बांगलादेशात सत्तासंघर्षाची नांदी; NSA म्हणून खलीलूर रहमानची नियुक्ती, लष्करप्रमुख जमान संतप्त ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
ढाका : बांगलादेशमध्ये राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर एक मोठी उलथापालथ घडली असून, देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या पदावर खलीलूर रहमान यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र ही नियुक्ती लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-जमान यांना धक्का देणारी ठरली आहे. कारण ही घोषणा अशा वेळी करण्यात आली, जेव्हा जमान रशिया आणि क्रोएशियाच्या दौऱ्यावर होते.
गेल्या वर्षी शेख हसीना सरकारच्या अपकर्षानंतर बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार स्थापन झाले होते. याच सरकारने ९ एप्रिल रोजी अचानक खलीलूर रहमान यांची एनएसए पदावर नियुक्ती केली. राजकीय वर्तुळात या निर्णयाने खळबळ उडाली असून, लष्कर आणि सरकार यांच्यातील सत्तासंतुलन बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
लष्करप्रमुख जनरल जमान या नियुक्तीवर अत्यंत नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विश्लेषकांच्या मते, जमान यांना पूर्णपणे विश्वासात न घेता घेतलेला निर्णय संविधानाच्या अनुषंगाने आणि लष्कराच्या सन्मानाच्या विरोधात असल्याचे मानले जात आहे. राजकीय तज्ज्ञांच्या मते, या निर्णयामुळे लष्कर आणि सरकार यांच्यात संघर्षाची स्थिती निर्माण होऊ शकते, आणि याचा थेट परिणाम मोहम्मद युनूस यांच्यावर होऊ शकतो. लष्करप्रमुखाच्या असंतोषाचा राजकीय पर्यवसान म्हणून सरकारच्या स्थिरतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहू शकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘गैर-मुस्लिम प्राण्यांपेक्षा भयंकर…’ तालिबानी मंत्र्यांचे द्वेषपूर्ण विधान, अफगाण हिंदू-शीख समाजात भीतीचे वातावरण
खलीलूर रहमान यांची प्रतिमा ही विवादास्पद आणि संदेहास्पद मानली जाते. विश्लेषक नझमुल अहसान कलीमुल्लाह यांच्या मते, रहमान यांच्यासह मोहम्मद युनूस सरकारमधील सुमारे आठ सल्लागार परदेशी पासपोर्ट धारक आहेत, ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भात गंभीर शंका उपस्थित होतात. विशेष म्हणजे, खलीलूर रहमान यांच्याकडे अमेरिकन पासपोर्ट असून त्यांचा कल अमेरिकन सुरक्षाव्यवस्थेकडे झुकलेला असल्याचे बोलले जाते. यामुळे त्यांच्या निर्णयांवर विदेशी हितसंबंधांचा प्रभाव राहू शकतो, अशी चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
खलीलूर रहमान यांचे नाव २००१ मध्ये एका महिला सरकारी कर्मचाऱ्याच्या हत्येशी जोडले गेले होते. त्याचवेळी त्यांच्यावर काही अन्य वादही होते. त्यामुळे एनएसएसारख्या अत्यंत महत्त्वाच्या पदावर त्यांची नियुक्ती करण्यापूर्वी सखोल पार्श्वभूमी तपासणी अपेक्षित होती, असे माजी लष्करी अधिकारी आणि सर्वोच्च न्यायालयाचे वकील सरवर हुसेन यांनी म्हटले आहे. हुसेन पुढे म्हणाले, “युनूस सरकारने ही नियुक्ती करताना ना कोणती चौकशी केली, ना कोणती उच्चस्तरीय सल्लामसलत घेतली. त्यामुळे हा निर्णय अधिकच संशयास्पद वाटतो.”
या प्रकरणामुळे बांगलादेशात पुन्हा एकदा सैन्य आणि नागरी सरकार यांच्यातील सत्तासंघर्षाचे संकेत मिळू लागले आहेत. लष्कराच्या असंतोषाची परिणती आगामी काळात राजकीय संकटात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, खलीलूर रहमान यांना भारताच्या अजित डोभालसारखे प्रस्थ मिळवून देण्याचा मोहम्मद युनूस यांचा प्रयत्न आहे. मात्र त्यासाठी निवडलेली व्यक्ती आणि वेळ दोन्ही अयोग्य ठरल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘ट्रम्पसमोर झुका, अन्यथा विनाश अटळ…’ इराणी अधिकाऱ्यांचा सर्वोच्च नेत्यांना इशारा
खलीलूर रहमान यांची एनएसए पदावर नियुक्ती ही फक्त एक प्रशासकीय बदल नसून बांगलादेशच्या सत्तासंरचनेत मोठी हालचाल दर्शवते. लष्करप्रमुख जमान यांचा असंतोष, रहमान यांची वादग्रस्त पार्श्वभूमी आणि सरकारची एकतर्फी कारवाई – या सगळ्यामुळे बांगलादेश पुन्हा एकदा एका राजकीय अस्थिरतेच्या उंबरठ्यावर उभा आहे. मोहम्मद युनूस यांना या निर्णयाचा राजकीय आणि प्रशासनिक फटका बसू शकतो, असे स्पष्ट संकेत सध्या दिसून येत आहेत.