भारतात डम्पिंगचा धोका वाढला, रेटिंग एजन्सीचा इशारा; अमेरिकेच्या इतर देशांवरील टॅरिफचा परिणाम भारतावर दिसून येईल ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
नवी दिल्ली : अमेरिका आणि भारताच्या व्यापार संबंधांवर मोठा प्रभाव पडणाऱ्या निर्णयाचा धोका आता भारतावर गडद होत चालला आहे. अमेरिकेने चीन, बांगलादेश, पाकिस्तान आणि इतर देशांवरील आयात शुल्क वाढवले आहे, त्यामुळे या देशांतील स्वस्त उत्पादने भारतात डंप होण्याचा धोका वाढला आहे. केअरएज रेटिंग्स या नामांकित रेटिंग एजन्सीने या संदर्भात भारताला सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे.
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचा भारतावर परिणाम
अमेरिकेने नव्या धोरणांतर्गत सर्व आयात केलेल्या वस्तूंवर 10% ते 50% पर्यंत अतिरिक्त शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये भारतावर 26% अतिरिक्त शुल्क लावले जाणार आहे, तर चीन, बांगलादेश, पाकिस्तान, व्हिएतनाम यांसारख्या देशांवर अधिक कर लादण्यात आला आहे. चीनवर 34%, बांगलादेशवर 37%, तर व्हिएतनामवर 46% शुल्क लागू करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे भारतात डम्पिंगचा धोका निर्माण झाला आहे. जेव्हा एखादा देश त्याच्या उत्पादनांची किंमत कृत्रिमरित्या कमी करून दुसऱ्या देशात विकतो, तेव्हा त्याला “डंपिंग” म्हणतात. यामुळे भारतीय उत्पादकांचे मोठे नुकसान होऊ शकते, कारण परदेशी स्वस्त उत्पादने बाजारात सहज उपलब्ध झाल्यास देशांतर्गत उत्पादने मागे पडण्याची शक्यता आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अमेरिकेतील आंदोलनामुळे भारतीय बाजारपेठेला मोठा फटका; 10 सेकंदात 20 लाख कोटींचे नुकसान
किंवा याचा भारताला फायदा होईल?
हा निर्णय भारतासाठी संधीसुद्धा असू शकतो. अमेरिकेने चीन आणि इतर देशांवर जास्त शुल्क लादल्यामुळे भारतीय उत्पादकांना अमेरिकेतील निर्यात वाढवण्याची संधी मिळू शकते. विशेषतः कृषी उत्पादने, इलेक्ट्रॉनिक्स, औषधे आणि वाहनांचे भाग यांसारख्या क्षेत्रांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे.
2023-24 या आर्थिक वर्षात भारताने अमेरिकेला $77.5 अब्ज किमतीच्या वस्तू निर्यात केल्या, तर अमेरिकेकडून $42.2 अब्ज किमतीच्या वस्तू आयात केल्या. म्हणजे भारताच्या निर्यातीचा मोठा हिस्सा अमेरिकेकडे जातो, त्यामुळे या नव्या शुल्क धोरणाचा परिणाम भारताच्या व्यापार धोरणांवरही होऊ शकतो.
रत्ने आणि दागिन्यांना फटका
अमेरिकेच्या नव्या टॅरिफ धोरणाचा रत्ने आणि दागिन्यांच्या (गोल्ड-डायमंड ज्वेलरी) व्यापारावर मोठा परिणाम होईल, असा केअरएज रेटिंगचा अंदाज आहे. इलेक्ट्रॉनिक्स, कपडे, कृषी उत्पादने आणि वाहनांचे भाग यावर जास्त परिणाम होणार नसला तरी रत्ने आणि दागिन्यांच्या निर्यातीला फटका बसण्याची शक्यता आहे.
भारतीय उद्योगांसमोर नवे आव्हान
अमेरिकेच्या या नव्या धोरणामुळे भारतीय बाजारपेठेत स्वस्त विदेशी माल मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी येऊ शकतो, ज्यामुळे भारतीय उत्पादकांना मोठे आव्हान निर्माण होईल. भारतीय सरकारने डंपिंग विरोधी शुल्क लावण्याचा पर्याय निवडावा लागेल किंवा स्थानिक उत्पादनांना संरक्षण देण्यासाठी नवीन धोरणे आणावी लागतील.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ब्लॅक लाइव्ह्स मॅटर चळवळीनंतरचे सर्वात मोठे बंड ट्रम्पच्या विरोधात; का उतरले हजारो लोक रस्त्यावर?
भारताने रणनीती आखणे गरजेचे
अमेरिकेच्या नव्या व्यापार धोरणामुळे भारतासमोर संधी आणि आव्हान दोन्ही निर्माण झाले आहेत. डंपिंगचा धोका टाळण्यासाठी सरकारने आयात नियंत्रण धोरणावर भर द्यावा लागेल, तसेच भारतीय उत्पादकांना निर्यात धोरण सुधारण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे येत्या काळात भारताच्या आर्थिक आणि व्यापार धोरणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.