Survey on Operation Sindoor : भारताचा सर्वात मोठा शत्रू चीन की पाकिस्तान? पाहा जनमताचा कौल ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Survey on Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर नंतर भारतातील जनतेच्या मनातील प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भारताचा सर्वात मोठा शत्रू कोण? चीन की पाकिस्तान? या प्रश्नावर देशभरात एक व्यापक सर्वेक्षण करण्यात आले आणि त्यातून अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत.
ऑपरेशन सिंदूर हे भारताने जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी राबवलेले एक निर्णायक लष्करी अभियान होते. या कारवाईत भारताने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या मोहिमेनंतर जनमानसात पाकिस्तानविरोधात संताप उसळला असतानाच, चीनबाबतही वाढत्या संशयाचे स्वर दिसून आले.
ऑपरेशन सिंदूरपूर्वी, युद्धबंदीच्या आधी झालेल्या सर्वेक्षणात ४७.४% लोकांनी चीनला भारताचा सर्वात मोठा शत्रू म्हणून ओळखले. यामागे सीमेवरील सततच्या घुसखोरी, लडाखमध्ये तणाव, तैवानप्रती चीनचे आक्रमक धोरण आणि जागतिक पातळीवरील रणनीतिक संघर्ष हे महत्त्वाचे मुद्दे होते. २७.७% लोकांनी पाकिस्तानला भारताचा प्रमुख शत्रू ठरवले, तर १२.२% उत्तरदात्यांनी चीन आणि पाकिस्तान दोघांनाही शत्रू म्हटले.
हे देखील वाचा : Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti: धर्मनिष्ठा, शौर्य आणि विद्वत्तेचा महामेरू म्हणजे छत्रपती संभाजी महाराज
ऑपरेशन सिंदूरनंतर, जेव्हा भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी अड्ड्यांवर जोरदार प्रतिहल्ला केला, तेव्हा लोकांच्या भावना अधिक तीव्र झाल्या. मात्र, तरीही ५१.८% लोकांनी चीनलाच भारताचा मुख्य शत्रू मानले. पाकिस्तानविषयीचा रोष कमी झाला असे नव्हे, पण केवळ १९.६% लोकांनी त्याला भारताचा सर्वात मोठा शत्रू म्हटले. यासोबतच, २०.७% लोकांनी चीन आणि पाकिस्तान दोघेही भारतासाठी तितकेच घातक असल्याचे मत व्यक्त केले. ही आकडेवारी स्पष्टपणे दाखवते की जनतेच्या मनात पाकिस्तानबाबत तात्कालिक रोष आहे, पण दीर्घकालीन आणि धोरणात्मक दृष्टीने चीन अधिक धोकादायक मानला जातो.
ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानला मोठा धक्का दिला. भारताच्या हवाई आणि विशेष दलांच्या कारवाईत दहशतवादी गटांची कंबर मोडण्यात आली. पाकिस्तानने त्यानंतर भारतातील विविध शहरांवर हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, पण भारतीय सुरक्षादलांनी प्रत्येक वेळी जोरदार प्रत्युत्तर दिले.
विशेष म्हणजे, दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी उपस्थित होते, हे पाकिस्तानच्या आणि दहशतवादाच्या साटेलोट संबंधांचे पुरावे आहेत. दुसरीकडे, चीनबाबत जनतेचा अविश्वास वाढत आहे. तंत्रज्ञान, व्यापार, सीमावाद, तसेच जागतिक दबाव तंत्र यामध्ये चीनने भारताविरोधात उघड भूमिका घेतली आहे. यामुळे भारताचे धोरण ठोस आणि स्वयंपूर्ण करण्याची गरज अधोरेखित होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘दो भाई दोनो तबाही’; पाकिस्तानला धूळ चारायला भारत-रशिया सज्ज, ‘S-500’ मुळे भरली धडकी!
सर्वेक्षणातून स्पष्ट होते की, पाकिस्तान दहशतवादी कारवायांसाठी भारताचा सक्रिय शत्रू असला तरी, चीनचा धोका अधिक खोल आणि धोरणात्मक आहे. भारताला आता केवळ सामरिक नव्हे, तर कूटनीतिक, आर्थिक आणि तांत्रिक पातळीवरही या दोन्ही शत्रूंना तोंड देण्याची गरज आहे. ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानला मोठा धडा दिला असला, तरी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी चीनचा छुपा विस्तारवाद अधिक गंभीर प्रश्न बनला आहे. या पार्श्वभूमीवर, भारताने स्वयंपूर्ण लष्करी क्षमता, जागतिक भागीदारी आणि अंतर्गत सुरक्षा यावर भर द्यावा लागणार आहे, हे या सर्वेक्षणाचे महत्त्वपूर्ण संदेश आहे.