काश्मीरवर पुन्हा एकदा झरदारींनी ओकले विष; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी पुन्हा भारत तोडण्याबद्दल भाष्य ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Zardari Kashmir Speech : पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन म्हणजे एकीकडे स्वतःच्या तथाकथित “यशोगाथा” रंगवण्याचा आणि दुसरीकडे भारताविरोधात कटु प्रचार करण्याचा नेहमीचा साचा. यंदाही यात काही बदल झाला नाही. पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी 14 ऑगस्ट 2025 रोजी दिलेल्या भाषणात पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा उकरून भारतावर खोट्या आरोपांचा भडिमार केला.
झरदारी यांनी आपल्या भाषणात पाकिस्तानच्या अलीकडील पराभवाला विजयाचे रूप देण्याचा प्रयत्न केला. “भारताने पाकिस्तानवर हल्ला करून चूक केली, परंतु पाकिस्तानने धैर्याने आणि संयमाने उत्तर दिले. आमचा देश शांततेचा समर्थक आहे, मात्र आपली अखंडता रक्षण करण्यासाठी सदैव सक्षम आहे,” असे ते म्हणाले. याच वेळी त्यांनी “पाकिस्तान कधीही कोणाच्याही दबावाला झुकत नाही” असा ठोकताळाही लावला.
अलीकडील ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय सैन्याने मोठा यश मिळवला. या कारवाईत शंभराहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला, तर पाकिस्तानकडून भारतीय शहरांवर केलेला प्रतिहल्ला पूर्णतः अयशस्वी ठरला. मात्र, झरदारी यांनी या पराभवाचे चित्र वेगळे रंगवले. त्यांनी पाकिस्तानने भारताविरुद्धच्या संघर्षात “विजय मिळवला” असल्याचे दावे करत, “या विजयाने आम्हाला एकजुटीचे स्मरण करून दिले” असे सांगितले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Pakistan चे वाढले प्रेम; मात्र असीम मुनीरच्या धमकीनंतरही अमेरिकेने का पाळले आहे मौन? भारताची सावध भूमिका
झरदारी यांनी आपल्या भाषणाचा महत्त्वाचा भाग काश्मीरवर खर्च केला. त्यांनी म्हटले, “पाकिस्तान सदैव काश्मीरच्या लोकांसोबत आहे. त्यांचा न्यायासाठीचा संघर्ष आणि धाडस आमच्या मनाच्या जवळ आहे. त्यांचा आत्मनिर्णयाचा अधिकार मिळेपर्यंत आम्ही राजनैतिक, नैतिक आणि राजकीय पाठिंबा देत राहू.”
ही भाषा पाकिस्तानकडून नेहमीच केली जाणारी भडकावणारी आणि भावनांना पेटवणारी वक्तव्ये असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
झरदारींनी पाकिस्तानची स्तुती करत, “प्रत्येक क्षेत्रात आम्ही यशस्वी ठरलो आहोत” असा दावा केला. वास्तवात, पाकिस्तान आर्थिक संकट, राजकीय अस्थिरता, दहशतवादाचा वाढता धोका आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारी अलगद होणारी प्रतिमा यामुळे तग धरत आहे. अशा परिस्थितीत स्वातंत्र्यदिनाच्या व्यासपीठावरून दिलेले खोटारडे दावे हे केवळ जनतेची दिशाभूल करण्याचे साधन असल्याचे स्पष्ट होते.
पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त केवळ राष्ट्रपतीच नव्हे तर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही भारतावर दोषारोप लावले. त्यांनी संघर्षाची जबाबदारी भारतावर ढकलली. या दोन्ही नेत्यांची भाषणे पाहता, पाकिस्तानचे उच्चस्तरीय नेतृत्व देशातील समस्यांकडून जनतेचे लक्ष वळवण्यासाठी भारताविरोधात विषारी प्रचार करण्याच्या जुन्या डावावरच चालत असल्याचे दिसते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Karachi Aerial Firing : पाकिस्तानमध्ये हा कसला स्वातंत्र्यदिन साजरा? हवाई गोळीबारात कहर, 3 जणांचा मृत्यू, 60 हून अधिक जखमी
पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन हा प्रत्यक्षात शेजारी देशांविरोधात द्वेषाची भाषा पसरवण्याचा मंच बनला आहे. झरदारींची विधाने ही केवळ राजकीय दिखावा असून त्यामागे देशातील जनतेला बाह्य शत्रू दाखवून एकजूट ठेवण्याचा प्रयत्न आहे. पण सत्य असे की, ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकिस्तानला जबर पराभवाचा सामना करावा लागला आणि भारताने दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले.
इतिहास, वास्तव आणि आकडेवारी हे काही झरदारींसारख्या नेत्यांच्या खोटारड्या विधानांना साथ देत नाहीत, हेच यंदाच्या पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनातून अधोरेखित झाले.