Houthi Drone Strike : इस्रायलचे 'मल्टिलेयर एअर डिफेन्स' ठरले अपयशी; हुथी ड्रोनमुळे मोठा विध्वंस,पाहा VIDEO ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Israel Ramon Airport Drone Attack : मध्यपूर्वेत सुरू असलेला तणाव दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालला आहे. इस्रायल, गाझा, इराण आणि येमेनमधील हुथी बंडखोर यांच्यातील संघर्षाने नव्या वळणावर प्रवेश केला आहे. रविवारी इस्रायलमधील रॅमन विमानतळावर हुथी बंडखोरांनी केलेल्या ड्रोन हल्ल्याने देशाच्या अत्याधुनिक बहुस्तरीय हवाई संरक्षण प्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
इस्रायली सैन्याच्या माहितीनुसार, हा ड्रोन थेट दक्षिणेकडील रॅमन विमानतळाच्या परिसरात आदळला. हल्ल्यामुळे विमानतळाच्या खिडक्यांचे काचे फुटले, धावपट्टी काही काळासाठी वापरात आली नाही आणि विमानवाहतूक दोन तासांहून अधिक काळ ठप्प झाली. इस्रायलसारख्या उच्च तंत्रज्ञान असलेल्या देशासाठी हा हल्ला मोठा धक्का मानला जात आहे.
ड्रोन आदळताच विमानतळावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सर्व उड्डाणे तातडीने थांबवण्यात आली, प्रवासी सुरक्षित स्थळी हलवले गेले. इस्रायलच्या आपत्कालीन सेवा संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, किमान दोन जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी इलात येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्याच्या वेळी कोणताही सायरन वाजला नाही, ज्यामुळे लोकांमध्ये अधिक घबराट पसरली. इस्रायली लष्कराने सांगितले की त्यांच्या रडार प्रणालीने ड्रोन शोधून काढला होता, परंतु धोक्याचा अचूक अंदाज न आल्यामुळे प्रत्युत्तर यंत्रणा सक्रिय झाली नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : mRNA vaccine cancer : रशियाची मोठी घोषणा कॅन्सरवर प्रभावी ठरणारी लस लवकरच बाजारात आणणार; वापरासाठी सज्ज
इस्रायलची ओळख जगातील सर्वाधिक आधुनिक आणि सुरक्षित हवाई संरक्षण प्रणाली असलेला देश म्हणून केली जाते. “आयरन डोम”, “डेव्हिड्स स्लिंग”, “अॅरो-३” अशा विविध स्तरांवर आधारित ‘मल्टिलेयर एअर डिफेन्स’ ही प्रणाली इस्रायलने उभारली आहे. याचमुळे हजारो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले इस्रायलने आतापर्यंत यशस्वीरीत्या परतवले आहेत.
मात्र, रॅमन विमानतळावर झालेल्या या हल्ल्याने या संरक्षणयंत्रणेतील त्रुटी उघड केल्या. लष्कर आता तपास करत आहे की ड्रोन रडारच्या नजरेतून सुटला की प्रणालीने धोका ओळखण्यात चूक केली. या घटनेनंतर इस्रायली जनतेमध्ये सरकारच्या सुरक्षाविषयक दाव्यांवर शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत.
⚡️BREAKING
Israel’s Ramon Airport terminal has been just struck by a Drone from Yemen
All airplanes have been grounded pic.twitter.com/SUOGMGqjqI
— Iran Observer (@IranObserver0) September 7, 2025
credit : social media
हल्ल्यानंतर काही वेळातच येमेनमधील इराण समर्थित हुथी बंडखोरांनी या कारवाईची जबाबदारी स्वीकारली. त्यांचे प्रवक्ते याह्या सारी यांनी जाहीर निवेदनात म्हटले की, हा हल्ला इस्रायलने गाझामध्ये केलेल्या कारवायांना दिलेले प्रत्युत्तर आहे. गेल्या काही महिन्यांपासून हुथी बंडखोर इस्रायलवर सतत लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले करत आहेत. यामुळे रेड सी (लाल समुद्र) परिसरातील जहाजवाहतूक देखील धोक्यात आली आहे.
इस्रायलने या हल्ल्यानंतर तातडीने युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या. त्यांच्या मते, हुथींच्या हल्ल्यांना ते गप्प बसून सोडणार नाहीत. इस्रायली लष्कर आधीपासूनच गाझा व लेबनॉनमधील हिजबुल्लावर हवाई हल्ले करत आहे. आता या मालिकेत येमेनमधील ठिकाणांना लक्ष्य करण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Gujarati At Target : अमेरिकेत टार्गेट स्टोअरमध्ये भारतीय महिला पकडली; चौकशीत उघड झाले धक्कादायक सत्य
इराण समर्थित हुथी बंडखोर आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाने मध्यपूर्वेतील अस्थिरतेत आणखी भर घातली आहे. सौदी अरेबिया, यूएईसारख्या देशांनीही या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही या हल्ल्याने इस्रायलच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रॅमन विमानतळावर झालेला हा ड्रोन हल्ला केवळ एक सुरक्षा घटना नसून तो इस्रायलच्या संरक्षण प्रणालीतील कमजोरीचे दर्शन घडवतो. युद्ध तंत्रज्ञान कितीही आधुनिक असले तरी प्रतिस्पर्ध्याच्या नव्या डावपेचासमोर कधी कधी ते अपयशी ठरते, हे या घटनेतून स्पष्ट झाले.