फोटो सौजन्य: सोशल मीडिया
इस्लामाबाद: आज 5 जानेवारी 2025, काश्मिरी लोकांसाठी आत्मनिर्णय दिवस पाकिस्तानने साजरा केला. या निमित्ताने पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारतावर अनेक आरोप केले आहे. शहबाज यांनी म्हटले आहे की, पाकिस्तान नेहमीज जम्मू-काश्मीरच्या जनतेच्या आत्मनिर्णयाच्या अधिकाऱ्याच्या बाजून उभा राहिला आहे, तसेच भविष्यातही राजकीय व कूटनीतिक पातळीवर काश्मिरी जनतेला समर्थन देत राहील.
संयुक्त राष्ट्राच्या ठरावाचा उल्लेख
शहबाज शरीफ यांनी यावेळी 5 जानेवारी 1949 रोजी संयुक्त राष्ट्रांनी स्वीकारलेल्या ऐतिहासिक ठरावाचा उल्लेख केला. या ठरावानुसार जम्मू-काश्मीरमध्ये स्वायत्त व निष्पक्ष जनमत संग्रहाची हमी देण्यात आली होती. त्यांनी सांगितले की, आत्मनिर्णयाचा अधिकार हा संयुक्त राष्ट्राच्या चार्टरमधील एक मुख्य तत्त्व आहे. युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली दरवर्षी आत्मनिर्णयाच्या अधिकारासाठी ठराव संमत करते. मात्र, त्यांनी खेद व्यक्त केला की काश्मिरी जनता सात दशकांहून अधिक काळ या अधिकारापासून वंचित राहिली आहे.
Message of Prime Minister Muhammad Shehbaz Sharif on Right to Self-Determination Day for the People of Jammu & Kashmir pic.twitter.com/lVMbsHDLxM
— Prime Minister’s Office (@PakPMO) January 5, 2025
आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन
याशिवाय, शहबाज यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला उद्देशून आवाहन केले आहे की, आता वेळ आली आहे की संयुक्त राष्ट्र आणि इतर जागतिक संस्थांनी आपले वचन पूर्ण केले पाहिजे. जम्मू-काश्मीरमधील जनतेला आत्मनिर्णयाचा हक्क मिळवून देण्यासाठी ठोस पावले लवकर उचलण्यात यावी. त्यांनी काश्मीरमधील कथित मानवी हक्कांचे उल्लंघन थांबवण्यासाठी, राजकीय कैद्यांची सुटका करण्यासाठी आणि काश्मिरी लोकांच्या मूलभूत हक्क व स्वातंत्र्य पुनर्स्थापित करण्यासाठी जागतिक पातळीवर तातडीने कृती करण्याचे आवाहन केले.
अनुच्छेद 370 चा मुद्दा
शहबाज यांनी भारत सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी अनुच्छेद 370 रद्द केल्याचा मुद्दा देखील उपस्थित केला. त्यांच्या मते, भारताने हा निर्णय घेत काश्मिरी जनतेच्या स्वायत्ततेवर आघात केला आहे. शरीफ यांनी दावा केला आहे की, भारताचा उद्देश बहुसंख्य काश्मिरींना त्यांच्या स्वतःच्या भूमीत अल्पसंख्य बनवणे हा आहे.
राष्ट्रपतींच्या पाठिंब्याचा पुनरुच्चार
पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनीही काश्मिरी जनतेच्या संघर्षाला पाठिंबा दिला. झरदारी यांनी सांगितले की, पाकिस्तान नेहमीच काश्मिरी जनतेला राजकीय, कूटनीतिक आणि नैतिक मदत पुरवत राहील. त्यांनी भारतावर आरोप केला की तो सात दशकांपासून जम्मू-काश्मीरवर बेकायदेशीर कब्जा करत आहे आणि तेथील जनतेला हिंसाचार आणि अन्यायाचा सामना करावा लागत आहे. पाकिस्तानच्या या भूमिकेमुळे भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे.