फोटो सौजन्य: एक्स अकाउंट @AmbCaiRun
बिजींग: चीनने त्यांचे ड्रीम मिशन लॉंच केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार चीनने त्यांची महत्वपूर्ण अंतराळ मोहीम ‘शेन्झोऊ-19’ यशस्वीपणे प्रक्षेपित केली. या मोहिमेतून तीन चिनी अंतराळवीर सहा महिन्यांच्या दीर्घ मोहिमेसाठी तिआंगॉन्ग अंतराळ स्थानकावर रवाना झाले आहेत. चीनच्या या मोहिमेची विशेषता म्हणजे यामध्ये प्रथमच एक महिला अंतराळ अभियंता, वांग हाओझे, सहभागी झाली आहे.
चंद्रावर मानवी तळ निर्माण करण्याचे उद्देश
या मोहिमेचा उद्देश केवळ तिआंगॉन्ग स्थानकावर प्रयोग करणे नाही, तर भविष्यातील दीर्घकालीन उद्दिष्टांचा एक भाग म्हणून, 2030 पर्यंत चंद्रावर मानवी तळ निर्माण करण्याचे आणि अंतराळवीरांना चंद्रावर पाठवण्याचे आहे. चायना मॅनेड स्पेस एजन्सी (CMSA) ने या प्रक्षेपणाची माहिती देताना सांगितले की, जिउक्वान उपग्रह प्रक्षेपण केंद्रातून पहाटे बुधवारी शेन्झोऊ-19 ने उड्डाण केले.
हे देखील वाचा- Israel-Hezbollah War: हिजबुल्लाने निवडला नवा प्रमुख; कोण आहे नईम कासिम? जाणून घ्या
पहिल्यांदाच चीनची महिला अंतराळवीर सहभागी
प्रक्षेपणानंतर अवघ्या 10 मिनिटांत अंतराळयान रॉकेटपासून वेगळे झाले व आपल्याला दिलेल्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश केला. CMSA ने ही माहिती दिली की, सर्व अंतराळवीर पूर्णतः सुरक्षित आहेत आणि प्रक्षेपण यशस्वी झाले. या मिशनमध्ये कॅप्टन कै झ्यूझे, अंतराळवीर सॉन्ग लिंगडोंग आणि महिला अंतराळ अभियंता वांग हाओझे यांचा समावेश आहे. कै झ्यूझे हे अनुभवी अंतराळवीर असून, त्यांनी यापूर्वी 2022 मध्ये शेन्झोऊ-14 मिशनमध्ये सहभाग घेतला होता. सॉन्ग आणि वांग मात्र प्रथमच अंतराळात प्रवास करत आहेत.
Congratulations to the successful launch of #Shenzhou19 crewed spaceship🚀 and wish the 3 astronauts all the best! #SpaceChina pic.twitter.com/v26V0pAExK
— CAI Run 蔡润 (@AmbCaiRun) October 29, 2024
विविध तांत्रिक आणि वैज्ञानिक प्रयोग होणार
या मोहिमेअंतर्गत अंतराळवीर विविध तांत्रिक आणि वैज्ञानिक प्रयोग करतील, ज्यात अंतराळ जीवन विज्ञान, सूक्ष्म गुरुत्वाकर्षण भौतिकशास्त्र, अंतराळ सामग्री विज्ञान आणि औषध संशोधन यांचा समावेश आहे. याशिवाय, विविध वैज्ञानिक उपकरणे तसेच अंतराळ विज्ञान संशोधनाचे अत्याधुनिक उपकरणे स्थानकावर स्थापित करण्याचे कामही त्यांच्या हातून पार पडेल.
130 हून अधिक वैज्ञानिक प्रकल्प सुरू
शेन्झोऊ-19 अंतराळवीर एप्रिलच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीस उत्तर चीनच्या इनर मंगोलिया येथील डोंगफेंग लँडिंग साइटवर परत येण्याची अपेक्षा आहे. CMSA ने सांगितले आहे की, चीनने या अंतराळ स्थानकावर सुमारे 130 हून अधिक वैज्ञानिक प्रकल्प सुरु केले आहेत. या प्रकल्पामधून पुढील दशकासाठी चीनच्या अंतराळ कार्यक्रमाच्या योजनांची दृष्टी दिसते.