बलुचिस्तानमध्ये बंडखोरांचा हल्ला; बस अडवून सहा जणांची हत्या, तिघांचे अपहरण ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात पुन्हा एकदा दहशतीचा हल्ला झाला आहे. बंडखोरांनी प्रवासी बस थांबवून सहा जणांची निर्घृण हत्या केली आणि तिघांना जबरदस्तीने पळवून नेले. याशिवाय, पोलिसांच्या वाहनाजवळ झालेल्या एका बॉम्बस्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यांमुळे संपूर्ण प्रदेशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्वादर जिल्ह्यात बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडली. बंडखोरांनी ग्वादरहून कराचीला जाणारी बस ओरमारा महामार्गावरील कलमत भागात थांबवली. त्यांनी प्रवाशांना बसमधून खाली उतरवले आणि ओळखपत्रांची तपासणी सुरू केली. पंजाब प्रांतातील सहा जणांची ओळख पटल्यानंतर त्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आले. या हल्ल्यात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी असलेल्या एका प्रवाशाने गुरुवारी सकाळी रुग्णालयात प्राण सोडले. हल्लेखोरांनी तिघांना पळवून नेले असून अद्याप कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.बलुचिस्तान प्रांतातील सुरक्षा परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. १५ दिवसांपूर्वी बोलान जिल्ह्यात बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) या बंदी घातलेल्या संघटनेने एका ट्रेनवर हल्ला केला होता. या हल्ल्यात १८ सुरक्षा कर्मचाऱ्यांसह २६ जणांचा मृत्यू झाला होता.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Tariffs 2025 : टॅरीफच्या नावावर करतात तमाशा ट्रम्पच्या वागणुकीने झाली जगाची निराशा
गुरुवारी बलुचिस्तानच्या क्वेट्टा शहरातील बरेच परिसरात पोलिसांच्या वाहनाजवळ शक्तिशाली बॉम्बस्फोट झाला. मोटारसायकलमध्ये लपवलेल्या इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (IED) चा स्फोट घडवून आणण्यात आला. या भयंकर स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला असून १७ जण जखमी झाले आहेत. यातील चार पोलिसांचा समावेश आहे. चार जखमींची प्रकृती अत्यंत गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गृह मंत्रालयाने मात्र दोनच मृत्यूची अधिकृत पुष्टी केली आहे.
पाकिस्तानच्या सर्वोच्च नेतृत्वाने या हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी दहशतवाद्यांना बलुचिस्तानच्या विकासाचा शत्रू ठरवले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, “बलुचिस्तानमध्ये विकास होत असल्याचे काही शक्तींना सहन होत नाही, त्यामुळे ते अशा भ्याड हल्ल्यांना चालना देत आहेत.”
पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी जखमींना तातडीने योग्य वैद्यकीय मदत मिळावी यासाठी आदेश दिले आहेत. तसेच, गुन्हेगारांना शोधून कडक कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनीही या क्रूर हल्ल्याचा निषेध केला. “बसमधून प्रवाशांना जबरदस्तीने खाली उतरवून त्यांची हत्या करणे हे अतिशय क्रूर आणि अमानुष कृत्य आहे,” असे ते म्हणाले.
प्रांतात आणखी एका हृदयद्रावक घटनेत नसीराबादच्या सोहबत भागात एका घरावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला, त्यामध्ये तीन लहान मुले आणि एक महिला होती. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, ही हत्या जमिनीच्या वादातून झाल्याचे दिसते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : जग युद्धाच्या उंबरठ्यावर! 27 देशांना सतर्कतेचा इशारा, 45 कोटी लोकांचा जीव धोक्यात
बलुचिस्तानमध्ये सतत होणाऱ्या अशा हल्ल्यांमुळे पाकिस्तानच्या सुरक्षेसाठी गंभीर आव्हान उभे राहिले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही या हिंसाचारावर चिंता व्यक्त केली जात आहे. पाकिस्तान सरकारने या बंडखोर गटांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले असले, तरी प्रत्यक्षात परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. या घटनांमुळे बलुचिस्तानमधील सामान्य नागरिक दहशतीच्या छायेखाली जगत आहेत. प्रशासनाला आता कठोर पावले उचलावी लागतील, अन्यथा हिंसाचाराची ही लाट आणखी गंभीर रूप धारण करू शकते.