लंडन: लंडनमध्ये (London) असलेल्या भारतीय उच्चायुक्तालयात खलिस्तानी समर्थकांनी प्रवेश केला आणि तिथला तिरंगा उतरवून त्यांचा झेंडा फडकावला. यानंतर भारताच्या चिंतेत वाढ झाल्याचं मानण्यात येतंय. दरम्यान या सगळ्या प्रकरणात आत्तापर्यंत भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषि सुनक (Rishi Sunak) यांनी कोणतेही भाष्य केलेलं नाही. भारतातील इंग्लंडचे राजदूत एलेक्स एसिस यांनी मात्र या घटनेची निंदा केलेली आहे. अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिलाय. मात्र या सगळ्यात इंग्लंडच्या पंतप्रधानांच्या प्रतिक्रियेकडे सगळ्यांचं लक्ष आहे. या प्रकरणात इंग्लंडला त्यांची चूक भोगावी लागेल,असा इशाराही आता देण्यात येतो आहे. सुरक्षेत चूक झाल्याचं हे मोठं प्रकरण असल्याचं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. सराकरकडून इंग्लंडच्या उच्चायुक्तांकडे (High Commission of India) या प्रकरणात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
#WATCH | United Kingdom: Khalistani elements attempt to pull down the Indian flag but the flag was rescued by Indian security personnel at the High Commission of India, London.
(Source: MATV, London)
(Note: Abusive language at the end) pic.twitter.com/QP30v6q2G0
— ANI (@ANI) March 19, 2023
इंग्लंडच्या संबंधांवर होणार परिणाम
भारताच्या उच्चायुक्तलयात रविवारी जे घडलं ते अत्यंत अयोग्य कृत्य होतं. ही घटना अतिशय दु:खद असून भारतीय वंशाचे पंतप्रधान असताना इंग्लंडमध्ये असं घडणं हे वाईट असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होतायेत. या सगळ्यात भारतासोबतचे इंग्लंडचे संबंध खराब होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. या प्रकरणात इंग्लंड सरकारही दोषी असल्याचा सूर आळवण्यात येतोय.
उच्चायुक्तालयात सुरक्षा का नव्हती भारतीय उच्चायुक्तांच्या कार्यालयाबाहेर अजिबात सुरक्षा व्यवस्था का नव्हती, असा सवाल आता विचारण्यात येत आहे. खलिस्तानी समर्थक आत प्रवेशच कसे करु शकले, असंही विचारण्यात येतंय. मात्र या घटनाक्रमाचा नवा व्हिडिओ हा भारताकडून खलिस्तान्यांना देण्यात आलेलं उत्तर मानण्यात येतंय. कोणत्याही परिस्थितीत भारत त्यांच्यापुढे झुकणार नाही, असा थेट संदेशच यातून देण्यात आला आहे.
घडलेली घटना ही व्हिएन्ना काराराचं उल्लंघन आणि आंतरराष्ट्रीय कायद्याची पायमल्ली असल्याची भूमिका भारतानं घेतलेली आहे. हे सर्व प्रकरण सुरक्षेशी संबंधित असल्याचंही सांगण्यात येतंय. हा सर्व प्रकार मिनिटभरात घडला, त्यावेळी उच्चायुक्तांच्या कार्यालयाच्या परिसरात कोणतीही सुरक्षा रक्षक नव्हते हे स्पष्ट होतंय.
कोण आहे या प्रकारामागे ?
लंडनमध्ये घडलेल्या घटनेमागे अवतारसिंह खांडा याचा हात असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. रविवारी त्याने शिख विद्यार्थ्यांना एकत्र केल्याचं सांगण्यात येतंय. भारतानं घटनेनंतर, इंग्लंड सरकारकडे खलिस्तान्यांच्या विरोधात नरमाईच्या धोरणाबाबत नाराजी व्यक्त केली, मात्र तरीही अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. परराष्ट्र मंत्रालयानं याची गंभीर दखल घेत इंग्लंडच्या उच्चायुक्तांना बोलावणं पाठवलं. तर इंग्लंडमध्ये असलेल्या भारतीय उच्चायुक्तांनी इंग्लंड सरकारकडे निषेध व्यक्त केला आहे.
सुनक सरकार काय कारवाई करणार ?
आता ऋषी सुनक सरकार या प्रकरणी काय कारवाई करणार याकडं भारताचं लक्ष आहे. मार्चमध्ये खलिस्तानी समर्थक मोठं काही करण्याच्या तयारीत असल्याचा इशारा भारतीय गुप्तचर संघटनांकडून इंग्लंडला देण्यात आला होता. मात्र तरीही सरकारने काहीच केलेले नाही. 22 मार्च रोजीही लंडनमध्ये शिख फॉर जस्टिस या नावानं भारताच्या विरोधात निदर्शनं होणार आहेत. या आंदोलनाचं नेतृत्व शिख कट्टरपंथी गुरपतवंत सिंह पन्नू करणार आहे. एसएफजेने केल्या काही काळापासून लंडनमध्ये आपले पाय रोवले आहेत. त्यासाठी निधीही जमा करण्यात येतोय. अशा स्थितीत सुनक सरकारचं मौन त्यांनाच अडचणीत ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.