फोटो सौजन्य: सोशल मीडिया
ढाका: सध्या भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध अधिक बिघडत चालले आहेत. बांगलादेश सोडून आल्यानंतर शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला त्यानंतर वातावरण अधिकच चिघळले. दरम्यान बांगलादेशने भारताकडे आपल्या माजी पंतप्रधान शेख हसीनाच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे. बांगलादेश सरकारने भारत सरकारला पत्र पाठवले असून, त्यात शेख हसीना यांना बांगलादेशात न्यायालयीन प्रक्रियेच्या अंतर्गत परत पाठविण्याची विनंती केली आहे.
शेख हसीना यांना परत पाठवण्याची मागणी
बांगलादेशचे परराष्ट्रविषयक सल्लागार तौहीद हुसैन यांनी म्हटले आहे की, “आम्ही भारत सरकारला कळवले आहे की, बांगलादेश सरकारला शेख हसीना न्यायिक प्रक्रियेतील भाग म्हणून बांगलादेशात परत याव्यात.” तसेच बांगलादेशचे गृहविषयक सल्लागार जहांगीर आलम यांनी असेही म्हटले की, त्यांच्या मंत्रालयाने परराष्ट्र मंत्रालयाला पत्र पाठवून शेख हसीनाच्या भारतातून बांगलादेशात परत पाठविण्याची मागणी केली आहे. त्यानंतर बांगलादेशचे परराष्ट्र मंत्रालय भारताकडे शेख हसीनाच्या प्रत्यर्पणाची मागणी करत आहे.
रत आणि बांगलादेशात 2013 सालचा प्रत्यर्पण करार
मिळालेल्या माहितीनुसार, भारत आणि बांगलादेशात 2013 साली एक प्रत्यर्पण करार करण्यात आला होता. या करारांतर्गत, दोन्ही देशांनी प्रत्यर्पणीय अपराधांसाठी आरोपी किंवा फरार व्यक्तींना एकमेकांना सुपूर्त करण्याचे ठरवले होते. बांगलादेश सरकारने सांगितले की, त्यांच्या या मागणीचा आधार 2013 च्या प्रत्यर्पण संधीवर आहे. तथापि, या संधीत एक क्लॉज असून यामध्ये असे म्हटले आहे की, जर आरोपीवर असलेले आरोप राजकारणाशी संबंधित असतील, तर त्याची प्रत्यर्पणाची मागणी नाकारली जाऊ शकते.
शेख हसीना यांच्यावरील आरोप
भारत आणि बांगलादेश यांच्यातील प्रत्यर्पण करारात काही विशिष्ट गुन्ह्यांसाठी प्रत्यर्पणाची मागणी केली जाऊ शकते. त्यामध्ये दहशतवाद, बॉम्बस्फोट, हत्या आणि अपहरण यांसारखे गंभीर गुन्हे समाविष्ट आहेत. शेख हसीनावर बांगलादेशमध्ये सामूहिक हत्या, लूट आणि जालसाजीचे आरोप आहेत. तसेच, बांगलादेशाच्या एका आयोगाने त्यांच्यावर लोकांना गहाण करून त्यांना गायब करायला सांगितल्याचे आरोप केले आहेत.
“अन्फोल्डिंग द ट्रूथ” या रिपोर्टमध्ये शेख हसीनावर अशा प्रकारचे आरोप करण्यात आले आहेत. बांगलादेश सरकारने भारताकडे पाठवलेल्या पत्रात शेख हसीनाच्या प्रत्यर्पणासाठी न्यायालयीन प्रक्रिया आणि द्विपक्षीय कराराचा आधार घेतला आहे. तथापि, राजकीय गुन्ह्यांवरून त्यांच्या प्रत्यर्पणाची मागणी नाकारली जाऊ शकते, यामुळे हा मुद्दा गुंतागुंतीचा बनला आहे.
शेख हसीनासह भारतावर आरोप
भारत आणि बांगलादेश संबंध सध्या तणावपूर्ण टप्प्यावर आहेत. अलीकडेच बांगलादेशने पुन्हा एकदा भारतावर गंभीर आरोप केले आहेत. बांगलादेशच्या अंतरिम सरकारने शेख हसीनासह भारतावर बांगला देशातील काही लोकांना गायब केल्याचा आरोप केला आहे. यामुळे दोन्ही देशांतील संबंधांवर अधिक परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.