30 missiles fired at Israel by iran : अमेरिकेने इराणमधील तीन अणुस्थळांवर हल्ला केल्यानंतर याचाच प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलवर जोरदार क्षेपणास्त्रहल्ला चढवला आहे. रविवारी (दि. 22 जून 2025) सकाळी इराणने इस्रायलच्या दिशेने तब्बल ३० हून अधिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. या क्षेपणास्त्रांचा आवाज तेल अवीव, हैफा आणि जेरुसलेममध्ये ऐकू आल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.
बंकरमध्ये लपण्याचे आदेश, सायरनचा कडकडाट
इस्रायलच्या संरक्षण यंत्रणांनी तात्काळ अलर्ट जारी करत देशभरात सायरन वाजवले, तसेच नागरिकांना बंकरमध्ये किंवा संरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इस्रायलच्या संरक्षण दलाने (IDF) सांगितले की, या क्षेपणास्त्रहल्ल्यातील अनेक क्षेपणास्त्रे अडवण्यात आली असली तरी, सर्व क्षेपणास्त्रे रोखणे शक्य नाही, हेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कोणत्याही संभाव्य हानीपासून बचावासाठी नागरिकांनी अधिकृत सूचनांचे काटेकोर पालन करण्याची विनंती करण्यात आली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Iran strikes : इराणच्या मदतीला Yemenची धाव! ‘जर इराणविरोधी युद्धात सामील झाला, तर अमेरिकन जहाजांवर हल्ले करू’
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर सुरू झालेली कारवाई
अमेरिकेने रविवारी पहाटे इराणमधील तीन अणुस्थळांवर हल्ला केला. हे हल्ले अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या अणु प्रयोगशाळांवर झाले असून, त्याचा परिणाम म्हणून इराणने तत्काळ इस्रायलवर हल्ला केला, असा अंदाज आहे. इराणने हा हल्ला ‘बॅरेज स्ट्राईक’ प्रकारात केला असून, एकाच वेळी अनेक क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला.
IDF ची नागरिकांना सूचना
इस्रायल डिफेन्स फोर्सेस (IDF) ने टेलिग्रामवर जाहीर केले की, “इस्रायल राज्यावर मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रहल्ला झाला आहे. कृपया नागरिकांनी होम फ्रंट कमांडच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.” IDF ने नागरिकांना विनंती केली आहे की, हल्ल्याचे फोटो, व्हिडीओ किंवा ठिकाणे सोशल मीडियावर शेअर करू नयेत, कारण यामुळे सुरक्षा यंत्रणांची कार्यक्षमता कमी होऊ शकते आणि शत्रूला मदत होऊ शकते.
क्षेपणास्त्रांची संख्या आणि परिणाम
इस्रायली माध्यमांच्या माहितीनुसार, इराणने सुमारे २५ ते ३० क्षेपणास्त्रे डागल्याची शक्यता आहे. ही क्षेपणास्त्रे हाय-प्रिसीजन बॅलिस्टिक मिसाइल्स असल्याचे सांगितले जात आहे. संरक्षण यंत्रणांनी हवेतच अनेक क्षेपणास्त्रे निष्प्रभ केली असली तरी, काही क्षेपणास्त्रांचे स्फोट नागरिक वस्त्यांजवळ झाल्याचे वृत्त आहे.
सामाजिक माध्यमांवर तणावाचे चित्र
सोशल मीडियावरून नागरिकांनी सायरनचे आवाज, घाईघाईने बंकरमध्ये जाणारी जनता, आणि घडामोडींचे लाईव्ह फुटेज शेअर करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, IDF कडून वारंवार सूचना दिल्या जात आहेत की, कोणतीही माहिती प्रसारित करताना जबाबदारीने वागावे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंता वाढली
या वाढत्या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये चिंता निर्माण झाली आहे. अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे इराण-इस्रायल संघर्षाला आंतरराष्ट्रीय स्वरूप येण्याची शक्यता असून, मध्यपूर्वेतील तणाव कमालीचा वाढला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel Iran War : अमेरिकेचीही युद्धात जोरदार एंट्री! ‘B-2 bombers’ आणि ‘Tomahawk missiles’नी इराणमध्ये केला कहरच
खुला युद्धप्रारंभ
इराणकडून इस्रायलवर झालेला हा हल्ला केवळ प्रातिनिधिक नाही, तर एक प्रकारचा खुला युद्धप्रारंभ असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अशा वेळी दोन्ही देशांमध्ये संयम राखला जावा आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने मध्यस्थी करून तणाव निवळवावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पुढील काही तास मध्यपूर्वेच्या स्थिरतेसाठी निर्णायक ठरणार असल्याने जगाचे लक्ष या संघर्षाकडे लागले आहे.