Princess Elisabeth of Belgium : सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि आधुनिकतेची साक्ष देणारी बेल्जियमची राजकुमारी एलिझाबेथ ही केवळ एका राजघराण्याची वारसदार नसून, एका नावयुगाच तडफदार नेतृत्व आहे. राजा फिलिप आणि राणी मॅथिल्डे यांची मोठी कन्या असलेल्या एलिझाबेथ हिने आपले शिक्षण, व्यक्तिमत्त्व आणि कार्यातून जागतिक नेतृत्वाची तयारी सुरू केली आहे.
वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी, एलिझाबेथने आपल्या गुणवत्तेची छाप यशस्वीरीत्या उमटवली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठातून इतिहास आणि राजकारण या विषयात पदवी प्राप्त केल्यानंतर आता ती हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या केनेडी स्कूलमध्ये सार्वजनिक धोरणाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेशित झाली आहे. तिचे शिक्षण केवळ शैक्षणिक यश नाही, तर राजकीय जाणिवेच्या आणि नेतृत्वक्षमतेच्या दिशेने एक पायरी आहे.
पहिली महिला सम्राज्ञी, इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्पा
एलिझाबेथ ही “डचेस ऑफ ब्राबंट” या पदवीची धारणकर्ता असून, ती बेल्जियमच्या इतिहासातील पहिली महिला सम्राज्ञी होणार आहे. हे शक्य झाले १९९१ मध्ये करण्यात आलेल्या एका ऐतिहासिक कायद्यातील दुरुस्तीमुळे, ज्यामुळे लिंगाच्या आधारावर वारसाहक्कात समानता मिळाली. त्यामुळे एलिझाबेथच्या राज्याभिषेकाने बेल्जियममध्ये स्त्रीसत्तेच्या युगाचा प्रारंभ होणार आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘operation sindoor’ नंतर प्रथमच विदेश दौऱ्यावर जाणार परराष्ट्र मंत्री जयशंकर; ‘या’ 3 देशांसोबत मिटिंग
सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच कॅम्पसजीवन
राजघराण्याचा झगमगाट असूनही, हार्वर्ड विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये एलिझाबेथ सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे वावरते. सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या फोटोंमध्ये ती जीन्स आणि स्लीव्हलेस टॉपमध्ये अत्यंत साध्या वेशात दिसते, जे तिच्या सच्च्या आणि नम्र स्वभावाचे उदाहरण आहे.
बहुभाषिक व खेळातही पारंगत
राजकुमारी एलिझाबेथ ही एक बहुभाषिक व्यक्ती असून, तिला डच, फ्रेंच, जर्मन आणि इंग्रजी भाषांचे प्रगल्भ ज्ञान आहे. यामुळे ती जागतिक स्तरावर प्रभावी संवाद साधू शकते. केवळ अभ्यासातच नव्हे, तर स्कीइंग, रोइंग आणि सेलिंग या खेळांमध्येही ती उत्साहाने भाग घेते.
सार्वजनिक जीवनात सक्रीय सहभाग
एलिझाबेथ हार्वर्डमध्ये शिक्षण घेत असताना देखील बेल्जियममध्ये नियमितपणे परत येते आणि महत्त्वाच्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत असते. कधी एकटी, तर कधी आपल्या पालकांसोबत ती सामाजिक भान जपत उपस्थित राहते, जे तिच्या नेतृत्वगुणांची ओळख पटवते.
बेल्जियमसाठी आणि तरुण पिढीसाठी आदर्श
बेल्जियमच्या राजघराण्याच्या अधिकृत वेबसाइटनुसार, एलिझाबेथ ही देशातील तरुण आणि विशेषतः महिलांसाठी एक प्रेरणास्थान आहे. तिचे जीवन, शिक्षण आणि सार्वजनिक कार्य हे एक नव्या पिढीच्या आधुनिक, सक्षम आणि समंजस नेतृत्वाचे प्रतीक बनले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : एकीकडे लष्करप्रमुखांना धमकावत होते युनूस, तर दुसरीकडे बांगलादेशच्या सैन्याने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
एका नव्या युगाची सुरुवात
राजकुमारी एलिझाबेथ ही केवळ बेल्जियमच्या सिंहासनाची वारसदार नाही, तर ती युरोपमधील आधुनिक राजकारणात एक महत्त्वाचा चेहरा बनू घातली आहे. तिचे शिक्षण, कर्तृत्व, आणि नम्रता हे तिच्या भावी नेतृत्वाची आश्वासक सुरुवात आहेत. त्यामुळे केवळ बेल्जियमच नव्हे, तर संपूर्ण जग तिच्याकडे एका प्रभावी महिला शासकाच्या रूपात पाहू लागले आहे.