फोटो सौजन्य: सोशल मीडिया
नवी दिल्ली: अलीकडे इस्त्रायलचे इराण, हिजबुल्लाह आणि हमास सोबत एकात वेळी तीव्र संघर्ष सुरू आहे. एकीकडे इस्त्रायल गाझामध्ये हमासवर सतत हल्ले करत आहे तर दुसरीकडे हिजबुल्लाहला लक्ष्य करत आहे. तसेच इराण हमास आणि हिजबुल्लाला पूर्ण पाठिंबा देत आहे. यामुळे इस्त्रायल इरावणर भडकले असून इराणलाही धडा शिकवण्याच्या मन:स्थितीत इस्रायल दिसत आहे. इंग्रजी वृ्त्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेची काही कागदपत्रे लीक झालेली असून यानरून इस्रायल आता इराणवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे उघड झाले आहे.
टेलिग्रामवर कागदपत्रे लीक
मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या सॅटेलाइटला अशी काही छायाचित्रे मिळाली आहेत, ज्यावरून असे दिसते आहे की, इस्रायल काही मोठ्या कारवाईसाठी आपले सैन्य तयार करत आहे. गेल्या काही दिवसांत इराण समर्थक टेलीग्राम खात्यांवर दोन दस्तावेज शेअर करण्यात आले. या कागदपत्रांमध्ये इस्रायली लष्करी सराव आणि त्याच्या संभाव्य लष्करी मोहिमांवर भर देण्यात आला आहे. यावरून इस्त्रायल इरावणवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला जात आहे.
एका दस्तावेजात इस्रायलच्या हवाई दलाच्या सरावाचे तपशील आहेत. ज्यामध्ये हवाई इंधन भरणे, शोध आणि बचाव मोहिमा, तसेच क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालींचे पुनर्स्थापन यांचा समावेश आहे. या तयारीचा उद्देश इराणवर संभाव्य हल्ल्याच्या आधी युद्धसज्जता वाढवणे आहे. दुसरा दस्तावेज इस्रायलच्या युद्धसामग्री आणि लष्करी मालमत्तेच्या हालचालींवर भर देतो, जे याचे संकेत आहेत की इराणवरील हल्ला जवळ आहे.
इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या घरावर ड्रोन हल्ले
शनिवारी, हिजबुल्लाहने उत्तर इस्रायलवर 100 पेक्षा अधिक रॉकेट्स डागले. यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि 10 पेक्षा अधिक लोक जखमी झाले. यासोबतच लेबनॉनमधून पाठवलेल्या ड्रोनने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेनंतर, नेतन्याहू यांनी हिजबुल्लाहच्या या हल्ल्याला गंभीर चूक म्हणत त्याचा कठोर प्रतिसाद दिला.
नेतन्याहू यांनी हिजबुल्लाला इराणचा एजंट म्हणून संबोधले
नेतन्याहू म्हणाले की, “इराणच्या प्रॉक्सी हिजबुल्लाहने माझ्या आणि माझ्या पत्नीच्या हत्येचा प्रयत्न करून मोठी चूक केली आहे. आम्ही आमचे शत्रूविरुद्धचे युद्ध सुरू ठेवू.” हिजबुल्लाहच्या या हल्ल्यानंतर, इस्रायलने लेबनॉनची राजधानी बेरूतमधील दहशतवादी ठिकाणांवर जोरदार हवाई हल्ले केले. नेतन्याहू यांनी हिजबुल्लाला इराणचा एजंट म्हणून संबोधले आणि त्यांच्यावर प्रतिहल्ल्याची तयारी दर्शवली. यामुळे इस्रायल आणि इराणमधील तणाव शिगेला पोहोचला आहे, आणि इस्रायलच्या आगामी हालचालींवर जागतिक लक्ष आहे.