इराकमधील नरसंहाराचे काळेकुट्ट पान! अल-खफसा येथे सर्वात मोठ्या एकाच कबरीत दफन ४ हजारांहून अधिक मृतदेह ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Al-Khasfa Mass Grave : इराकच्या मोसुल शहराजवळील अल-खफसा परिसरात जगाला हादरवणारा सत्याचा काळा अध्याय पुन्हा समोर आला आहे. इराकी अधिकाऱ्यांनी येथे एक प्रचंड सामूहिक कबर खोदण्यास सुरुवात केली आहे. प्राथमिक अंदाजानुसार या कबरीमध्ये ४ ते ५ हजार मानवी अवशेष पुरलेले असावेत. २०१४ ते २०१७ या काळात आयसिस (ISIS) या दहशतवादी संघटनेने घडवून आणलेल्या रक्तरंजित नरसंहाराचे हे ठोस पुरावे असल्याचे मानले जात आहे. ही सामूहिक कबर इराकच्या आधुनिक इतिहासातील सर्वात मोठी कबर मानली जाऊ शकते. स्थानिक प्रशासन, न्यायव्यवस्था, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि इराकी शहीद फाउंडेशन यांच्या संयुक्त सहकार्याने या कबरींचे उत्खनन सुरू आहे.
२०१४ मध्ये आयसिसने इराकचा मोठा भूभाग आपल्या ताब्यात घेतला. त्या काळात मोसुल हे त्यांचे महत्त्वाचे गढ बनले होते. हजारो नागरिकांना ठार मारण्यात आले, तर अनेकांना बेपत्ता करण्यात आले. सरकारी आकडेवारीनुसार २०१४ ते २०१८ दरम्यान तब्बल ६८,२६० नागरिकांचा मृत्यू झाला. अनेक निरपराध लोक, महिला व लहान मुलांचेही प्राण निर्दयीपणे घेतले गेले.
प्रत्यक्षदर्शींच्या मते, आयसिसचे दहशतवादी कैद्यांना आणि पोलिसांना बसमध्ये बसवून या भागात आणत आणि त्यानंतर त्यांची हत्या करत. अनेकांचा शिरच्छेद करण्यात आला तर अनेकांना जमिनीत गाडण्यात आले. आज उत्खननाद्वारे उघड होत असलेले अवशेष त्या भयावह काळाच्या साक्ष देत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Crimea for Russia and Ukraine: क्रिमियावरून सुरू झाले रशिया – युक्रेन युद्ध; काय आहे ‘या’ प्रदेशाचे धोरणात्मक महत्त्व?
इराकी शहीद फाउंडेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, उत्खननाच्या पहिल्या टप्प्यात दृश्यमान मानवी अवशेष व पुरावे गोळा केले जातील. नंतर आंतरराष्ट्रीय मदतीच्या साहाय्याने संपूर्ण उत्खनन सुरू होईल. मृतदेहांचे डीएनए नमुने घेऊन पीडितांच्या कुटुंबीयांशी जुळवले जाणार आहेत. यासाठी विशेष डेटाबेस तयार करण्याची प्रक्रिया देखील हाती घेण्यात येणार आहे. तज्ज्ञांच्या मते, सुमारे ७०% मृतदेह हे इराकी सैन्य आणि पोलिसांचे असण्याची शक्यता आहे. परंतु सल्फर वॉटर आणि बॉम्बस्फोटांमुळे अनेक अवशेष नष्ट झाले असल्याने ओळख पटवण्याचे काम कठीण होईल. तरीही, हरवलेल्या व्यक्तींचे कुटुंबीय या प्रक्रियेकडे आशेने पाहत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Arakan Army landmines : भारताच्या शेजारी म्यानमार अराकान आर्मी का रचत आहे जमिनीखाली ‘स्फोटक’ कटकारस्थान?
२०१७ मध्ये आयसिसने अल-खफसा परिसराचा ताबा घेतला होता. त्यावेळी या संघटनेचे साम्राज्य इराक व सीरियामध्ये पसरले होते, जे युनायटेड किंग्डमच्या अर्ध्या भूभागाइतके होते. त्यांनी रक्काला आपली राजधानी घोषित केली होती. मात्र, त्यांच्या पराभवानंतर उघड होत असलेली ही सामूहिक कबर जगाला पुन्हा एकदा या दहशतवाद्यांच्या निर्दयी चेहऱ्याची जाणीव करून देते. इराकसाठी या उत्खननाचे महत्त्व केवळ इतिहासात नोंद घेण्यापुरते मर्यादित नाही, तर हजारो कुटुंबांना न्याय मिळवून देण्याचा तो एक महत्त्वाचा टप्पा आहे. अल-खफसा येथील प्रत्येक अवशेष हा मानवतेवर झालेल्या अमानवी अत्याचाराची नि:शब्द साक्ष आहे.