Operation Sindoor : भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर अचूक आणि निर्णायक प्रहार केला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील (पीओके) ९ दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ले केले, ज्यामध्ये कुख्यात दहशतवादी मसूद अझहरचा बहावलपूर येथील मदरसा पूर्णतः उद्ध्वस्त झाला आहे. या कारवाईने दहशतवाद्यांच्या मनात भीती निर्माण केली असून, पाकिस्तानमधील माध्यमे आणि नागरिकही हादरले आहेत.
मध्यरात्री सुरु झालेली धडक कारवाई
मंगळवार आणि बुधवारी रात्री १.३० वाजता, भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. अत्यंत गुप्तपणे आणि अचूक नियोजनासह झालेल्या या कारवाईत भारतीय वायुदल आणि आर्मीने बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद येथील दहशतवादी अड्ड्यांवर एकाच वेळी क्षेपणास्त्रे डागली. या कारवाईतील सर्वात मोठा हल्ला बहावलपूरमध्ये झाला, जिथे जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याचा मदरसा लक्ष्य करण्यात आला. चार क्षेपणास्त्रे या इमारतीवर डागण्यात आली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात ज्वाळा भडकल्या आणि मदरसा जमीनदोस्त झाला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : काय सत्य अन् काय तथ्य! ‘Operation Sindoor’नंतर पाकिस्ताननेही भारताचे पाच फायटर जेट पाडले…; पाक लष्करी प्रवक्त्यांचा दावा
पाकिस्तानी माध्यमांची पुष्टी, जनतेत घबराट
हल्ल्यानंतर, पाकिस्तानमधील एका स्थानिक टीव्ही चॅनेलने या घटनेची पुष्टी करताना सांगितले की, “शोले भड़क उठे, आसमां लाल-लाल…” अशी दृश्ये या परिसरात पाहायला मिळाली. पाकिस्तानी लष्कर आणि सुरक्षा यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या, मात्र मदरसा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे त्यांच्या प्रतिनिधींनीही कबूल केले आहे.
या हल्ल्यात एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाल्याचेही समोर आले आहे. परिसरातील रस्ते बंद करण्यात आले असून, वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. हल्ल्यानंतर बहावलपूरमधील अन्य मदरसे रिकामे करण्यात आले असून, रस्त्यावर नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
🚨 Urgent Update
Jaish-e-Mohammed sources close to Maulana Masood Azhar report that his entire family, including his elder sister, was killed in the #OperationSindoor strike on a madrasa in Bahawalpur.
No information on Masood Azhar’s status.
Awaiting official confirmation.… pic.twitter.com/2VefAKLjbC
— Sanjay Madrasi Pandey | Ex-Reuters | Ex-Telegraph (@Sanjraj) May 7, 2025
credit : social media
मौलाना मसूद अझहर, दहशतवादाचा चेहरा
मसूद अझहर हा बंदी घातलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. 2019 मधील पुलवामा हल्ला, ज्यात 40 भारतीय जवान शहीद झाले, त्यामागे याच संघटनेचा हात होता. त्याचप्रमाणे पठाणकोट एअरबेसवर झालेल्या हल्ल्यातही मसूद अझहरचाच सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. 1999 मध्ये इंडियन एअरलाइन्सचं IC-814 विमान अपहरण करून कंधारला नेण्यात आलं होतं. त्या वेळी तीन दहशतवाद्यांच्या सुटकेच्या अटीवर हा मसूद अझहर भारत सरकारला सोडावा लागला होता. त्यानंतर तो पाकिस्तानात परतला आणि दहशतवादी कारवायांची मालिका सुरू झाली.
जागतिक दहशतवादी घोषित
2019 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी मसूद अझहरला ‘जागतिक दहशतवादी’ घोषित केले. भारताने त्याच्यावर बंदी घालण्यासाठी अनेक वर्ष प्रयत्न केले होते. पाकिस्तान सरकार त्याला संरक्षण देत होते, मात्र आंतरराष्ट्रीय दबावामुळे अखेर त्याला दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘Operation Sindoor’ नंतर पाक पंतप्रधान शेहबाज शरीफ यांची पहिलीच प्रतिक्रिया; जम्मू-कश्मीरमध्ये अलर्ट, विमानसेवा विस्कळीत
भारताचा स्पष्ट संदेश, दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही
‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, दहशतवाद आणि त्याच्या समर्थकांवर ठोस कारवाई केली जाईल आणि त्यासाठी कोणतीही सीमा अडथळा ठरणार नाही. मसूद अझहरसारख्या प्रमुख दहशतवाद्याच्या अड्ड्यावर कारवाई करून भारताने पाकिस्तान आणि जगाला स्पष्ट संदेश दिला आहे – दहशतवादावर आता थेट आणि निर्णायक प्रहार होणार आहे.