल्याने अशा विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. अनेक विद्यापीठे आणि महाविद्यालये बंद करण्याचे संकट ओढवले आहे. मुलांना मोफत भोजन, शिक्षक भरती तथा व्यावसायिक प्रशिक्षणावरही उलट परिणाम होत आहे. शिष्यवृत्तीची रक्कमही दिली जात नाही. सरकारी क्षमतावाढीच्या डीओजीई कार्यक्रमाने अशी काही खर्चकपात चालवली आहे की, चंगळवादप्रधान अर्थव्यवस्थेला जबर धक्का बसला आहे. लोकांनी आंदोलन केले, रस्त्यावर उतरले परंतु सरकार मात्र ढिम्मच राहिले.