सर्वपक्षीय शिष्टमंडळामध्ये कॉंग्रेस खासदार शशी थरुर यांनी कोलंबियामध्ये जाऊन ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली (फोटो - एक्स)
बोगोटा : भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये ऑपरेशन सिंदूर ही लष्करी कारवाई केली. यामध्ये 100 हून अधिक दहशतवाद्यांच्या खात्मा करण्यात आला. यानंतर भारताने सर्वपक्षीय शिष्टमंडळ तयार करुन विविध देशांमध्ये पाठवले आहे. यामध्ये काँग्रेस खासदार शशी थरूर हे सध्या कोलंबियाची राजधानी बोगोटा येथे आहेत. त्यांनी या कोलंबियातील सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले आहे. या परदेशी दौऱ्यामध्ये शशी थरुर यांनी कोलंबिया येथे पाकिस्तानचा बुरखा पुरावे देत फाडला आहे.
भारताच्या या सर्वपक्षीय शिष्टमंडळाचा उद्देश भारताच्या यशस्वी ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती विविध देण्यांमध्ये पोहचवणे आणि दहशतवादाविरुद्धच्या भारताचे प्रयत्न अधोरेखित करणे आहे. या भेटीदरम्यान, शशी थरूर यांनी कोलंबिया सरकारच्या प्रतिसादावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, दहशतवादाच्या बळींबद्दल सहानुभूती व्यक्त करण्याऐवजी, कोलंबियाने भारतीय हल्ल्यांनंतर पाकिस्तानमध्ये झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानाबद्दल शोक व्यक्त केला, जे खूपच निराशाजनक आहे, असे स्पष्ट शशी थरुर म्हणाले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “कोलंबिया सरकारच्या प्रतिसादाने आम्ही काहीसे निराश झालो आहोत. भारतीय हल्ल्यांनंतर पाकिस्तानमध्ये झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानाबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला, परंतु दहशतवादाच्या बळींबद्दल सहानुभूती दाखवली नाही. आम्हाला असे वाटते की जेव्हा हे विधान केले गेले तेव्हा परिस्थितीचे संपूर्ण चित्र कदाचित माहित नव्हते. हे आपल्यासाठी समजून घेणे खूप महत्वाचे आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे, आमच्याकडे भक्कम पुरावे आहेत. पहलगाममध्ये जेव्हा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा द रेझिस्टन्स फ्रंट नावाच्या दहशतवादी संघटनेने त्याची जबाबदारी घेतली. ही संघटना पाकिस्तानातील मुरीदके येथील लष्कर-ए-तैयबाचा एक भाग आहे. दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या आणि त्यांच्याविरुद्ध लढणाऱ्यांमध्ये कोणतीही तुलना होऊ शकत नाही,” अशी स्पष्ट भूमिका शशी थरुर यांनी मांडली असून यामध्ये त्यांनी पाकिस्तानची पोलखोल केली.
A very good turnout at our press conference yesterday has sparked off a great deal of interest in our delegation’s mission in Colombia. Augurs well for the very full day that looms ahead. pic.twitter.com/mfPYnlmSnC
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) May 30, 2025
कोणाला काही शंका असेल तर
पुढे शशी थरुर म्हणाले की, “हल्ला करणारा आणि स्वतःचा बचाव करणारा हे दोन्ही एकसारखे मानले जाऊ शकत नाही. भारत फक्त स्वसंरक्षणाचा अधिकार वापरत आहे. जर कोणाला याबद्दल काही शंका असेल तर भारत ते दूर करण्यास तयार आहे. कोलंबिया सरकारला पाकिस्तान आणि पीओकेमधील त्यांच्या लष्करी कारवायांची संपूर्ण माहिती देण्यास भारताला आनंद होईल,” असे मत शशी थरुर यांनी व्यक्त केले आहे.
आंतरराष्ट्रीय राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीवेळी तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीच्या प्रश्नावर काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले की, “त्यांना अमेरिका, फ्रान्स, युएई, सौदी अरेबिया आणि इतर अनेक देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अनेक फोन आले. आम्ही सर्वांना एकच गोष्ट सांगितली की भारताला युद्ध नको आहे, तो फक्त दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत आहे. जर पाकिस्तानने हल्ले थांबवले तर भारतही त्यांच्या कारवाया थांबवेल. जर या देशांनी पाकिस्तानला हा संदेश दिला असता तर त्याचा पाकिस्तानवर परिणाम होऊ शकला असता कारण त्यांना माहित असते की भारतही प्रत्युत्तरात्मक हल्ला थांबवेल. त्यामुळे, हे देश पाकिस्तानला पटवून देण्यात यशस्वी झाले असण्याची शक्यता आहे. परंतु या प्रक्रियेला औपचारिकरित्या मध्यस्थी म्हणणे योग्य ठरणार नाही,” अशी भारताची भूमिका शशी थरूर यांनी स्पष्ट केली. थरुर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळ गयाना, पनामा, कोलंबिया, अमेरिका आणि ब्राझील सारख्या देशांच्या दौऱ्यावर आहे हे उल्लेखनीय आहे.