रशियात शक्तिशाली भूकंप; 7.8 नोंदवली गेली तीव्रता, त्सुनामीचा इशारा जारी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मॉस्को : गेल्या काही दिवसांपासून जगातील अनेक देशांत भूकंप होताना दिसत आहे. त्यानंतर आता रशियाच्या पूर्व किनाऱ्यावर असलेल्या कामचटका द्वीपकल्पात एक अतिशय शक्तिशाली भूकंप झाला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 7.8 इतकी मोजण्यात आली. याबाबतची माहिती अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणाने दिली. भूकंपामुळे त्सुनामीचा इशाराही जारी करण्यात आला आहे.
गेल्या शनिवारी या भागात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. कामचटका द्वीपकल्पाच्या पूर्व किनाऱ्याजवळ 7.1 तीव्रतेचा भूकंप झाला. सकाळी 8:07 वाजता भूकंप झाला. त्याचा केंद्रबिंदू जमिनीपासून 60 किलोमीटर खाली होता. त्यानंतर पुन्हा एकदा याच परिसरात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षण (यूएसजीएस) नुसार, शुक्रवारी सकाळी 7.8 तीव्रतेचा भूकंप झाला. त्याचा केंद्रबिंदू रशियातील पेट्रोपाव्लोव्स्क-कामचटस्की येथे 10 किलोमीटर खोलीवर होता.
हेदेखील वाचा : Afghanistan Earthquake: भूकंपाने अफगाणिस्तान हादरला, 800 हून अधिक बळी; भारताकडून मदतीचा हात पुढे
दरम्यान, या शक्तिशाली भूकंपानंतर हवाई येथील अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान सेवेच्या पॅसिफिक त्सुनामी अलर्ट केंद्राने त्सुनामीचा इशारा जारी केला. भूकंपानंतर, स्थानिक अधिकाऱ्यांनी किनारी भागात राहणाऱ्या रहिवाशांना त्सुनामीच्या धोक्यापासून सावध राहण्याचा आणि उंच ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला.
भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी
कामचटकाच्या प्रशासनाने याबाबतची माहिती दिली असून, येथे भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती देण्यात येत आहे. तर जीवितहानी झाल्याचे कोणतेही वृत्त देण्यात आले नाही. बचावपथकाला पूर्णपणे तयार राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जुलैमध्ये ८.८ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप ज्या भागात झाला होता त्याच भागात हा भूकंप झाला. त्यानंतर, संपूर्ण पॅसिफिकमध्ये त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला.
सातत्याने होत आहेत भूकंप
रशियाच्या पूर्वेकडील काठावर असलेला कामचटका द्वीपकल्प पृथ्वीवरील सर्वात भौगोलिकदृष्ट्या धोकादायक प्रदेशांपैकी एक मानला जातो. गेेल्या शनिवारी, येथे आणखी एक शक्तिशाली ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप नोंदवण्यात आला. अशाप्रकारे या भागात सातत्याने भूकंप होताना दिसत आहे.
हेदेखील वाचा : Earthquake News : हिमालयाच्या कुशीत भीषण हालचाली, तिबेट पुन्हा थरथरला; 10 किमी खोलीवर केंद्रबिंदू