फोटो सौजन्य: सोशल मीडिया
दमास्कस: सीरियातील असदच्या सत्तापालटानंतर इस्त्रायल सतत हल्ले करत आहे. इस्त्रालयने सीरियातील रासायनिक शस्त्रे बंडकोर गाटांच्या ताब्यात लागून नये म्हणून हल्ले केले होते. त्यानंतर देखील हे हल्ले सुरच राहिले. तसेच इस्त्रायलने सीरियाच्या नवीन सरकारला इशारा देखील दिला होता की, त्यांनी इराणला किंवा हिजहुल्लाहला कोणताही पाठिंबा दर्शवला तर याचे त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील.
आता कोणतेही कारण ऐकून घेतले जाणार नाही- अल-जुलानी
सीरियातील इस्लामिक बंडखोर गट हयात तहरीर अल-शाम (HTS) चे प्रमुख आणि बशर अल-असद सरकारला सत्तेतून हटवण्यात प्रमुख भूमिका बजावणारे अहमद अल-शारा उर्फ अबू मोहम्मद अल-जुलानी यांनी इस्रायलविषयी मोठे वक्तव्य केले आहे. अल-जुलानी यांनी एका मुलाखतीत इस्रायलच्या हवाई हल्ल्यांवर कठोर टीका केली.
त्यांनी म्हटले की, “इस्रायलकडे आता हल्ल्यांचे कोणतेही समर्थन करण्यासारखे कारण राहिले नाही.” त्यांनी इस्रायलच्या नुकत्याच झालेल्या हवाई हल्ल्यांना “सीमारेषा ओलांडणारे” आणि “अन्यायकारक तणावाला चालना देणारे” म्हटले आहे.
इस्त्रायलचे हल्ले
इस्त्रायल गेल्या काही दिवसांपासून सीरियान लष्कराच्या प्रमुख लष्करी क्षमतांवर, रासायनिक शस्त्रसाठे, क्षेपणास्त्रे, हवाई संरक्षण यंत्रणा, तसेच हवाई आणि नौदल तळांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले केले. या हल्ल्यांचा उद्देश हे शस्त्रसाठे शत्रूच्या हाती पडण्यापासून रोखणे होता.
याशिवाय, इस्रायलने गोलन उंचवट्यावरील संयुक्त राष्ट्रसंघाच्या नियंत्रणाखालील बफर झोनमध्ये प्रवेश केला. HTS च्या नेतृत्वाखालील बंडखोरांनी दमास्कस घेतल्यानंतर काही तासांतच इस्रायलने हा निर्णय घेतला. इस्रायलने हा भाग तात्पुरता घेतल्याचे सांगितले असून, हा निर्णय सीमावर्ती सुरक्षेसाठी महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे.
काय म्हणाले अल-जुलानी?
अल-जुलानी यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे तणाव टाळता येईल आणि सिरियाच्या सार्वभौमत्वाचा आदर राखता येईल असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी इस्रायलचा थेट उल्लेख न करता “कूटनीतिक उपाययोजना” हा सुरक्षेसाठी सर्वोत्तम मार्ग असल्याचे सांगितले आहे.
तसेच, त्यांनी “अविचाराने घेतलेल्या लष्करी कारवायां”ला टाळण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी म्हटले की, वर्षांभराचे युद्ध आणि संघर्षानंतर सीरियातील सामान्य थकवा आम्हाला नवीन संघर्षांमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देत नाही.
2011 पासून युद्ध सुरु
गेल्या 13 वर्षापासून सीरिया युद्धात होरपळत आहे. 2011 मध्ये असद विरोधात निदर्शने काढण्यात आली. त्यानंतर या निदर्शनांचे गृहयुद्धात परिवर्तन झाले. त्यानंतर 8 डिसेंबर रोजी असद सरकाच्या पळून जाण्यानंतर 13 वर्षांच्या संघर्षानंतर देश आता हयात तहरी अल-शाम नावाच्या बंडखोर संघटनेच्या ताब्यात आहे. सिरियाच्या संघर्षानंतर या वक्तव्याने आंतरराष्ट्रीय राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.