India-Russia Relation : 'तुमचा माल आमच्याकडे पाठवा, तेलही देऊ...' रशिया भारताच्या पाठीशी उभा; अमेरिकेच्या टॅरिफवर चोख उत्तर ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
India-Russia Relation : भारत आणि अमेरिका यांच्यातील आर्थिक तणाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल ५० टक्के टॅरिफ (कर) लावल्याने नवी दिल्लीला मोठा फटका बसला आहे. पण या कठीण काळात भारताला रशियाने मोठा आधार दिला आहे.नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत रशियन मिशनचे उपप्रमुख रोमन बाबुस्किन यांनी स्पष्ट केले की, “काहीही झाले तरी भारत-रशिया ऊर्जा सहकार्य सुरूच राहील. बाहेरून कितीही दबाव आला तरी आम्ही एकत्र आहोत. आव्हानांचा सामना करण्यासाठी आम्ही भारताच्या सोबत खंबीरपणे उभे आहोत.”
याचबरोबर त्यांनी सांगितले की, जर कोणत्याही देशाने भारतीय उत्पादनांवर बंदी घालायचे ठरवले तर रशियाची बाजारपेठ भारतासाठी नेहमी खुली आहे. “भारतीय माल आमच्याकडे पाठवा, आम्ही तो आनंदाने स्वीकारू आणि भारताला तेलाचाही पुरवठा सुरूच राहील,” असे बाबुस्किन यांनी ठामपणे म्हटले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : BRICS Rupee Trade : भारतासाठी सुवर्ण क्षण! BRICS देशांचा मोठा निर्णय, व्यापार होणार डॉलरऐवजी ‘Indian Rupee’मध्ये
डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातीला भारतावर २५ टक्के कर लावला होता. पण नंतर हा कर दुप्पट करून ५० टक्क्यांवर नेण्यात आला. यामागे भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत असल्याचा मुद्दा प्रमुख होता. फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेनवरील रशियन आक्रमणानंतर पाश्चात्य देशांनी रशियावर कठोर निर्बंध लादले आणि कच्च्या तेलाचा पुरवठा थांबवला. यानंतर भारताने कमी किमतीत रशियन तेल खरेदी करण्यास सुरुवात केली. या निर्णयामुळे ट्रम्प भडकले आणि भारतावर थेट आरोप केला की, “भारत स्वस्त रशियन तेल खरेदी करून युद्धाला प्रोत्साहन देत आहे.” मात्र, भारताने ट्रम्प यांच्या या आरोपाला जोरदार उत्तर दिले. भारत सरकारने स्पष्ट केले की, ऊर्जा खरेदीचा निर्णय हा देशाच्या हितासाठी आणि बाजारपेठेच्या गरजेनुसार घेतला जातो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : U.S. Digital colonialism : मायक्रोसॉफ्ट सेवा बंद अन् नायराची रिफायनरी ठप्प… भारताला अमेरिकेकडून पहिला झटका
रोमन बाबुस्किन यांनी पत्रकार परिषदेत आणखी एक महत्त्वाची बाब अधोरेखित केली. अलीकडेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना युक्रेनमधील परिस्थितीबाबत फोनवर माहिती दिली. “यावरून हे दिसते की भारत रशियासाठी अत्यंत महत्त्वाचा भागीदार आहे,” असे ते म्हणाले.