म्यानमार भूकंपांनंतरही गंभीर परिस्थिती; विध्वंसानंतर लष्कराने घेतला 'मोठा' निर्णय ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
नेपिदॉ : म्यानमारमध्ये आलेल्या तीव्र भूकंपामुळे देशभरात हाहाकार माजला असून, या नैसर्गिक आपत्तीने आतापर्यंत 3,000 हून अधिक लोकांचे प्राण घेतले आहेत, तर 4,715 जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच 341 लोक अद्याप बेपत्ता असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर म्यानमारच्या लष्करी सरकारने 22 एप्रिलपर्यंत तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा केली आहे, जेणेकरून बचाव कार्य अधिक प्रभावीपणे राबवता येईल.
म्यानमारच्या संरक्षण सेवा कमांडर-इन-चीफच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले की, “भूकंपग्रस्तांप्रती सहानुभूती व्यक्त करण्यासाठी आणि मदत कार्याला गती देण्यासाठी हा युद्धविराम लागू केला जात आहे.” तसेच, देशात शांतता आणि स्थैर्य राखण्याचाही प्रयत्न करण्यात येणार आहे.
28 मार्च 2025 रोजी म्यानमारमध्ये प्रचंड तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपानंतर काही मिनिटांतच 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा आफ्टरशॉक जाणवला, ज्यामुळे मंडाले परिसरासह अनेक भागात भयानक विध्वंस झाला. रस्ते, पूल, इमारती जमीनदोस्त झाल्या असून, अनेक भागांतील वीज आणि पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.
म्यानमारच्या हवामानशास्त्र आणि हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपानंतर देशभरात 2.8 ते 7.5 रिश्टर स्केलच्या 66 हून अधिक आफ्टरशॉक्सची नोंद झाली आहे, ज्यामुळे आणखी हानी होण्याची भीती आहे. या संकटामुळे लाखो लोक बेघर झाले असून, अनेकांना अन्न, पाणी आणि वैद्यकीय मदतीची तातडीने गरज आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : BIMSTEC Summit 2025: BIMSTEC शिखर परिषदेत PM मोदी आणि मोहम्मद युनूस यांचे फोटो का झाले व्हायरल?
भूकंपाच्या पार्श्वभूमीवर म्यानमारच्या लष्करी सरकारने तात्पुरता युद्धविराम जाहीर केला आहे. या युद्धविरामादरम्यान कोणत्याही सशस्त्र गटाने नागरी वाहतुकीस अडथळा आणू नये, सामान्य नागरिकांना त्रास देऊ नये, लष्करी छावण्यांवर हल्ले करू नयेत आणि कोणत्याही प्रकारची लष्करी हालचाल करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
लष्कराने स्पष्ट केले आहे की, “जर कोणत्याही गटाने या आदेशांचे उल्लंघन केले, तर सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलली जातील.”
म्यानमारचे पंतप्रधान आणि लष्करी प्रमुख मिन आंग हलाईंग यांनी याआधी वांशिक सशस्त्र संघटनांच्या युद्धविराम प्रस्तावाला नकार दिला होता. त्यांचे म्हणणे होते की, “काही सशस्त्र गट थेट युद्धात सामील झालेले नसले तरी ते हल्ल्याच्या तयारीत आहेत, त्यामुळे लष्कराची सुरक्षा मोहीम सुरूच राहणार आहे.”
It’s completely horrendous & cruel & inhumane Myanmar’s military are carrying out deliberate air strikes & other forms of attack on civilian targets in areas impacted by last week’s 7.7magnitude earthquake which to date is confirmed having cost 3000+ lives with many more lnjured! pic.twitter.com/BIexPvT1BC
— Diana Speaks (@Diana6197Davis) April 2, 2025
credit : social media
भूकंपामुळे बाधित भागांमध्ये रुग्णालये, आपत्कालीन निवारा केंद्रे आणि मदत छावण्या स्थापन केल्या जात आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी म्यानमारला मदत पुरवण्यासाठी पुढाकार घेतला असून, जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. म्यानमारच्या लष्करी प्रशासनाने देशभरातील स्वयंसेवी संस्था, मदत कार्यकर्ते आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला भूकंपग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केले आहे. “आम्ही संकटाचा सामना करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत,” असे लष्कराच्या वतीने सांगण्यात आले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Tariff : ट्रम्प यांच्या 27% टॅरिफचा भारतावर होणार ‘असा’ परिणाम; पाहा कोणती उत्पादने महागणार?
म्यानमारमध्ये आलेल्या भूकंपामुळे देशाची अवस्था अत्यंत गंभीर झाली आहे. हजारो लोकांचा मृत्यू, हजारो जखमी आणि बेघर झालेल्या लाखो लोकांमुळे देशासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत लष्कराने युद्धविरामाची घोषणा केली असली तरी देशातील सशस्त्र संघर्ष आणि राजकीय अस्थिरतेमुळे ही मदत मोहिम कितपत प्रभावी ठरेल, यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आगामी काळात म्यानमार या संकटातून कसा सावरतो आणि युद्धविराम नंतर परिस्थिती कोणत्या दिशेने जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.