file photo
इराण : इराणमध्ये १६ सप्टेंबरपासून सुरू झालेले हिजाबविरोधी आंदोलन अजूनही सुरूच आहे. यादरम्यान, इराण मधून एक मोठी बातमी समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार इराणमध्ये पहिल्यांदाच आंदोलनात सहभागी असलेल्या व्यक्तीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय 5 जणांना 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तेहरान न्यायालयाने या प्रकरणी निकाल दिला आहे.
[read_also content=”विनयभंगाच्या आरोपानंतर जितेंद्र आव्हाड देणार आमदारकीचा राजीनामा! आव्हाडांचं सूचक ट्वीट https://www.navarashtra.com/maharashtra/jitendra-ahavad-will-resign-from-mla-after-molestation-allegations-tweets-indicative-of-challenges-344468.html”]
शिक्षा ठोठावलेल्या या व्यक्तीवर सरकारी इमारतींना आग लावणे, दंगली भडकवणे आणि राष्ट्रीय सुरक्षेविरुद्ध कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर, या प्रकरणी ज्यांना ज्यांना शिक्षा झाली आहे ते सर्वजण न्यायालयात या निकालाला आव्हान देऊ शकतात, असेही सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी निदर्शनात सहभागी झाल्याबद्दल तीन प्रांतातील 750 हून अधिक लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वी, सप्टेंबरमध्ये निदर्शने सुरू झाल्यापासून राजधानी तेहरानमध्ये 2,000 हून अधिक लोकांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. दक्षिणेकडील होर्मोझगान प्रांताचे न्यायिक प्रमुख मोजतबा घरेमानी यांनी सांगितले की, अलीकडील दंगलीनंतर 164 जणांवर आरोप ठेवण्यात आले होते. त्याच्यावर खुनाला प्रवृत्त करणे, सुरक्षा दलांना हानी पोहोचवणे, शासनाविरुद्ध अपप्रचार करणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे असे आरोप ठेवण्यात आले होते.
16 सप्टेंबर रोजी पोलीस कोठडीत 22 वर्षीय महसा अमिनीचा मृत्यू झाल्यानंतर हिजाब विरोधी आंदोलनाला वाचा फुटली. 13 सप्टेंबरला महसा तिच्या कुटुंबाला भेटण्यासाठी तेहरानला आली होती. तिने हिजाब घातला नव्हता. पोलिसांनी तात्काळ महसाला अटक केली. अटकेनंतर ३ दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. अमिनीच्या मृत्यूचे कारण डोक्याला दुखापत असल्याचे सांगण्यात आले, परंतु तिच्या नातेवाईकांनी दावा केला की तिला पूर्वीपासून अस्तित्वात असलेले कोणतेही आजार नव्हते. महसा पोलिस स्टेशनला पोहोचणे आणि हॉस्पिटलमध्ये जाणे यात काय झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तेव्हापासून हे प्रकरण चर्चेत आले आणि लोकांनी याचा निषेध करण्यास सुरुवात केली.
महसा अमिनीचा मृत्यू आणि हिजाब अनिवार्य असल्याच्या निषेधार्थ अनेक महिलांनी केस कापले. एवढेच नाही तर हिजाबही जाळण्यात आला. याच्या समर्थनार्थ एका महिला पत्रकाराने व्हिडीओसोबत लिहिले – इराणच्या महिला २२ वर्षीय मेहसा अमिनीचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्याच्या विरोधात आणि केस कापून आणि हिजाब जाळून हिजाब घालणे अनिवार्य असल्याच्या विरोधात आंदोलन करत आहेत.