फोटो सौजन्य: सोशल मीडिया
जेरूसेलम: सध्या इस्त्रायल-हमास यांच्यात तीव्र संघर्ष सुरू असून एक मोठी बातमी समोर आली आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात इस्रायलच्या लष्कराला मोठे यश मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायली सुरक्षा दलांनी उत्तर गाझातील कमल अडवान रुग्णालयात छापा मारून सुमारे 100 संशयित हमास दहशतवाद्यांना ताब्यात घेतल्याचे सांगितले जात आहे. इस्रायली लष्कराने याबाबत माहिती देताना सांगितले की, त्यांनी रुग्णालयातून शस्त्रे, दहशतवादी निधी,आणि गुप्तचर दस्तऐवज जप्त केले आहेत.
हमास दहशतवाद्यांची उपस्थिती नाकारत आहे
मात्र, गाझातील आरोग्य अधिकारी आणि हमास या कारवाईत दहशतवाद्यांची उपस्थिती नाकारत आहेत. इस्रायलच्या लष्कराच्या मते, रुग्णालयातून बाहेर काढताना काही दहशतवादी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्यांना ताब्यात घेण्यात आले. इस्रायली लष्कराने या कारवाईद्वारे हमासविरोधातील मोहिमेत महत्त्वाचे यश मिळवल्याचा दावा केला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर गाझामधील परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे.
हे देखील वाचा- इजिप्तचा गाझामध्ये इस्त्रायल-हमास युद्धबंदीचा प्रस्ताव; चार ओलिसांची होणार सुटका?
“Hamas military operatives are present [in the Kamal Adwan Hospital]; they are in the courtyards, at the gates of the building, in the offices.”
This ambulance driver—who was apprehended due to suspicion of terrorist involvement—reveals how Hamas uses the Kamal Adwan Hospital… pic.twitter.com/WTXdQ4aFtQ
— LTC Nadav Shoshani (@LTC_Shoshani) October 28, 2024
गाझामध्ये परिस्थिती गंभीर
या दीर्घकालीन संघर्षात पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 43,000 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे, ज्यात मोठ्या संख्येने महिला आणि मुलांचा समावेश आहे. पायाभूत सुविधांचीही अतोनात हानी झाली आहे. तसेच गाझातील सुमारे 75 टक्के पायाभूत सुविधा मोडकळीस आल्या आहेत. पाणी, अन्न, आणि औषधांच्या तुटवड्यामुळे गाझातील नागरिकांची परिस्थिती गंभीर बनली आहे.
गेल्या व्रषभरापासून युद्ध सुरू
इस्रायल-हमास संघर्षाला गेल्या वर्षी 7 ऑक्टोबरला हमासच्या इस्रायलवरील हल्ल्याने सुरुवात झाली होती. या हल्ल्यात 1200 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आणि 250 हून अधिक नागरिक ओलीस ठेवण्यात आले. त्यानंतर इस्रायलने जोरदार प्रत्युत्तर दिले, यामुळे गाझामध्ये सतत हवाई हल्ले आणि बॉम्बफेक सुरू आहेत.
सध्या या युद्धात शांततेच्या शक्यता दिसत नसून, दोन्ही बाजूंनी गंभीर परिस्थिती आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील या संघर्षामुळे गाझातील सामान्य नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर या संघर्षावर तोडगा काढण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे, पण प्रत्यक्षात शांतता निर्माण करण्याचे प्रयत्न अद्याप अपयशी ठरत आहेत.
हे देखील वाचा- उत्तर कोरियाने रशियाला पाठवली 10 हजार सैनिकांची मदत; पेंटागॉनने केली चिंता व्यक्त