नवी दिल्ली – खशोगी हत्या प्रकरणात अमेरिकेने सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांना सवलत दिली आहे. व्हाईट हाऊसने १८ नोव्हेंबर रोजी ही माहिती दिली. अर्थात या खटल्यात त्यांच्यावर कारवाई होणार नाही. या निर्णयानंतर बायडेन सरकारवर टीकेची झोड उठली होती. कोणत्याही राष्ट्रप्रमुखाला कोणत्याही प्रकारची सूट देण्याची ही पहिलीच वेळ नाही, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने स्पष्टीकरण देताना म्हटले.
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे संबंध गेल्या काही काळापासून चांगले चाललेले नाहीत. हे नाते पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रिन्स सलमानला सूट देण्यात आल्याचे मानले जात आहे. मात्र, व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा प्रवक्ते जॉन किर्बी यांचे या सगळ्याचा दोन्ही देशांमधील संबंधांशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे अमेरिका आणि सौदी अरेबियामधील संबंधांवर पुनर्विचार करत आहेत. कारण ऑर्गनायझेशन ऑफ क्रूड ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीज (OPEC) ने ५ ऑक्टोबर रोजी तेल उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे अमेरिका प्रचंड नाराज आहे. सौदी अरेबिया या गटाचा प्रमुख सदस्य आहे.