फोर्डोवर अमेरिकेचा हल्ला अयशस्वी; अमेरिकेकडून नवे बंकर बस्टर बनवण्याचा निर्णय
मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या आण्विक कार्यक्रमावर नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिका आणि इजरायलने संयुक्तपणे आखलेली कारवाई अपेक्षित यश मिळवण्यात अपयशी ठरली आहे. इराणमधील सर्वात संवेदनशील आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या फोर्डो आण्विक केंद्रावर GBU-57 MOP (Massive Ordnance Penetrator) बंकर बस्तर बॉम्बनी केलेल्या हल्ल्याचा परिणाम अत्यंत मर्यादित ठरला. त्यामुळे अमेरिकन लष्कर आणि रणनितीकारांमध्ये खळबळ माजली आहे. आता ‘नेक्स्ट जनरेशन पेनिट्रेटर’ (NGP) या अधिक घातक शस्त्राच्या निर्मितीचा कार्यक्रम युद्धपातळीवर सुरू करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
13 जून रोजी सुरू झालेल्या इजरायल-इराण संघर्षादरम्यान अमेरिकेने फोर्डो परिसरात सहा बंकर बस्तर बॉम्ब टाकले. या बॉम्बना इतक्या खोलवर भेदकतेसाठी विकसित करण्यात आलं होतं की ते कोणत्याही बंकरला नष्ट करू शकतील, असा अमेरिकेचा विश्वास होता. मात्र, फोर्डो आण्विक केंद्र 90 मीटर खोल खडकांखाली असून, त्याच्या रचनेमुळे बॉम्बचा प्रभावव केवळ वरच्या पृष्ठभागापुरता मर्यादित राहिला. परिणामी, इराणच्या आण्विक पायाभूत सुविधांना फारसे नुकसान झाले नाही, हे अमेरिकेने स्वतः मान्य केलं आहे.
या अपयशानंतर माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अनेक उच्च अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. ट्रम्प यांनी थेट विचारलं की, “जे बॉम्ब इतके शक्तिशाली मानले गेले, त्यांनी जर प्रत्यक्षात लक्ष्य उद्ध्वस्त केलं नाही, तर आपण काय साध्य केलं?” याच पार्श्वभूमीवर पेंटॅगॉनने ‘नेक्स्ट जनरेशन पेनिट्रेटर’ प्रकल्प जाहीर केला आहे. हे नवीन बंकर बस्तर बॉम्ब अधिक खोलवर मारा करू शकतील, रॉकेट बूस्टरसारख्या सहाय्यक प्रणालींनी सज्ज असतील आणि विविध वातावरणात अचूकतेनं काम करतील, अशी माहिती आहे.
दरम्यान, इराणने आपले आण्विक स्रोत आणखी सुरक्षित करण्यासाठी पावलं उचलली आहेत. त्याने 400 किलो संवर्धित यूरेनियम ‘कुह-ए-कोलांग गज ला’ या पर्वताखाली एका नव्या बंकरमध्ये हलवले आहेत. हा पर्वत सुमारे 5000 फूट उंच असून, त्याच्या 328 फूट खोल भूमिगत भागात नवीन आण्विक केंद्र उभारण्यात आलं आहे. या कठीण दगडांमध्ये लपवलेलं केंद्र भेदणं MOP बॉम्बसाठीही कठीण असल्याचं मानलं जातं आहे.
यामुळे अमेरिकेवर दबाव वाढला आहे की, केवळ सामरिक ताकद नव्हे, तर तंत्रज्ञानाच्या आघाडीवरही पुढाकार घ्यावा लागेल. त्यामुळे नव्या बंकर बस्तर बॉम्बची निर्मिती केवळ सामरिक नव्हे, तर भौगोलिक राजकारणाचंही प्रमुख अंग ठरत आहे. सध्याच्या जागतिक घडामोडी पाहता, बंकर बस्तर युद्ध टाळण्यासाठी असो वा प्रतिकारासाठी, त्यांचा प्रभाव जागतिक स्थैर्यावर निश्चितच परिणाम करणार आहे. सध्या NGP प्रकल्पाचे तांत्रिक तपशील गुप्त ठेवले जात आहेत. मात्र, ही शस्त्र पूर्वीपेक्षा अधिक अचूक, वेगवान आणि खोलवर परिणाम करणारी असतील, असे संकेत अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिले आहेत.