इराणचे हालही होणार हिरोशिमा, नागासाकी सारखे? इस्राएलच्या भीषण अणुहल्ल्यानंतर जगभरात चर्चा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Natanz nuclear site struck : इस्रायलने इराणच्या सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पांपैकी एक असलेल्या नातान्झ युरेनियम समृद्धीकरण केंद्रावर हल्ला केल्यानंतर संपूर्ण पश्चिम आशियामध्ये तणाव वाढला आहे. हा हल्ला इराणच्या अणु कार्यक्रमाला मोठा झटका मानला जात असला तरी, यानंतर एक गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. अणु तळांवर झालेल्या हल्ल्यांनंतर किरणोत्सर्ग (Radiation) होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या संदर्भात आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी (IAEA) ने स्पष्ट केले आहे की सध्या इराणमध्ये अणु किरणोत्सर्ग वाढलेला नाही. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. मात्र, या घटनेनंतर आंतरराष्ट्रीय समुदायाने चिंता व्यक्त केली आहे, कारण जर भविष्यात असे हल्ले वारंवार झाले, तर अणु किरणोत्सर्गाचा धोका वाढू शकतो, आणि त्याचे गंभीर परिणाम केवळ इराणपुरते मर्यादित राहणार नाहीत, तर शेजारील देशांनाही त्याचा फटका बसू शकतो.
नातान्झ हे इराणचे सर्वात महत्त्वाचे युरेनियम समृद्धीकरण केंद्र आहे, जेथे इराण पहिले अण्वस्त्र विकसित करण्याच्या तयारीत होता. इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेनुसार, इराणकडे याआधीच ९ अणुबॉम्ब तयार करण्याएवढे युरेनियम जमा झाले होते. या पार्श्वभूमीवर, इस्रायलच्या हल्ल्याचा उद्देश हा केवळ संरचना नष्ट करणे नव्हता, तर इराणच्या अणुकृती क्षमतेला आळा घालणे हा मुख्य हेतू असल्याचे मानले जात आहे. मात्र, अशा प्रकल्पांवर हल्ला झाल्यास किरणोत्सर्गाचे मोठे संकट उद्भवू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel Iran Row: इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराण चवताळला, 100 हून अधिक स्फोटक ड्रोनने हल्ला, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रेही सज्ज
युरेनियम हा अत्यंत जड आणि सक्रिय अणुधातू असून, याचा किरणोत्सर्ग कर्करोग, त्वचाविकार, रक्ताभिसरणातील दोष, तसेच आनुवंशिक विकृती निर्माण करू शकतो. मोठ्या प्रमाणावर किरणोत्सर्ग झाल्यास तात्काळ मृत्यूची शक्यता निर्माण होते. या किरणोत्सर्गाचा परिणाम फक्त एका पिढीपुरताच मर्यादित राहत नाही, तर याचा प्रभाव पिढ्यानपिढ्या दिसून येतो. त्यामुळे अणु प्रकल्पांवर हल्ला ही फक्त लष्करी कृती नसून मानवतेला धोक्यात आणणारी बाब मानली जाते.
इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर, इराणनेही कठोर इशारा दिला आहे. इराणच्या गुप्तचर अहवालानुसार, इस्रायलच्या सात शहरांमध्ये अणु शस्त्रं ठेवण्यात आली आहेत, आणि जर पुन्हा हल्ला झाला तर, या गुप्त अणु केंद्रांवर प्रतिहल्ला केला जाईल, असे इराणने सूचित केले आहे. नागासाकी विद्यापीठाच्या अहवालानुसार, इस्रायलकडे सध्या सुमारे ९० अणु शस्त्रे आहेत, ज्याचा उपयोग अत्यंत गंभीर परिस्थितीत केला जाऊ शकतो. या शस्त्रांचा वापर झाला, तर संपूर्ण पश्चिम आशियामध्ये प्रचंड किरणोत्सर्ग पसरू शकतो, आणि त्याचे परिणाम दशकानुदशके जाणवत राहतील.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel Iran War News Live : मध्य पूर्वेतील संघर्ष पेटला! इस्रायलच्या ‘Operation Rising Lion’ नंतर इराण आक्रमक, हवाई क्षेत्र बंद
सध्या नातान्झवरच्या हल्ल्यानंतर किरणोत्सर्ग होत नसल्याची माहिती दिली जात असली, तरी संभाव्य अणु संघर्षाच्या धोक्याची घंटा वाजली आहे. जगभरातील अणु निरीक्षक संघटना, मानवाधिकार कार्यकर्ते आणि पर्यावरण संस्था यांचे लक्ष आता इराण आणि इस्रायलकडे वेधले गेले आहे. आणखी एखादा अणु हल्ला झाला तर, तो पृथ्वीवरील नव्या विनाशकाळाची सुरुवात ठरू शकतो, असा इशारा तज्ज्ञ देत आहेत. या स्फोटांचा परिणाम केवळ दोन देशांपुरता मर्यादित राहणार नाही, तर संपूर्ण मानवजातीच्या आरोग्य, पर्यावरण आणि भविष्यासाठी गंभीर ठरू शकतो. म्हणूनच, संयम आणि संवादाची गरज आता अधिक तीव्र झाली आहे.