अर्जेंटिनात फ्लाइट इन्स्ट्रक्टरची उडत्या विमानातून उडी; ट्रेनी पायलटचा गोंधळ उडाला अन्...; जाणून घ्या पुढं काय घडलं? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मीडिया रिपोर्टनुसार, ०४ जुलै रोजी ही घटना घडली. अर्जेंटिनातील कॉर्डोबा प्रदेशात टोलेडे परिसरात एका फ्लाइट इन्स्ट्रक्टरने उडत्या विमानातून उडी मारली. या वैमानिकाची ओळख ४२ वर्षीय लिएंड्रो अँड्रेस बर्टाजो अशी पटवण्यात आली आहे. लिएंड्रो स्थानिक पायलट प्रशिक्षक केंद्रात कार्यरत होता. घटनेच्या वेळी तो ट्रेनी पायलट रोसारियोला विमान उडवण्याचे प्रशिक्षण देत होता.
यावेळी उड्डाण सुरु असताना अचानक लिएड्रो याने हेडफोन काढले, सीटबेल्ट सोडला आणि विमानाचे दार उघडले. यानंतर उडी मारण्यापूर्वी त्याने ट्रेनीला तुला काय करायचं आहे, ते माहित आहे असे म्हटले आणि पॅराशूटशिवाय उडत्या विमानातून उडी मारली. यामुळे जमिनीवर आदळताच त्याचा जागीच मृत्यू झाला.
या अचानक झालेल्या घटनेमुळे ट्रेनी पायलटलचा काही क्षण गोंधळ उडाला होता. परंतु तिने धीर धरत तातडीने एअर ट्राफिक कंट्रोलशी संपर्क साधला. एअर ट्राफिक कंट्रोलच्या मदतीने विमान सुरक्षितपणे लँड केले. विमान लँडकेल्यानंतर ट्रेनीनी संपूर्ण घटनेची माहिती अधिकाऱ्यांना दिली. यानंतर बचाव पथकाने पायलटचा मृतदेह शोधून काढला.
सध्या या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात विमानात कोणताही तांत्रिक बिघाड नसल्याचे आढळले. तसेच पायटचाही तोल जाऊन अपघात झाल्याचे पुरावे आढळले नाहीत. यामुळे पायटलने आत्महत्या केल्याची जास्त शक्यता आहे. सध्या या आत्महत्येमागच्या कारणाचा शोध घेतला जात आहे.
फ्लाइट प्रशिक्षण केंद्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, उड्डाणापूर्वी लिएंड्रोच्या वागणुकीत कोणत्याही संशायस्पद हावभाव किंवा हालचाली जाणवल्या नाहीत. तो नेहमीप्रमाणे पायलटला प्रशिक्षण देण्यासाठी उड्डाणास गेला होता. परंतु काही वैयक्तिक अडचणीमधून जात असल्यानेच त्याने आपले जीवन संपवले असण्याची शक्यता अधिक व्यक्त केली जात आहे. या घटनेने अर्जेंटिनात खळबळ उडाली आहे.






