K2 सर करण्याचे स्वप्न झाले पूर्ण पण परतताना मात्र गाठले मृत्यूने; चिनी गिर्यारोहकाचा दगड पडल्याने मृत्यू ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
K2 rockfall death : पाकिस्तानच्या कराकोरम पर्वतरांगेतील जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च शिखर K2 वरून परतताना चीनच्या प्रसिद्ध गिर्यारोहक गुआन जिंग हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी K2 सर केल्यानंतर ती तिच्या पथकासोबत खाली उतरत असताना मंगळवारी अचानक दगड कोसळून ती गंभीर जखमी झाली. बचाव प्रयत्न सुरू असले तरी तिचा मृतदेह अजूनही खाली आणण्याचे काम सुरू आहे.
गुआन जिंग ही अनुभवी गिर्यारोहक असून, उच्च पर्वत मोहिमांमध्ये तिचा मोठा अनुभव होता. सोमवारी तिने 8,611 मीटर (28,251 फूट) उंच K2 शिखर यशस्वीरित्या सर केले. परंतु दुसऱ्याच दिवशी खाली उतरताना निसर्गाने कहर केला. स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार, उताराच्या कठीण भागात अचानक मोठे दगड कोसळले आणि त्यापैकी एकाने गुआनला जोरदार धडक दिली. त्या क्षणी तिचा तोल गेला आणि ती प्राणघातक जखमी झाली.
K2 हे केवळ उंचीने नव्हे तर चढाईच्या कठीणतेनेही ओळखले जाते. जगभरातील गिर्यारोहकांसाठी हे शिखर एक स्वप्न असते, पण ते पूर्ण करणे अत्यंत जोखमीचे आहे. येथील उतार अत्यंत तीव्र असून, हवामान क्षणात बदलते. वारंवार होणाऱ्या दगड कोसळण्याच्या घटना आणि हिमस्खलनामुळे हे जगातील सर्वाधिक जीवघेणे पर्वत मानले जाते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Pakistan चे वाढले प्रेम; मात्र असीम मुनीरच्या धमकीनंतरही अमेरिकेने का पाळले आहे मौन? भारताची सावध भूमिका
या घटनेने गिर्यारोहण विश्वाला अजून एक धक्का दिला आहे. कारण अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी, जर्मनीची माजी ऑलिंपिक सुवर्णपदक विजेती आणि गिर्यारोहक लॉरा डालमेयर हिचाही पाकिस्तानातील लैला पीक या पर्वतावर चढताना मृत्यू झाला होता.
लॉरा आणि तिची सोबतीण मरीना इवा, 6,069 मीटर उंचीच्या लैला पीककडे चढाई करत असताना, 5,700 मीटर उंचीवर अचानक दगड कोसळले. मरीना कसाबसा बचाव पथकापर्यंत संदेश पोहोचवू शकली, मात्र लॉरा गंभीर जखमी होऊन डोंगरावर अडकली. अखेर तिचा मृत्यू झाला.
पाकिस्तानच्या उत्तर भागात जगातील अनेक सर्वोच्च शिखरे आहेत K2, नंगा परबत, गॅशरब्रुम, ब्रॉड पीक इत्यादी. दरवर्षी जगभरातील गिर्यारोहक येथे मोहिमा आखतात. पण अलीकडच्या काळात हवामान बदल, बर्फाचे वितळणे आणि भूगर्भीय हालचालींमुळे पर्वतांवरील धोके वाढले आहेत. अनुभवी गिर्यारोहकांनाही या बदलत्या परिस्थितीत प्राण गमवावे लागत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Zardari Kashmir Speech : झरदारींचा पुन्हा काश्मीरवर विषारी प्रहार; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी भारतावर खोटारडे आरोप
K2 किंवा लैला पीक यांसारख्या पर्वतांची अप्रतिम सौंदर्यशोभा जगभरातील साहसी लोकांना खेचून आणते. मात्र, उंच पर्वत मोहिमांमध्ये प्रत्येक पाऊल अनिश्चिततेने भरलेले असते. दगड कोसळणे, हिमस्खलन, ऑक्सिजनची कमतरता, थंड हवामान आणि तीव्र उतार यामुळे एक छोटी चूकही जीवावर बेतते. गुआन जिंग आणि लॉरा डालमेयर या दोन्ही गिर्यारोहिका त्यांच्या क्षेत्रातील दिग्गज होत्या, पण निसर्गापुढे मानवी सामर्थ्यही कधी कधी अपुरे ठरते, हे त्यांच्या मृत्यूने पुन्हा अधोरेखित केले. आज या अपघातांनी संपूर्ण गिर्यारोहण विश्व शोकाकुल झाले आहे.