Photo Credit- X
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये रविवारी रात्री झालेल्या भूकंपाने मोठी जीवितहानी झाली आहे. या भूकंपाची तीव्रता जास्त असल्यामुळे काबुल आणि कुनारसह अनेक प्रांतांमध्ये जवळपास ८०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर २५०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. या नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या अफगाणिस्तानला भारताने तातडीने मदतीचा हात पुढे केला आहे. भारताने सोमवारीच अफगाणिस्तानसाठी मदत सामग्री पाठवली आहे.
भारताने काबुलमध्ये १,००० कुटुंबांच्या मदतीसाठी तात्पुरते निवारे (टेंट) पाठवले आहेत. याव्यतिरिक्त, भारतीय मिशनद्वारे तातडीने १५ टन खाद्य सामग्री काबुल आणि कुनारच्या दिशेने पाठवली जात आहे. मंगळवारपासून टप्प्याटप्प्याने आणखी मदत सामग्री पाठवली जाईल, असेही भारताने जाहीर केले आहे.
Spoke with Afghan Foreign Minister Mawlawi Amir Khan Muttaqi today. Expressed our condolences at the loss of lives in the earthquake.
Conveyed that India has delivered 1000 family tents today in Kabul. 15 tonnes of food material is also being immediately moved by Indian Mission… pic.twitter.com/whO2iTBjS8
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) September 1, 2025
भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मौलवी अमीर खान मुत्ताकी यांच्याशी फोनवर संवाद साधला. या संवादादरम्यान जयशंकर यांनी अफगाणिस्तानमध्ये झालेल्या जीवित व वित्तहानीबद्दल शोक व्यक्त केला आणि भारताकडून शक्य ती सर्व मदत केली जाईल, असे आश्वासन दिले. भविष्यातही ही मदत सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, भारत सर्व प्रकारे अफगाणिस्तानसोबत आहे आणि जखमींना लवकर बरे वाटावे अशी आमची प्रार्थना आहे.
नांगरहार आरोग्य विभागाचे प्रवक्ते अजमल दरवैश यांनी सांगितले की, सर्वाधिक नुकसान जलालाबाद शहर व त्याच्या आसपासच्या भागात झाले आहे. अनेक कुटुंबांनी आप्तेष्ट गमावले, घरांच्या ढिगाऱ्याखाली महिला, मुले अडकली. बचाव पथके रात्रभर ढिगाऱ्यातून जिवंत व मृतदेह बाहेर काढत होती. या धक्क्यानंतर केवळ २० मिनिटांत आणखी दोन भूकंपांनी अफगाणिस्तान हादरला एक ४.५ रिश्टर स्केलचा आणि दुसरा ५.२ रिश्टर स्केलचा. लोक भीतीने उघड्यावर धावले. घरांची छप्परे, भिंती, मशीदींचे मनोरे, शाळांची इमारती एका क्षणात कोसळल्या.
अफगाणिस्तानाचा हा भाग हिंदूकुश पर्वतरांगेत येतो. येथे टेक्टोनिक प्लेट्सच्या हालचालींमुळे भूकंप वारंवार होतात. पण इतक्या कमी खोलीचा आणि सलग धक्के देणारा भूकंप अत्यंत विध्वंसक ठरला. वृद्ध, लहान मुले, झोपडपट्ट्यांत राहणारे गरीब नागरिक हे सर्वात जास्त बळी गेले.